आयुर्विमा पॉलिसी घेताना...

आयुर्विमा पॉलिसी घेताना...
Updated on

मार्च महिना म्हणजे वर्षअखेर. या महिन्यात व्यवसायाची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी आयुर्विमा कंपन्या जोरात कार्यरत असतात. तसेच अनेक जण प्राप्तिकर सवलतीसाठी विमा पॉलिसी घेतानाही दिसतात. तुम्ही नवीन पॉलिसी घेत असाल तर पुढील सूचनांचा अवश्‍य विचार करा.

कोणती पॉलिसी घ्यायची ते ठरविले, की ती कोणत्या कंपनीकडून घ्यायची याविषयी निर्णय घ्या.

पॉलिसी निवडताना
व्यक्तीच्या आकस्मिक मृत्यूमुळे निर्माण होणारी आर्थिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करणे हाच आयुर्विम्याचा मुख्य हेतू असला पाहिजे.
त्या दृष्टीने कमीत कमी प्रीमियममध्ये जास्तीत जास्त संरक्षण देणारी टर्म इन्शुरन्स योजना सर्वोत्तम होय. केवळ प्राप्तिकर सवलतीसाठी कोणतीही योजना घेणे योग्य नव्हे. करविषयक तरतुदीही सतत बदलत असतात, याचा अनुभव आपण सध्या घेतच आहोत.
पुरेसे संरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट रकमेचा विमा असणे आवश्‍यक आहे.


कंपनी निवडताना
केवळ कमी ‘प्रीमियम’ हा एकमेव निकष लावणे योग्य नाही
कंपनीची विश्‍वासार्हता, आर्थिक स्थिती, क्‍लेमविषयक कामगिरी, सेवा देण्याची क्षमता या महत्त्वाच्या गोष्टीही लक्षात घ्या
यासाठी इंटरनेटवरून अधिकृत वेबसाइटवरून किंवा तज्ज्ञ जाणकारांचा सल्ला घेऊन माहिती मिळवू शकता.
प्रॉडक्‍ट आणि कंपनी नक्की केलीत. पॉलिसी ऑनलाइन आणि ऑफलाइन (एजंट) अशा दोन पद्धतीने घेता येते. ऑनलाइन घेतली तर प्रीमियम थोडासा कमी होईल. पण प्रॉडक्‍टची संपूर्ण माहिती समजून घेणे, प्रपोजल आणि अन्य फॉर्म भरून दाखल करणे, त्याचा पाठपुरावा करणे, पुढील प्रीमियम भरणे इत्यादी कामे अचूकतेने करा.

एजंटद्वारे पॉलिसी घेताना
तुम्ही निवडलेला एजंट विश्‍वासार्ह, सेवाभावी वृत्तीचा आणि पॉलिसीविषयक आवश्‍यक ज्ञान असणारा असला पाहिजे.
हप्त्यात सूट (रिबेट) देणाऱ्या एजंटांना बळी पडू नका. हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे.
एजंटकडून तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या. कंपनी आणि प्रॉडक्‍ट विषयीचे अधिकृत माहितीपत्रक मागून घ्या

प्रपोजल फॉर्म भरताना
स्वतःचे उत्पन्न, आरोग्य, सवयी, पूर्वीच्या पॉलिसी याबद्दल संपूर्ण खरी माहिती द्या.
प्रपोजलच्या शेवटी ‘वरील माहिती खरी असून त्यात चूक आढळल्यास विमा करार रद्द करून भरलेले प्रीमियम दंडापोटी जप्त करण्यास माझी हरकत नाही’ अशा अर्थाचे प्रतिज्ञापत्र तुम्ही करून देत असता, हे लक्षात असू द्या.
संपूर्ण भरलेल्या प्रपोजलची एक फोटो कॉपी स्वतःजवळ ठेवा

पॉलिसी दस्तावेज (डॉक्‍युमेंट) मिळाल्यानंतर
पॉलिसीवरील माहिती उदा. नाव (स्पेलिंगसह), पत्ता, जन्मतारीख, नॉमिनीचे नाव इत्यादी तपासून पाहा.
विमा रक्कम, प्रीमियम, भरण्याची पद्धत, मुदत, पॉलिसीचे फायदे वगैरे प्रमुख बाबी योग्य असल्याची खात्री करून घ्या.
पॉलिसीचे फायदे, अटी, शर्ती यात कोणतीही असमाधानकारक गोष्ट आढळल्यास पॉलिसी परत पाठवून भरलेला प्रीमियम (अल्पशा कपातीनंतर) परत मागण्याचा हक्क तुम्हाला आहे. हा हक्क पॉलिसी मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आतच बजावता येतो.
वेळेवर प्रीमियम भरून पॉलिसी चालू अवस्थेत ठेवा. अन्यथा, पॉलिसी बंद पडून इन्शुरन्सच्या मूळ हेतूलाच धक्का लागेल.
(लेखक निवृत्त विमा अधिकारी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.