रिझर्व्ह बॅंकेकडून सोनेविक्री!

reserve-bank
reserve-bank
Updated on

मुंबई -आर्थिक आणीबाणीच्या प्रसंगी शेवटचा आणि भरवशाचा पर्याय असलेला रिझर्व्ह बॅंकेकडील सुवर्णसाठा आता विक्रीला काढण्यात आला आहे. रिझर्व्ह बॅंकेने जुलैपासून बाजारात १.१५ अब्ज डॉलरची सोनेविक्री केली आहे. मात्र याच काळात बॅंकेने ५.१ अब्ज डॉलरचे सोने खरेदी केले आहे. सोनेखरेदी ही विक्रीच्या तुलनेत जास्त असली, तरी दीर्घ कालावधीनंतर रिझर्व्ह बॅंकेवर सोनेविक्रीची वेळ का आली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

देशाच्या परकी गंगाजळीत ११ ऑक्‍टोबरअखेर २६.७ अब्ज डॉलर इतक्‍या मूल्याचा सुवर्णसाठा आहे. ऑगस्टअखेर रिझर्व्ह बॅंकेकडे १९.८७ दशलक्ष ट्रॉय औंस सोने आहे. रिझर्व्ह बॅंकेकडील राखीव निधीबाबत बिमल जालान समितीने सरकारला अहवाल सादर केला होता. त्यात बॅंकेकडे ताळेबंदाच्या तुलनेत ५.५ टक्के ते ६.५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राखीव निधी असावा, उर्वरित निधी सरकारला हस्तांतरित करण्यात यावा, अशी शिफारस केली आहे. या अहवालानंतर रिझर्व्ह बॅंकेचा सोनेसौद्यांमधील सहभाग वाढल्याचे दिसून आले आहे. परकी गंगाजळीतील शिल्लक साठ्यापैकी काही सोन्याची महिन्यातून एकदा विक्री करण्यास परवानगी आहे. त्यामुळे बॅंकेकडून सोनेविक्रीचा प्रयत्न झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. दरम्यान, परकी चलन विनियम व्यवहारांच्या दृष्टीने रिझर्व्ह बॅंक जागतिक बाजारात सोने खरेदी-विक्री करीत असल्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

१९९१ मध्ये आर्थिक समतोल ढासळल्याने आयात बिले थकली होती. आयातीची देणी चुकती करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने युनियन बॅंक ऑफ स्वित्झर्लंड आणि बॅंक ऑफ इंग्लंड या दोन बॅंकांकडे ६७ टन सोने गहाण ठेवले होते. 

सोनेविक्री नक्की कोणासाठी?
मंदीच्या प्रभावाने करसंकलनातील तूट भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने जालान समितीच्या शिफारशींनुसार राखीव निधीतील १.७६ लाख कोटी रुपये नुकतेच केंद्र सरकारला सुपूर्त केले होते. देशांतर्गत मंदीने सरकारच्या महसूलप्राप्तीला फटका बसला आहे. त्यामुळे यंदा वित्तीय तूट वाढण्याची शक्‍यता आहे. ही तूट कमी करण्यासाठी सरकारने रिझर्व्ह बॅंकेकडे घसघशीत लाभांशाची अपेक्षा व्यक्‍त केली आहे. मात्र सध्या बॅंकेकडून सुरू असलेली सोनेविक्री कोणासाठी केली जात आहे, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मात्र सोनेविक्रीबाबत रिझर्व्ह बॅंकेने कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.