Digital Transformation
Digital Transformation sakal

धन की बात : डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनची वाढती मागणी

टीसीएसने प्रति शेअर आठ रुपये लाभांश जाहीर केला
Published on

गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,९१९ अंशांवर तर ‘निफ्टी’ १७,१८५ अंशांवर बंद झाले.आगामी काळात इंडसइंड बँक (१९ ऑक्टोबर), अॅक्सिस बँक, बजाज फायनान्स व आयटीसी (२० ऑक्टोबर), रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय लाईफ व एचडीएफसी लाईफ (२१ ऑक्टोबर), कोटक बँक व आयसीआयसीआय बँक (२२ ऑक्टोबर) आदी अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होतील,ज्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

गेल्या आठवड्यात इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आदी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले. त्यानुसार टीसीएसच्या निव्वळ नफ्यात वाढ झाली असून तो १०,४६५ कोटी रुपयांवर पोहचला आहे. टीसीएसने प्रति शेअर आठ रुपये लाभांश जाहीर केला असून, अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड डेट १८ ऑक्टोबर आणि पेआउट डेट सात नोव्हेंबर निश्चित केली आहे.

इन्फोसिसच्याही निव्वळ नफ्यात वाढ झाली असून तो ६,०२१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. इन्फोसिस या कंपनीने नमूद केल्यानुसार आपल्या भागधारकांना बक्षीस देण्यासाठी कंपनी ९३०० कोटी रुपयांचे शेअर परत खरेदी (बायबॅक) करणार आहे. कंपनीने कमाल बायबॅक किंमत रु.१८५० जाहीर केली आहे. इन्फोसिस या कंपनीने १६ रुपये पन्नास पैसे प्रति शेअर अंतरिम लाभांशही मंजूर केला असून, रेकॉर्ड डेट म्हणून २८ ऑक्टोबर आणि पेआउट डेट १० नोव्हेंबर निश्चित केली आहे.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी नमूद केल्यानुसार, कंपनीच्या सेवांची मागणी खूप मजबूत आहे, तर कंपनीने सर्व उद्योग क्षेत्रांमध्ये तसेच सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये मजबूत, फायदेशीर वाढ नोंदवली आहे. वाढ आणि परिवर्तन उपक्रम, क्लाउड मायग्रेशन आणि आउटसोर्सिंग प्रतिबद्धता यांच्या सुरेख मिश्रणासह कंपनीची ऑर्डर बुक चांगली आहे.

इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी नमूद केल्यानुसार, इन्फोसिसने मिळविलेले मोठ्या करारांमधील यश, तसेच जागतिक पातळीवर आर्थिक दृष्टिकोनाबाबत चिंता कायम असतानादेखील कंपनीच्या सेवांची मागणी मजबूत आहे कारण कंपनीच्या ग्राहकांना व्यवसाय वाढ आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबतीत इन्फोसिसच्या क्षमतेवर विश्वास आहे.

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अपरिहार्य

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे व्यवसायाच्या सर्व क्षेत्रांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण. बिझनेस डिजिटलायझेशन हे तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण आहे. डिजिटलायझेशन म्हणजे नवीन महसूल आणि मूल्य-उत्पादनाच्या संधी प्रदान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. गेल्या काही वर्षांत भारतीय आयटी सेवांच्या वाढीचा सर्वात मोठा चालक म्हणजे ऑन-प्रिमाइस डेटा सेंटर्समधून क्लाउडवर स्थलांतर. कारण अनेक संस्था आणि कॉर्पोरेट्सना डेटा कोठूनही तसेच केव्हाही अॅक्सेस करणे आवश्यक झाले आहे,

जे जुन्या आयटी आर्किटेक्चरमध्ये इतके सहज शक्य नाही. एकदा अॅप्लिकेशन्स क्लाउडवर हलवल्यानंतर, माहितीचे डिजिटलायझेशन आणि एकाधिक व्यावसायिक कार्यांसाठी त्याचा वापर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतात. आगामी काळात मागणीचा विचार करता भारतीय आयटी सेवा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, मात्र मागणीनुसार पुरेसे कर्मचारी मिळवणे हेच भारतीय आयटी सेवा कंपन्यांसाठी मुख्य आव्हान असू शकते. टेक्नॉलॉजीमध्ये झपाट्याने बदल होत असल्याने काही व्यवसाय नामशेष झाले आहेत, तर काही उद्योजकांनी मात्र व्यवसाय करताना टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवसायात जणू एकाधिकार निर्माण केला आहे.

टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवसायात प्रगती करण्यासाठी ग्राहकांच्या बदलत्या गरजा, मागणी, ग्राहकांना व्यवहार करताना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन डेव्हलपमेंट करणे योग्य ठरते. सातत्याने डेटा अॅनालिटिक्स अर्थात उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून टेक्नॉलॉजीमध्ये अपेक्षित सुधारणा, तसेच बदल करणे आवश्यक असते. अॅमेझॉनचे कार्यकारी अध्यक्ष जेफ बेझोस यांच्या म्हणण्यानुसार, कंपन्यांना डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनशिवाय दुसरा पर्याय नाही. एकतर डिजिटलायझेशन नाहीतर अपयशाचे स्वागत हाच पर्याय आहे.

या पार्श्वभूमीवर, आगामी काळातील व्यवसायांचे डिजिटलायझेशन आणि भारतातील आयटी कंपन्यांच्या व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी जोखीम लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी टीसीएस, एल अँड टी इन्फोटेक त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यवसायात प्रगती करत असलेल्या एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये टप्प्याटप्प्याने मर्यादीत गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.

(या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

(लेखक सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.