आजच्या काळात जगातील अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेल्या असल्याने, आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेलासुद्धा आर्थिक स्थैर्यासाठी व्याजदरात वाढ करणे भाग पडले.
अलिकडच्या काही महिन्यांत बँकांमधील फिक्स्ड डिपॉझिटस(एफडी) अर्थात मुदतठेवी या गुंतवणूक पर्यायाला सुगीचे दिवस आले आहेत, असे दिसते. मागील वर्ष २०२२ च्या मार्चपर्यंत, सरकारी; तसेच खासगी क्षेत्रातील बँकांच्या मुदतठेवींवरील व्याजदर हे चार ते ५.५ टक्क्यांपर्यंत होते.
आता ते ६.५० ते ८.५० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. हा आमूलाग्र बदल होण्यामागे जागतिक आर्थिक परिस्थिती आहे.
जागतिक घडामोडींचा परिणाम
मागील वर्ष २०२२ सुरू झाले, तेंव्हा साऱ्या जगाने कोरोनातून नुकत्याच झालेल्या मुक्तीने सुटकेचा निःश्वास टाकला होता आणि हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले जाईल अशी आशा होती;
परंतु फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाने जागतिक पातळीवरील परिस्थिती प्रचंड बदलली. रशिया हा कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा निर्यातदार, तर युक्रेन हा गहू, मका इत्यादी अन्नधान्याचा मोठा पुरवठादार. यांच्यातील युद्धामुळे इंधन आणि अन्नधान्याच्या पुरवठयामध्ये व्यत्यय आला आणि साहजिक त्यांच्या किमती वाढू लागल्या.
यामुळे सगळ्या जगामध्ये चलनवाढीला आमंत्रण मिळाले. अमेरिकेत चलनवाढीने अनेक वर्षातील उच्चांकी पातळी गाठली. साहजिकच या चलनवाढीला आळा घालण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली आणि अमेरिकेतील व्याजदर अर्धाटक्क्यांवरून ४.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले.
रिझर्व्ह बँकेचीही व्याजदरवाढ
आजच्या काळात जगातील अर्थव्यवस्था एकमेकांशी जोडलेल्या असल्याने, आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेलासुद्धा आर्थिक स्थैर्यासाठी व्याजदरात वाढ करणे भाग पडले. मे २०२२ पासून आपल्या देशाच्या रिझर्व्ह बँकेने रेपो व्याजदर (या दराने रिझर्व्ह बँक विविध बँकांना व्यवसायासाठी कर्ज देते.) २.२५ टक्क्यांनी वाढवला आहे.
यातून आपल्या देशातील कर्जाचे आणि मुदतठेवींचे व्याजदर वाढू लागले. फेडरल रिझर्व्ह आगामी सहा महिन्यापर्यंत अजून सुमारे अर्धा टक्का व्याजदरवाढ करेल आणि नंतर यामध्ये काहीसे स्थैर्य येईल.
हे पाहता रिझर्व्ह बँकसुद्धा रेपोदरवाढ करेल व ठेवींचे व्याजदर आगामी सहा महिन्यात सुमारे अर्ध्या टक्क्यांपर्यंत वाढतील. हे लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी आपण किती रक्कम ठेवींमध्ये गुंतवणार आहोत, हे निश्चित करून एक वर्ष, तीन वर्षे, पाच वर्षे अशा विविध कालावधीच्या मुदतठेवींमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास सुरूवात करावी.
सर्व रक्कम एकाच बँकेत ठेऊ नये. म्हणजे यामधील जोखीम कमी करता येईल. स्मॉल फायनान्स बँका जास्त व्याजदर देत आहेत. या बँकांना शेड्यूल्ड बँकांचा दर्जा असून, यामधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे, हे लक्षात ठेऊन आपली मुदतठेवींमधील गुंतवणूक सरकारी बँका, खासगी क्षेत्रातील बँका आणि स्मॉल फायनान्स बँका यामध्ये विभागून ठेवावी. ही गुंतवणूक करताना प्रमाणित आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यावे आणि नंतरच गुंतवणूक करावी.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.