समाज माध्यमांवर ‘एलआयसी प्रीमिअम घेते, देत नाही’, ‘एलआयसीने विमाधारकांना रु. ६० ची सूट दिली गेली, पण शेअर बाजाराने मात्र रु. ८० ची सूट दिली,’ अशी तिरकस टिप्पणी केली गेली. यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवून छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांनी या घटनेकडे कसे बघावे, याबद्दल आपण ऊहापोह करणार आहोत...
भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) शेअरचे अखेर आपल्या शेअर बाजारात १७ मे रोजी आगमन झाले आणि बाजारमूल्याच्या दृष्टीने त्या शेअरने रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी, इन्फोसिस यांच्या मागोमाग पाचवे स्थान पटकाविले. स्टेट बँकेच्या बाजारमूल्याहून ४० टक्के अधिक बाजारमूल्यावर ‘एलआयसी’चा प्रवेश झाला आणि सर्वाधिक बाजारमूल्य असलेली सरकारी कंपनी अशी ओळख ‘एलआयसी’ला प्राप्त झाली. मात्र, मुंबई शेअर बाजारात हा शेअर आपल्या प्रारंभिक विक्री किमतीहून जवळपास ८ ते १० टक्के कमी किमतीस नोंदला गेल्याने गुंतवणूकदारांचा जरासा विरस झाला. त्यामुळे ज्यांचा ‘एलआयसी’च्या समभागविक्रीला विरोध होता, त्यांना सरकारच्या निर्णयावर टीका करण्याची संधी मिळाली. ‘दुभत्या गायीची हेळसांड झाली,’ अशा प्रतिक्रिया उमटल्या. समाज माध्यमांवर ‘एलआयसी प्रीमिअम घेते, देत नाही’, ‘एलआयसीने विमाधारकांना रु. ६० ची सूट दिली गेली, पण शेअर बाजाराने मात्र रु. ८० ची सूट दिली,’ अशी तिरकस टिप्पणी केली गेली. यातील विनोदाचा भाग बाजूला ठेवून छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांनी या घटनेकडे कसे बघावे, याबद्दल आपण ऊहापोह करणार आहोत...
भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘सेबी’कडे दाखल केलेल्या आपल्या ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’ची मुदत १२ मे रोजी संपत होती. त्यापूर्वी जर समभागविक्रीचे वेळापत्रक जाहीर झाले नसते तर पुन्हा नव्याने कागदपत्रे तयार करावी लागली असती. त्यात किमान सहा महिन्यांचा कालावधी गेला असता. रशिया-युक्रेन युद्ध, वाढता महागाईचा दर, रिझर्व्ह बँकेने वाढविलेले व्याजदर, रुपयाची घसरण यांचा परिणाम भांडवली बाजारावर होऊन बाजार १५ टक्के घसरला होता. बाजार खूपसा अनुकूल नसूनही, वरील कारणाचा विचार करून ‘एलआयसी’च्या शेअरची नोंदणी करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. मात्र, सध्याची बाजाराची स्थिती बघता, ही वेळ योग्य नव्हती, असेच म्हणावे लागेल. पण यावर आता चर्चा करणे वृथा आहे.
‘आयपीओ’ला मिळालेला प्रतिसाद
भांडवली बाजारास सुगीचे दिवस नसूनही ‘एलआयसी’च्या शेअरला गुंतवणूकदारांनी ‘न भूतो न भविष्यती’ असा प्रतिसाद दिला. २२.१३ कोटी समभागविक्री करायची असताना प्रत्यक्षात तिप्पट मागणी झाली. विमाधारकांनी रु. ८८९ किमतीस त्यांना राखीव असलेल्या २.२१ कोटी समभागांना सहा पटींहून जास्त मागणी नोंदविली, तर कर्मचाऱ्यांनी चार पटींहून अधिक, छोट्या गुंतवणूकदारांनी दुप्पट, रु. दोन लाखांहून अधिक मागणी करणाऱ्या श्रीमंत गुंतवणूकदारांनी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जवळपास तिप्पट मागणी नोंदविली.
