दुसऱ्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसला हे नाकारता येणार नाही व त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवरही प्रतिकूल परिणाम झाला. मात्र आता त्यातून देश वेगाने सावरतो आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीही देशाची तयारी बऱ्यापैकी झाली आहे.
नवी दिल्ली: भारताच्या अर्थव्यवस्थेत (Economy) चालू आर्थिक वर्षात मजबूतपणे वाढ होईल व दोन अंकी वृद्धीसह गुंतवणूक (Investment) स्थितीही लक्षणीयरीत्या सुधारेल असा विश्वास नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी व्यक्त केला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरलो आहोत असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले की, दोन लाटांमधून राज्येही काही धडे शिकली. आम्ही आता सावरलो आहोत. आता आर्थिक सुधारणांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचे संकेत स्पष्ट दिसत आहेत. दुसऱ्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेला बसला हे नाकारता येणार नाही व त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवरही प्रतिकूल परिणाम झाला. मात्र आता त्यातून देश वेगाने सावरतो आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीही देशाची तयारी बऱ्यापैकी झाली आहे.
सध्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र ही महागाई तात्पुरती असल्याचा अंदाज वर्तवून ते म्हणाले की, सध्या महागाईचे प्रमाण जेवढी भीती होती तेवढे जास्त नाही. अर्थव्यवस्थेत पैसा आणण्यासाठी केंद्राने कोवीड बाँड काढले आहेत त्याबद्दल ते म्हणाले की, नाव काहीही असले तरी इतक्या मोठ्या संकटकाळात खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठी असे उपाय करणे क्रमप्राप्त ठरते. बाँडचे नाव महत्त्वाचे नाही.
३१ मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत ७.३ टक्क्यांची जबरदस्त घसरण झाली. अलीकडे अनेक जागतिक वित्तीय संस्थांनी भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनाबाबत (जीडीपी) प्रतिकूल अंदाज व्यक्त केले आहेत. एसअॅंडपी सारख्या वित्तसंस्थेने आर्थिक विकासाचा अंदाज ११ टक्क्यांवरून ९.५ टक्क्यांपर्यंत घटविला आहे. मात्र त्या संस्थांना आपल्या या अंदाजांचा फेरआढावा घ्यावा लागण्याची शक्यता आहे. कारण भारताच्या अर्थव्यवस्थेत या आर्थिक वर्षातच दुहेरी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
थेट विदेशी गुंतवणुकीच्या आकड्यांनी २०२१-२२ मधील एप्रिल ते जून या काळात नवा विक्रम केला आहे. स्टार्टअप्सची कामगिरीही समाधानकारक व उत्साहवर्धक आहे. सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या विक्रीतून पावणेदोन लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल असे उद्दिष्ट असल्याचे नमूद करताना ते म्हणाले की, कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला जो फटका बसला त्यातून सावरण्यासाठी सार्वजनिक उद्योगांमधील आपला वाटा विकणे सरकारसाठी अत्यावश्यक बनले आहे.
देशांतर्गत गुंतवणुकीतील लक्षणीय वाढीची चिन्हे आहेत. पोलाद, सिमेंट व बांधकाम क्षेत्रांत आधीपासूनच गुंतवणूक वाढ दिसत आहे. अर्थात ग्राहक निर्देशांकात सुधारणेसाठी काही काळ जावा लागेल. कारण दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ग्राहक थोडे धास्तावले आहेत. मात्र तिसऱ्या लाटेचा तुलनेने कमी परिणाम जाणवेल. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी केंद्राने नुकतेच २३ हजार कोटींचे जे पॅकेज जाहीर केले त्याचाही सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल.
- राजीव कुमार, उपाध्यक्ष, नीती आयोग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.