धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. बहुतेक लोक या दिवशी सोने खरेदी करतात. ठिकठिकाणी ज्वेलर्सकडे गर्दी असते. सोन्याच्या बाजारपेठा गजबजलेल्या असतात. अशातच तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर, काही नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. तुम्ही मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं असेल,तर आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. यासाठी काही गोष्टींचा नक्की विचार करा.
तुम्हाला सोने खरेदी करायची असेल, तर सोनं कुठून आलं याची माहिती तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याचा वैध स्रोत आणि पुरावा तुम्ही देऊ शकता. यानंतर तुम्हाला हवे तितके सोने घरात ठेवता येईल, परंतु उत्पन्नाचे कोणतेही स्रोत न सांगता सोने घरात ठेवायचे असेल, तर यावर मर्यादा आहेत.
किती सोनं ठेऊ शकता?
नियमांनुसार, विवाहित महिला 500 ग्रॅम, अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष केवळ 100 ग्रॅम सोने उत्पन्नाचा दाखला न देता ठेऊ शकतात. तीनही श्रेणींमध्ये विहित मर्यादेत सोने घरात ठेवल्यास आयकर विभाग सोन्याचे दागिने जप्त करणार नाही.
त्याच वेळी, जर विहित मर्यादेपेक्षा जास्त सोने घरात ठेवले असेल तर त्या व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक असेल. यामध्ये सोने कोठून आले, याचा पुरावा आयकर विभागाला द्यावा लागणार आहे. सीबीडीटीने 1 डिसेंबर 2016 रोजी एक निवेदन जारी केले होते. जर एखाद्या नागरिकाकडे वारसाहक्काने मिळालेल्या सोन्यासह त्याचा वैध स्रोत उपलब्ध असेल आणि तो ते सिद्ध करू शकेल, तर नागरिक कितीही सोनं ठेऊ शकतात.
ITR भरताना द्यावी लागणारी माहिती
जर एखाद्याचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, तर आयकर रिटर्न किंवा आयटीआर फाईलमध्ये दागिन्यांचे घोषित मूल्य आणि त्यांचे मूळ मूल्य यामध्ये फरक नसावा. अन्यथा याचे कारण सांगावे लागेल.
कर भरताना नियम माहिती आहेत का?
सोन्याच्या खरेदीवर 3 टक्के जीएसटी भरावा लागतो. ग्राहकांना सोनं विकण्यावर कर भरावा लागतो. हे किती काळ आपल्याजवळ ठेवलं, त्यावर अवलंबून आहे. खरेदीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत सोने विकल्यास त्यातून होणारा कोणताही नफा अल्पकालीन भांडवली नफा म्हणून गणला जाईल. तसेच हा नफा तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडला जाईल. लागू इन्कम टॅक्स स्लॅबनुसार हा कर मोजला जाईल.
याउलट, तुम्ही तीन वर्षांनंतर सोन्याची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यास, त्यातून मिळणारे पैसे दीर्घकालीन भांडवली नफा मानले जातील आणि त्यावर 20 टक्के कर द्यावा लागेल. इंडेक्सेशन फायद्यांसह, 4% उपकर आणि अधिभार देखील लागू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.