दोन वर्ष कोरोना महासाथीमुळे अनुत्साही वातावरण होते. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. रोगराई नाही. राखी पौर्णिमा, कृष्णजन्म, गौरी-गणपती, नवरात्र सर्वत्र जोरात साजरे झाले. आता दिवाळी अगदी जवळ येऊन ठेपली आहे. इतर सणांपेक्षा दिवाळी वेगळी असते.
यावेळी बोनस वाटप केले जाते. कर्मचारी, ग्राहक, व सर्व संबंधित व्यक्तिंना भेटवस्तू देण्याची व्यापारी, उद्योजकांमध्ये पूर्वापार प्रथा आहे. तो एक जनसंपर्क (public relation) स्वरूपाचा व्यावसायिक खर्च आहे. अनेक जणांना प्रश्न पडतो की यावर जीएसटी लागतो का? खरेदीवरील इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल का? जीएसटी कायद्याच्या कलम १६ प्रमाणे धंद्याच्या ओघात अथवा धंद्याच्या अभिवृद्धीसाठी ज्या वस्तू किंवा सेवा घेतल्या असतील त्या सर्वांवर इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल. मात्र इनपुट टॅक्स क्रेडिट घ्यायला काही अटी, शर्ती आणि बंधने लागू होतात. कलम १७ मध्ये काही परिस्थितीत वा प्रसंगी काही वस्तू व सेवांवरील इनपुट टॅक्स क्रेडिट प्रतिबंधित केले आहे. याचा परिणाम दिवाळीप्रसंगी दिलेल्या भेटवस्तूंबाबत काय होतो ते पाहूया.
भेटवस्तू देण्यावर जीएसटी लागेल का?
वस्तू किंवा सेवेचा पुरवठा मोबदला घेऊन असेल तरच ते करपात्र आहे. मात्र अशी भेटवस्तू जवळच्या व्यक्तीला दिली असेल तर मोबदला नसला तरी ती करपात्र समजला जातो. त्यावर बाजारभावाने कर भरावा लागतो. संबंधित व्यक्तीची व्याख्या कलम १५ मध्ये दिली आहे. सबंधित व्यक्ती सोडून अन्य कोणासही भेट दिली असेल तर त्यासाठी मोबदला नसल्याने त्यावर कर लागत नाही.
नोकर, कर्मचारी यांना भेटवस्तू दिली जाते. गिफ्ट व्हाउचर दिले जातात. त्यावर कर लागेल का?
नोकर, कर्मचारी हे संबंधित व्यक्ती होतात. मात्र त्यांना एका आर्थिक वर्षात प्रत्येकी रु.५०,००० पर्यंत दिलेले बक्षीस, भेट हे करपात्र पुरवठा होत नाही. सामान्यत: कर्मचाऱ्यांना इतकी मोठी भेट कोणी मालक देत नाही. चार-पाच वर्षापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना कार दिल्याची बातमी आली होती. भेटवस्तूचे मूल्य रु. ५०,००० पेक्षा जास्त असेल तर कर लागेल.
खरेदीवर दिलेल्या कराचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल का?
कलम १७ मध्ये प्रतिबंधित वस्तू व सेवा दिल्या आहेत. पोटकलम पाचनुसार भेटवस्तूं संबंधित खरेदीवरील इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. मात्र वर उल्लेख केलेल्या करपात्र पुरवठ्याच्या प्रमाणात इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल.
कर्मचाऱ्यांना मिठाई वाटली जाते. जेवणावळी दिल्या जातात. ती काही भेटवस्तू म्हणता येत नाही. त्यावर इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येईल का ?
कलम १७ पोट कलम पाचनुसार अन्न आणि खानपान यावर इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. बरेच व्यापारी रिटर्न भरताना बंधने लक्षात न घेता कर देयता कमी व्हावी म्हणून संपूर्ण इनपुट टॅक्स क्रेडिट घेतात. मात्र जेव्हा हे लक्षात येईल तेव्हा ते रिव्हर्स करावे लागते आणि तेवढी रक्कम व्याजासह भरावी लागते. वेळीच काळजी घेणे हितावह असते.
(लेखक ज्येष्ठ करसल्लागार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.