शेअरची प्रत्यक्ष नोंदणी
अनधिकृत बाजारात (ग्रे मार्केट) रु. ९० इतक्या अधिमूल्यावर राहिलेला हा शेअर नोंदणी होण्याच्या वेळी म्हणजे १७ मे रोजी रु. २५ इतक्या सवलतीत मोजला जात होता. प्रत्यक्षात सकाळी १० वाजता हा शेअर रु. ८७२ या किमतीस म्हणजे रु. ७७ किंवा ८ टक्के कमी मूल्यावर नोंदला गेला आणि बाजार बंद झाला, तेव्हा तो रु. ८७५ वर होता. समभागविक्रीला इतका प्रचंड प्रतिसाद मिळूनही बाजारात हा शेअर अधिमूल्यावर का नोंदला गेला नाही, असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. याचे कारण असे, की १७ मे पूर्वीच्या सात पैकी लागोपाठच्या सहा दिवशी आधीच्या दिवशीच्या बंदपेक्षा ‘सेन्सेक्स’ रोज घसरत होता. रिझर्व्ह बँकेची व्याजदरवाढीची घोषणा, रशिया-युक्रेन युद्ध, परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सातत्याने केलेली विक्री, रुपयाची घसरण अशा काही कारणांनी अपेक्षित किमतीस हा शेअर बाजारात प्रवेश करू शकला नाही. एवढे असूनही विमाधारकांना रु. ८८९ ला हा शेअर मिळाला असल्याने त्यांचे प्रतिकात्मक नुकसान केवळ रु. १४ (दीड टक्का), तर छोट्या गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिकात्मक नुकसान रु. २९ (३ टक्के) इतके अल्प झाले. शुक्रवारी म्हणजे २० मे रोजी याचा बंद भाव होता रु. ८२६ म्हणजे विमाधारकांचे ७ टक्के, तर छोट्या गुंतवणूकदारांचे ९ टक्के प्रतिकात्मक नुकसान झालेले दिसते.
छोट्या गुंतवणूकदारांना सल्ला
सध्याची बाजाराची स्थिती लक्षात घेता नजीकच्या काळात ज्या भावाने हा शेअर मिळाला, ती किंमत बाजारात येण्यास वेळ लागेल, असे दिसते. अशा वेळी छोट्या गुंतवणूकदारांनी घाबरून जाऊन या शेअरची विक्री करणे हितावह नाही, असे सांगावेसे वाटते. ‘एलआयसी’च्या शेअरमध्ये आपण काही आपली सर्व कमाई लावलेली नाही. तेव्हा घाबरून जाऊन विक्री करू नये. रोज शेअरचा भाव बघू नये. ‘एलआयसी’चा कारभार सुस्थितीत असल्यानेच आपण त्या कंपनीचे शेअर घेतले आहेत, हे लक्षात ठेवावे. त्यामुळे किमान ३ ते ५ वर्षे थांबायची तयारी ठेवावी. हा शेअर दीर्घकाळात निश्चितपणे लाभ मिळवून देईल, असे वाटते. ‘स्टॉपलॉस’ची संकल्पना शेअर बाजारात ठेवणे नेहमीच गरजेचे असते. २० टक्के ‘स्टॉपलॉस’ ठेवावा. हा शेअर इतका कमी होईल, असे वाटत नाही. पण जर काही कारणाने नुकसान २० टक्के झाले, तर नुकसान सोसून सुद्धा शेअर विकून टाकावा, हे तत्व अवलंबावे. तसेच कोणतीही वस्तू जेव्हा कमी किमतीस उपलब्ध असते, तेव्हा आपण ती खरेदी करतो. हेच तत्व शेअर बाजारातही अवलंबायला हरकत नाही.
‘जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी’ या ‘एलआयसी’च्या ब्रीदवाक्याप्रमाणे हा शेअर अपेक्षापूर्ती करेल, अशी आशा करूया.
- नीलेश साठे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.