व्यवसाय करताना उद्योजकांना आणि कंपन्यांमधील व्यवस्थापनातील महत्त्वाच्या व्यक्तींना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. विशेषतः कोव्हिड-१९ सारख्या महामारीच्या काळात तर अनेक प्रकारची आव्हाने समोर उभी राहतात आणि त्यावर पटकन काहीतरी तोडगा काढणे आवश्यक असते. अशा वेळी तंत्रज्ञानाच्या मदतीने जर कोणी पर्याय उपलब्ध करून दिला तर उद्योजकांच्या दृष्टीने त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. क्वाॅन्टिफी (Quantiphi) ही भारत (बेंगळूरू) व अमेरिका-स्थित अशीच एक स्टार्टअप कंपनी आहे जी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटलिजन्स - एआय) तंत्रज्ञानाच्या आधारे असे पर्याय अनेक व्यावसायिकांना उपलब्ध करून देते.
क्वॉन्टीफी स्थापना असीफ हसन, रघु हरीहरन, रितेश पटेल आणि विवेक खेमानी या चौघा तरुणांनी २०१३ मध्ये केली. असीफ आणि रघु यांना १५ वर्षांहून अधिक काळाचा आरोग्य आणि वित्त क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित सेवांविषयीचा अनुभव आहे. रितेश यांना अॅप्लिकेशन मॅनेजमेंट आणि साॅफ्टवेअर सोल्यूशन क्षेत्रातील तसेच विवेक यांना काॅर्पोरेट स्ट्रॅटेजी क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे.
क्वाॅन्टिफीच्या संकल्पनेविषयी बोलताना रितेश पटेल म्हणाले, "अप्लाईड एआय आणि डेटा सायन्स साॅफ्टवेअर व सर्व्हिसेस क्षेत्रात काम करणारी आमची कंपनी आहे. विविध क्षेत्रातील प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव पाठीशी असल्यामुळे आणि त्यासोबत क्लाउड व डेटा इंजिनिअरिंगशी संबंधित शिस्तबद्ध कार्यपद्धती तसेच आर्टिफिशियल इंटलिजन्स आधारित संशोधनाची जोड मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांच्या व्यवसायामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे शक्य होते. व्यवसायातील धोक्याची तीव्रता कमी करणे किंवा ते पूर्णपणे नाहीसे करणे तसेच प्रोडक्टला अधिक स्मार्ट करण्यासाठी आमची कंपनी मदत करते."
कोव्हिड महामारी सुरू झाली तेव्हा अमेरिकेतील इलिन्यू डिपार्टमेंट आॅफ एम्प्लाॅयमेंट सिक्युरिटी या विभागामध्ये येणाऱ्या अर्जांच्या प्रमाणात अचानक वाढ झाली. बेरोजगारीमुळे सरकारी मदतीसाठी हे अर्ज येत होते. त्यावेळी त्या विभागाने एका चॅटबाॅट तसेच टेलिफोनी बाॅटची मागणी केली. चौकशीसाठी येणारे फोन किंवा अर्जांबाबत ३७ प्रश्नांची उत्तरे या बाॅटने देणे अपेक्षित होते. विभागाच्या संकेतस्थळ व काॅल सेंटरसाठी क्वाॅन्टीफीने विकसित केलेल्या रॅपिड रिस्पाॅन्स व्हर्च्युअल एजंटने केवळ १५ दिवसांमध्ये ३२ लाख इन्क्वायरी (चौकशी) हाताळल्या. आजपर्यंत या बाॅटद्वारे ५८ लाख अशाप्रकारच्या इन्क्वायरी हाताळल्या गेल्या आहेत.
कोव्हिड -१९ मुळे निर्माण झालेल्या अनिश्चित आर्थिक वातावरणामध्ये औद्योगिक संस्था उत्पादनशील राहण्याचा मार्ग शोधत आहेत. त्याकरिता त्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इतर कंपन्यांप्रमाणेच क्वाॅन्टिफीला सुद्धा अशा आव्हानांना सामाेरे जावे लागले.
रितेश म्हणाले, "क्वाॅन्टिफिने तंत्रज्ञानाचा वापर करून भरतीच्या प्रक्रियेला (रीक्रूटमेंट प्रोसेस) एक नवे रूप दिले. २०२० मध्ये आलेल्या महामारीमुळे नोकऱ्यांवर मोठा परिणाम झाला तसेच कॅम्पस भरतीला मोठ्या प्रमाणात धक्का बसला. काॅन्टिफिने पारंपारिक भरती आणि कॅम्पस नियुक्त्या प्रक्रिया बदलली आणि तंत्रज्ञानाचा वापर करत वेळ, खर्च आणि मेहनत वाचवण्यासह अचूकता वाढवली. भरतीच्या प्रक्रियेत मानवी त्रुटी कमी केल्या. प्रथम भेटीनंतर मुलाखत व नोकरीची निश्चिती या सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. भरतीच्या प्रक्रिये(रीक्रूटमेंट प्रोसेस) मुळे एकूण खर्चात ८० टक्के तर मनुष्य बळ वापरात ६५ टक्के बचत करण्यात आली. त्यामुळेच एचआरडी काँग्रेसने ‘बेस्ट एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट प्रॅक्टिस’ हा पुरस्कार देऊन क्वॉन्टीफी गौरव केला."
टॅलेन्ट आकर्षित करण्यासाठी करीत असलेल्या उपयांबद्दल अधिक माहिती देताना रितेश म्हणाले, "क्वाॅन्टिफिची टीम ही आमच्यासाठी या आव्हानात्मक काळातील सर्वात जमेची बाजू आहे. क्वॉन्टीफी उद्योगाच्या गरजांवर आधारित असलेल्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करते आणि त्यासंदर्भात देखील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. विद्यार्थ्यांसाठी क्लाऊड, एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) आणि एमएल (मशिन लर्निंग) तंत्रज्ञानावर सत्रे आयोजित केली जातात. क्वाॅन्टिफिने विद्यार्थ्यांना चार महिन्यांच्या योग्य कालावधीसाठी इंटर्नशिप देखील देऊ केली आहे."
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.