‘ई-पे टॅक्स’वरून भरा प्राप्तिकर

प्राप्तिकर भरणा करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत
Tax
Taxsakal
Updated on

प्राप्तिकर विभागाने विकसित केलेल्या https://www.incometax.gov.in/iec/foportal, या नव्या वेबसाइटवर आता प्राप्तिकर भरणा अधिक सुरळीत होण्यासाठी ‘ई-पे टॅक्स’ ही नवी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या ‘ई-पे टॅक्स’ प्रणालीमुळे प्राप्तिकर भरणा अधिक सोपा, सुटसुटीत होईल हे निश्चित. सध्या डिजिटल पेमेंटचे युग आहे, प्राप्तिकर विभागानेदेखील ‘डिजिटल पेमेंट’ची सुविधा पुरविण्यामध्ये आपण कुठेही कमी पडू नये, याची दखल घेत ‘ई-पे टॅक्स’ प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे प्राप्तिकरदात्याला प्राप्तिकर भरणा करताना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि प्राप्तिकर संकलनातही चांगली वाढ होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्राप्तिकर भरणा (आगाऊ कर, स्वयंचलित प्राप्तिकर, प्रॉपर्टीवरचा टीडीएस आदी) करण्यासाठी प्राप्तिकरदात्याला प्राप्तिकराच्या वेबसाइटवर लॉग-इन करून किंवा पॅन नंबर, मोबाईल नंबर टाकून लॉग-इन न करतादेखील ‘ई-पे टॅक्स’वर जाऊन, प्राप्तिकर भरणा करता येईल.

प्राप्तिकर भरणा करण्यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत

इंटरनेट बँकिंग : या पर्यायानुसार प्राप्तिकरदाता सात बँकांमार्फत प्राप्तिकर भरू शकतो. त्यामध्ये कॅनरा बँक, करूर वैश्‍य बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र यांचा समावेश आहे.

डेबिट कार्ड : कॅनरा बँकेच्या डेबिट कार्डने पेमेंट करता येईल.

बँकेत जाऊन : प्राप्तिकरदाते बँकेत प्रत्यक्ष जाऊनही करभरणा करू शकतात. अशाप्रकारे करभरणा करायचा असेल तर, प्राप्तिकरदात्याला ‘ई-पे टॅक्स’वर चलन तयार करावे लागेल. या चलनाची कॉपी किंवा त्या चलनावरचा सीआरएन (CRN) नंबर पेमेंट करताना नमूद करावा लागेल. हे पेमेंट प्राप्तिकरदाता १०,००० रुपयांपेक्षा कमी असल्यास रोखीने भरू शकतो, किंवा चेक किंवा डिमांड ड्राफ्ट काढून करू शकतो. बँक ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे करभरणा करेल. कुठलेही चलन किंवा ‘सीआरएन’ (CRN) नंबर तयार झाला, की प्राप्तिकरदात्याच्या अधिकृत मोबाईलवर त्याचा ‘एसएमएस’देखील येतो.

पेमेंट गेटवे : हा एक महत्त्वाचा पर्याय प्राप्तिकर भरणा करण्यासाठी आहे, यानुसार कॅनरा बँक, फेडरल बँक, कोटक महिंद्रा बँक यांचे गेटवे वापरून काही इतर बँकांमधूनही प्राप्तिकर भरणा करता येईल. पेमेंट गेटवे या पर्यायांमध्ये कार्ड पेमेंट, इंटरनेट बँकिंग, यूपीआय (UPI) पेमेंटचीदेखील सुविधा देण्यात आली आहे.

याखेरीज इतर बँकामधून पेमेंट करायचे असेल तर ‘एनएसडीएल’च्या https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp, या पेमेंट साइटवरून करावे.

या नव्या प्राप्तिकर भरणा प्रणालीमुळे :

१) प्राप्तिकर भरणा झाल्यावर, त्याचे चलन पोर्टलवर दिसेल.

२) प्राप्तिकर भरलेले चलन लगेच मिळू शकेल.

३) चलन ड्राफ्ट (Draft) म्हणूनही सेव्ह करता येईल.

४) बँकांमार्फत भरलेले चलन Format आणि इतर चलनाची रूपरेषाही आता सारखीच असणार आहे.

या ‘ई-पे टॅक्स’ प्रणालीवरून प्राप्तिकर भरणा करण्यासाठी अजून बँकांची सुविधा वाढली पाहिजे, ही अपेक्षा आहे.

(लेखक कर सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.