प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) सादर करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविली गेलेली असून, ही मुदत आता या आठवडाअखेरीस संपत आहे. करपात्र नोकरदार; तसेच लेखापरीक्षणाची गरज नसलेल्या संस्था ३१ ऑगस्टपर्यंत आपली विवरणपत्रे सादर करू शकणार आहेत. पण असे विवरणपत्र सादर केल्यानंतर करदात्यांची जबाबदारी संपत नाही. त्यानंतरही काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज असते, त्यामुळे ऑनलाइन किंवा (काही विशेष प्रकरणामध्ये) प्राप्तिकर खात्यात स्वतः जाऊन ‘रिटर्न’ सादर केल्यानंतर, त्याची पोचपावती जरी मिळाली तरीदेखील प्राप्तिकरदात्यांनी स्वस्थ बसू नये.
ऑनलाइन पद्धतीने ‘रिटर्न’ भरले असेल तर त्याची प्रत करदाते दोन पद्धतीने प्राप्तिकर खात्याकडे पाठवू शकतात. एक तर ई-प्रमाणित (व्हेरिफाय) करून किंवा कागदोपत्री सही करून पोस्टाने पाठवू शकतात. जर विवरणपत्र पोस्टाने पाठविले असेल, तर करदात्याच्या अधिकृत मेल आयडीवर प्रत पोचल्याची मेल येते. ऑनलाइन विवरणपत्र (कोणत्याही पद्धतीने) पाठविल्यानंतर प्राप्तिकर खात्याच्या केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राकडून आपण भरलेल्या विवरणपत्राची प्राप्तिकर कायदा कलम १४३ (१) नुसार शहानिशा होते. ज्या आर्थिक वर्षामध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केले आहे, ते आर्थिक वर्ष संपण्यापासून एक वर्षाच्या आत प्राप्तिकरदात्याला त्याच्या अधिकृत मेलवर (जो प्राप्तिकर विभागाकडे नोंदविला गेलेला आहे) सूचनापत्र (इंटिमेशन) येऊ शकते. ही मेल महत्त्वाची आहे. कारण या मेलद्वारे पाठवलेले सूचनापत्र म्हणजे एक प्रकारची शहानिशाच आहे. त्यात विवरणपत्रामध्ये किती आणि कोणत्या प्रकारचे उत्पन्न दाखवले गेले आहे, ते प्राप्तिकर खात्याकडे असलेल्या माहितीशी जुळत आहे का? नंतर फॉर्म २६ एएस मध्ये दिसलेले उत्पन्न, कापला गेलेला कर, भरलेला प्राप्तिकर, आगाऊ कर, फॉर्म १६ किंवा १६ अ मध्ये दाखविलेले उत्पन्न व कापलेला कर आदी गोष्टी तपासल्या जातात. सर्व उत्पन्न आणि कर यांचा मेळ बसणे महत्त्वाचे असते आणि ते आपल्याला या सूचनापत्रामधून समजू शकते. जर विवरणपत्रात कोणतीतरी तफावत आढळली किंवा एखाद्या उत्पन्नाची माहिती दाखवायची विसरली गेली असेल किंवा अधिक परतावा (रिफंड) मागितला गेला असेल किंवा काही चुका झाल्या असतील आणि त्या गोष्टी जर प्राप्तिकर खात्याच्या नजरेत आल्या असतील, तर त्या या सूचनापत्राद्वारे आपल्याला कळू शकतात, त्यामुळे आपल्याकडून एखादे उत्पन्न दाखवायचे राहिले असेल तर आपल्याला करदायित्व येऊ शकते किंवा मागितलेल्या परताव्यात बदल होऊ शकतो किंवा जर सर्व उत्पन्न व कर यांचा मेळ बसला तर कोणतेही करदायित्व येत नाही. जर प्राप्तिकर विवरणपत्र थेट प्राप्तिकर खात्यात जाऊन जमा केले असेल आणि त्या विवरणपत्रात तफावत आढळली तर संबंधित करदात्यास नोटीसदेखील येऊ शकते. संबंधित नोटिशीला समर्थनीय उत्तर देण्याचीही जबाबदारी करदात्यावर असते.
या सूचनापत्रातील तपशिलाबद्दल तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल, तर संबंधित करदात्याला असे सूचनापत्र मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत आपला आक्षेप ऑनलाइन पद्धतीने नोंदवावा लागतो. तुम्ही जर असा काही आक्षेप नोंदविला नाही, तर प्राप्तिकर विभाग आपल्या विवरणपत्राचे समायोजन (क्लिअरिंग) करून टाकतात, हे लक्षात घेतले पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.