अर्थखात्यात हलवा बनवण्यासाठी मोठी कढई गॅसच्या शेगडीवर चढली की, खऱ्या अर्थाने खमंग चर्चा सुरू होते ती अर्थमंत्र्यांच्या पोतडीत काय असेल, अशीच. मात्र त्याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यासाठीच हा समारंभ असतो, कुछ मिठा होण्यासाठीच...त्याविषयी...
देशाचा अर्थसंकल्प अर्थात बजेट तयार करताना कमालीची गुप्तता पाळली जाते. कोणत्याही शुभकार्याआधी तोंड गोड केले जाते, या भावनेतून पारंपरिक हलवा समारंभ होतो. ही परंपरा, कधी सुरू झाला याची माहिती उपलब्ध नाही. यानंतर अर्थमंत्रालयात पत्रकारांसह बाहेरील कोणालाही प्रवेश दिला जात नाही. दिल्ली पोलिस, गुप्तचर विभाग अर्थ मंत्रालयात येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गांवर कडक लक्ष ठेवून असतात, तेथे बंदोबस्त असतो.
असा असतो हलवा कार्यक्रम
- कुछ मिठा हो जाय... या हेतूने अर्थसंकल्प छपाईला देण्याआधी, म्हणजे थोडक्याीत अर्थसंकल्प सादर करण्याआधी 10-12 दिवस हा कार्यक्रम हलवा बनवण्याचा कार्यक्रम अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असतो. त्यामागे कुछ मिठा हो जाय... ही भावना असते. अर्थसंकल्प आणि त्याबाबतची गुप्तता राखण्याचा याच्याशी संबंध आहे. या कार्यक्रमात अर्थसंकल्प बनवण्याच्या प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह छपाई कर्मचारीदेखील सहभागी होतात.
- अर्थसंकल्पाबाबत कमालीची गुप्तता बाळगली जावी, या हेतूने अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला जातो. त्यामुळे तळघरात या प्रक्रियेत सहभागी अर्थ खात्यातील कर्मचारी, अधिकारी यांना ठेवले जाते.
- यावर्षीच्या हलवा समारंभाला निर्मला सीतारामन यांच्यासह अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर, अर्थ खात्याचे सचिव, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये होणारा हा समारंभ म्हणजे थोडक्या्त, अर्थसंकल्पाच्या छपाईमध्ये सामील तसेच अर्थसंकल्प बनवण्याच्या प्रक्रियेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना अन्य जगाशी संपर्क येऊ न देण्याची प्रक्रिया होय.
- मोठ्या कढईत गूळ, साखर, गव्हाचा रवा घालून हलवा बनवला जातो.
अंतरिम अर्थसंकल्प...
- सत्तेवरून जाणारे सरकार दोन महिन्यांसाठी अंतरिम अर्थसंकल्प त्यालाच "व्होट ऑन अकाउंट' असे म्हणतात, ते सादर करते. त्यानंतर सत्तेवर येणारे सरकार संपूर्ण अर्थसंकल्प सादर करते. नरेंद्र मोदी सरकारचे पाच अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी सादर केले, पण अनारोग्यामुळे त्यांच्याऐवजी पीयूष गोयल यांनी अंतरीम अर्थसंकल्प सादर केला होता.
तिघे अर्थसंकल्पाचे सादरकर्ते
- इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांचे सरकार 1984 मध्ये सत्तेवर आले. विश्वरनाथ प्रतापसिंह अर्थमंत्री झाले. उभयतांमधील मतभेदानंतर विश्ववनाथ प्रतापसिंह पदावरून हटवले गेले. तेव्हा राजीव गांधी यांनी 1987-88 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला.
- राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू हे तीन पंतप्रधान एकाच कुटुंबातील असे आहेत की, ज्यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1958-59 मध्ये अर्थसंकल्प सादर केला होता.
सर्वात छोटे भाषण
- सर्वात छोटे अर्थसंकल्पीय भाषण एचएम पटेल यांनी दिले, ते केवळ 800 शब्दांचे होते. 1977 मधील अंतरिम अर्थसंकल्प पटेल यांनी सादर केला, त्या वेळी त्यांनी हे भाषण केले होते.
चर्चेविना अर्थसंकल्पाला मंजुरी
- इंदरकुमार गुजराल यांचे सरकार सत्तेवरून जाणार होते, तेव्हा 1997-98 मध्ये अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना संमत केला गेला. त्या वेळी घटनात्मक पेच निर्माण झाला होता. संसदेचे खास अधिवेशन बोलावून अर्थसंकल्प संमत केला होता.
अर्थसंकल्प सादर केलाच नाही!
- सर्वश्री के. सी. निओगी आणि हेमवतीनंदन बहुगणा हे दोन अर्थमंत्री असे झाले की, त्यांना अर्थसंकल्प सादर करण्याची संधीच मिळाली नाही.
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.