सध्या अनेक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल माहिती आहे आणि बरेच जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. मागील एक ते दीड वर्षात शेअर बाजार वेगाने वर गेल्यामुळे सर्व गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा फायदा झालेला पाहायला मिळत आहे. पण बऱ्याच गुंतवणूकदारांशी बोलल्यानंतर एक भीती सर्वांच्या मनात जाणवली आणि ती म्हणजे या उच्चांकानंतर शेअर बाजार घसरला तर? त्यामुळे बऱ्याच जणांना बाजार पडण्यापूर्वी ‘प्रॉफिट बुक’ करण्याची गरज जाणवत आहे.
या भीतीवर माझ्याकडे एक पर्याय आहे. म्युच्युअल फंडांच्या ‘बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडा’च्या योजनेबद्दल अनेकांनी नक्कीच ऐकले असेल. यामध्ये तुम्हाला एकाच फंडात इक्विटी आणि डेट मधील योग्य प्रमाणातील गुंतवणूकमिश्रण मिळते. म्हणजे जेव्हा फंड मॅनेजरच्या अभ्यासानुसार, इक्विटीचे मूल्यांकन जास्त असेल तेव्हा इक्विटीमधील प्रमाण तो कमी करतो आणि डेट मधील प्रमाण वाढवतो. जेव्हा इक्विटीचे मूल्यांकन कमी असतील, तेव्हा इक्विटीमधील प्रमाण वाढवले जाईल आणि डेट मधील कमी होईल. त्यामुळे ज्यांना त्यांच्या इक्विटी फंडातील गुंतवणुकीत मोठा नफा दिसत असेल, तर त्यांनी त्यातील काही रक्कम अशा प्रकारच्या बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंडात ‘शिफ्ट’ करायला हरकत नसावी. म्हणजे काही कारणाने शेअर बाजारात पुढे जाऊन एखादी ‘करेक्टिव रॅली’ (घसरण) आली, तरी तुम्हाला आता झालेला नफा काहीसा सुरक्षित करून ठेवता येईल.
बाजारात काही कंपन्यांचे असे बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड आधीपासून आहेत. नुकताच एनजे म्युच्युअल फंडाने त्यांचा पहिला बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड ‘न्यू फंड ऑफर’च्या (एनएफओ) माध्यमातून बाजारात सुरू केला आहे. त्याचे नाव एनजे बॅलन्स्ड ॲडव्हांटेज फंड असून, हा ‘एनएफओ’ येत्या २२ ऑक्टोबर २०२१ रोजी बंद होणार आहे. या नव्या फंडाची काही विशिष्ट्ये आगळीवेगळी असल्याने त्याची दखल घ्यावीशी वाटते.
नव्या फंडाची वेगळी वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-
भारतातील पहिला ‘रूल बेस्ड ॲसेट ॲलोकेशन’ असलेला हा फंड आहे. म्हणजे येथे एक फंड मॅनेजर इक्विटी आणि डेट मधील प्रमाण ठरविणार नाही. यामध्ये काही ठराविक गोष्टी, जसे की इक्विटी व्हॅल्यूएशन, इंटरेस्ट रेट, जागतिक शेअर बाजारांचा आढावा अशा काही गोष्टी बघून आपोआप या फंडामधील इक्विटी आणि डेट मधील प्रमाण ठरविले जाईल. हे सर्व कॉम्युटराईज्ड सिस्टीमद्वारे होणार आहे.
या फंडातील इक्विटीच्या हिश्श्यामधील शेअरची निवड करण्याची पद्धत पण आगळीवेगळी आहे. शेअरची क्वॉलिटी, मोमेंटम, त्या शेअरमधील व्होलॅटॅलिटी या सर्व गोष्टी तपासूनच शेअर निवडला जाईल.
या फंडामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे इक्विटी आणि डेट मधील ‘रिबॅलन्सिंग’ उत्तम पद्धतीने होणार आहे.
वरील सर्व वैशिष्ट्ये आणि शेअर बाजाराची सध्याची उच्चांकी पातळी लक्षात घेऊन, आपल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत झालेल्या मोठ्या नफ्यातील काही रक्कम ‘ॲसेट ॲलोकेशन’ म्हणून अशा फंडात ‘शिफ्ट’ करणे योग्य ठरू शकते.
तसेच, बँकांतील मुदत ठेवींचे (एफडी) सध्याचे व्याजदर लक्षात घेता, अशा म्युच्युअल फंड योजनेत स्वतंत्रपणे एकरकमी गुंतवणूक करणे सुद्धा फायदेशीर ठरू शकते. अशा फंडात एकरकमी गुंतवणूक करून त्याला ‘सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन’ची (एसडब्ल्यूपी) जोड दिल्यास, दरमहा उत्पन्नाची चांगली सोय होऊ शकते. अर्थात, या क्षेत्रातील जाणकारांशी बोलूनच गुंतवणुकीच्या रकमेबाबतचा निर्णय घेणे हिताचे ठरते.
(लेखक म्युच्युअल फंडाचे प्रमाणित सल्लागार आहेत. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.