घोडा अडेल का, बाजार थांबेल का ?

ध्यानीमनी नसताना, सर्वत्र मंदीचे वारे घोंघावत असताना सारेच शेअर बाजार अचानक तेजीत आले. १७ जून रोजी १५,१८३ अंशांचा तळ केल्यानंतर सारे ‘गुंतवणूक विश्व’ ‘निफ्टी’च्या १४,५०० या पातळीची वाट पाहात होते.
Bhushan Mahajan writes share market nifty 50 rbi rapo rate finance
Bhushan Mahajan writes share market nifty 50 rbi rapo rate financesakal
Updated on
Summary

ध्यानीमनी नसताना, सर्वत्र मंदीचे वारे घोंघावत असताना सारेच शेअर बाजार अचानक तेजीत आले. १७ जून रोजी १५,१८३ अंशांचा तळ केल्यानंतर सारे ‘गुंतवणूक विश्व’ ‘निफ्टी’च्या १४,५०० या पातळीची वाट पाहात होते.

ध्यानीमनी नसताना, सर्वत्र मंदीचे वारे घोंघावत असताना सारेच शेअर बाजार अचानक तेजीत आले. १७ जून रोजी १५,१८३ अंशांचा तळ केल्यानंतर सारे ‘गुंतवणूक विश्व’ ‘निफ्टी’च्या १४,५०० या पातळीची वाट पाहात होते. पण सुदैवाने तसे घडले नाही. खरे तर अल्पकालीन अथवा दीर्घ मंदीनंतर शेअर बाजार वर जायला लागतात, ते सहसा अविश्वासाच्या पायावरच. या पातळीवरून आता घसरण चालूच राहणार, यावर तज्ज्ञांत व गुंतवणूकदारांत एकवाक्यता झालेली असते. या अविश्वासामुळे तेजीची पहिली पावले हेटाईनेच पाहिली जातात. पुढे मात्र शेअर बाजार वरच जात राहिला तर तज्ज्ञांचा वेळ त्याची कारणे शोधण्यात जातो. शेवटी एकदाचे बाजार वरच जाणार, यावर एकमत झाले की तोवर तेजी संपत आलेली असते. असो.

यावेळीही असेच झाले. अमेरिकेत व्याजदर वाढले, आपल्या रिझर्व्ह बँकेने देखील ‘आधी लगीन कोंडाण्याचे’ म्हणत महागाईवरचा उतारा म्हणून अर्धा टक्क्याने व्याजदर वाढवले. नेहमी शेअर बाजाराचा अवसानघात करणाऱ्या या बातम्या असल्या तरी त्या पचवून ‘निफ्टी’ १७,४०० या पातळीला धडकला. आता पुढे काय? हा प्रश्न सर्वतोमुखी आहे.

बाजारात तेजी कशामुळे?

प्रथम तेजी अशी पुढे का जावी, ते बघू.

  • बरेच दिवसांनी परदेशी संस्था आखाड्यात उतरल्या आहेत. गेल्या आठवड्यात बाजाराची सुरवात कितीही चिंतेने किंवा अस्वस्थतेने झाली तरी बंद मात्र आशादायकच होता.

  • गेली तीन वर्षे ज्या क्षेत्रांची किंवा उद्योगांची पीछेहाट झाली होती, तेथून बाजार वर जायला सुरवात झाली. उदा. बँकिंग (सरकारी बँका अनुत्पादित कर्जाखाली दबलेल्या, खासगी बँका; त्याबरोबरच कर्जमागणीला लागलेली ओढ व ‘फिनटेक’शी स्पर्धा आदींनी ग्रासलेल्या), वाहनउद्योग (प्रचंड मागणी; पण तरीही चीप पुरवठ्यामुळे उत्पादनकपात), रिअल इस्टेट (सहा वर्षांच्या मंदीनंतर डोके वर काढत असलेले), कॅपिटल गुड्स क्षेत्र (या क्षेत्राचा निर्देशांक २००७ नंतर १४ वर्षांनी प्रथमच २०,००० या पातळीवर आला, ही उद्योग नवी गुंतवणूक करीत असल्याचे निदर्शक).

  • याला जोड मिळाली सदाबहार ग्राहक क्षेत्राची, आपल्या अर्थव्यवस्थेवर अढळ विश्वास (नुकताच कोविडनंतरच्या तेजीत बसलेला) असलेल्या छोट्या गुंतवणूकदारांची व काही सरकारी धोरणांची (राष्ट्रीय पेन्शन योजना; तसेच प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम गुंतवतांना त्यातील शेअर बाजारातील हिस्सा वाढवणे.).

  • शेअर बाजाराने छान गतीवेग पकडला आहे. या गतीवेगात पुढे १७,८०० किंवा १८,००० पातळीला स्पर्श करणे अशक्य नाही.

आज सावध राहणे गरजेचे!

कदाचित शेअर बाजार काही दिवस पुढे जात राहीलही, पण आज सावध राहणे का गरजेचे आहे, ते बघू

  • येथून बाजार जरी वर गेला तरी जोखीम परतावा गुणोत्तर आता आकर्षक राहिलेले नाही. ‘निफ्टी’त जोखीम हजार अंशांची, तर परतावा जेमतेम ४०० ते ६०० अंशांचा असू शकतो.

  • रशिया-युक्रेन युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्या चिंतेत भर पडली आहे ती चीनने तैवानविरुद्ध बाह्या सरसावल्यामुळे!

  • चीनच्या शून्य कोविड धोरणामुळे, तिथल्या अर्थव्यवस्थेला चाप बसत आहे. त्याचा परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर होत आहे. वाढीव कंटेनर भाडे, बंदरांचा ‘ट्रॅफिक जाम’ यातून अजून सुटका झालेली नाही.

  • जर्मनी व युरोपमधील गॅसटंचाई व पुरवठा यावर तोडगा मिळालेला नाही.

  • वाढते व्याजदर ग्राहकांची क्रयशक्ती नक्कीच कमी करतील. महागाई खाली येईल; पण कदाचित मागणी जर खाली आली, तर जीडीपी वृद्धी, रोजगारनिर्मिती व महागाई यातील तोल साधणे अधिकाधिक कठीण होत राहील.

  • निर्देशांकांचे मूल्यांकन १५,५०० या पातळीवर आकर्षक होते, आता तसे नाही.

कोणत्या क्षेत्रांवर लक्ष द्याल?

तात्पर्य, असे की खरेदी करावी ती चांगल्या गुणवत्ता असलेल्या, चोख व्यवस्थापनाखालील (आज भाव कमी असलेल्या) कंपन्यांमध्ये. उदा. एचडीएफसी बँक. काही सरकारी उद्योगदेखील गुंतवणुकीस योग्य आहेत. आपापल्या जोखीमक्षमतेप्रमाणे पीएफसी, हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचाही अभ्यास करता येईल. पीएफसीचे पी/ई गुणोत्तर २.२ आहे, तर लाभांश उतारा आजच्या बाजारभावावर १० टक्के पडतो. तसेच वर निर्देशलेल्या क्षेत्रांचा उदा. बँकिंग, वाहन व कॅपिटल गुड्स प्रत्येक घसरणीत अभ्यास करावा व निर्णय घ्यावा.

खरेदीबरोबर जेथे शक्य असेल, तेथे विक्री करून नफाही खिशात टाकत राहणे हिताचे. खरेदी-विक्रीतील समन्वय जमला, तर नवे भांडवल लागणार नाही.

थोडक्यात, घोडा अडेल का?, बाजार थांबेल का?, या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी आली, तर आपली पूर्ण तयारी हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.