अनेक राज्यात लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याचा सकारात्मक असा परिणाम दिसून येत आहे.
नवी दिल्ली - मे महिन्यात देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला होता. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. यामुळे अनेक राज्यात लादण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. याचा सकारात्मक असा परिणाम दिसून येत आहे. लोकांना आता रोजगार मिळायला सुरुवात झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या डेटानुसार, 13 जूनच्या आठवड्यात देशातील बेरोजगारी कमी झाल्याचं समोर आलं आहे. बेरोजगारीचा दर हा 8.7 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
असंघटीत क्षेत्रातील निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. याचाच परिणाम लोकांना रोजगार मिळण्यात होत आहे. याशिवाय चांगल्या नोकऱ्या नसल्यानं इतर कामाकडे लोक वळले असल्यानं बेरोजगारी दर सुधारल्याचं म्हटलं जात आहे. CMIE च्या डेटानुसार, 13 जूनला संपलेल्या आठवड्यात शहरातील बेरोजगारी दर 9.7 टक्क्यांवर आला आहे. एक महिना आधी हाच दर 14.7 टक्क्यांवर होता. गेल्या काही आठवड्यातील आकडेवारी पाहता घसरलेला बेरोजगारीचा दर महत्त्वाचा ठरतो. 30 मे रोजी संपलेल्या आठवड्यात शहरी बेरोजगारी दर हा 17.88 टक्के इतका होता. तर 13 जून रोजी संपलेल्या आठवड्यात 8.18 टक्के घसरण झाली. तर 6 जूनला 3.6 टक्के घसरण झाल्याचं दिसतं.
ग्रामीण बेरोजगारी दर सुधारला
शहराच्या तुलनेत ग्रामीण बेरोजगारी दरात चांगली सुधारणा झाली आहे. मे महिन्यात ग्रामीण बेरोजगारी दर हा 10.63 टक्के इतका होता. तर 13 जूनला संपलेल्या आठवड्यात हाच दर 8.23 टक्के होता. ग्रामीण बेरोजगारी दरात दोन आठवड्यात 2.4 टक्के सुधारणा झाली आहे. CMIR च्या आकडेवारीनुसार मे महिन्यात देशात बेरोजगाराचा दर हा 12 टक्क्यांहून थोडा जास्त होता. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत बेरोजगारी दर 6.52 टक्के ते 7.97 टक्क्यांच्या दरम्यान होता. जूनमध्ये हा थोडा जास्त होता. एप्रिल महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर हा 7.97 टक्के इतका होता. यानुसार एप्रिलमध्ये जवळपास 73.5 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. यामध्ये वेतन मिळणाऱ्या 34 लाख नोकऱ्यांचा समावेश होता.
गेल्या वर्षी मोठा फटका
गेल्या वर्षी कोरोनाला रोखण्यासाठी देशात 25 मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. यामुळे एप्रिल 2020 मध्ये देशातील बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हा देशात तब्बल 23.52 टक्के इतका बेरोजगारीचा दर झाला होता. त्यानंतर 2021 मध्ये आता 6.52 टक्क्यांवर आला आहे. मात्र दुसऱ्या लाटेचा एप्रिल आणि मे महिन्यात मोठा फटका बसला आहे. दोन महिन्यात तब्बल 2.3 कोटी लोकांना नोकरी गमवावी लागली आहे.
रोजगार दर 2 टक्क्यांनी वाढला
CMIE च्या डेटानुसार, 13 जूनला संपलेल्या आठव्यात लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेटमध्ये 30 मेच्या तुलनेत सुधारणा झाली आहे. 13 जूनच्या आठवड्यात हा दर 39.75 टक्के इतका आहे. तर 30 मे रोजी हाच दर 36.29 टक्के होता. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत यामध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.