नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या आर्थिक नियोजनावर मोठं संकट कोसळलं आहे. या काळात अनेकांचा रोजगार गेला आहे तर काहींची आयुष्यभराची बचत ही कोरोनाच्या उपचारांसाठी वापरुन संपुष्टात आली आहे. सरकारने कोरोना उपचाराचे दर ठरवून दिलेले असतानाही खासगी हॉस्पिटल्समध्ये अव्वाच्या-सव्वा दर आकारत असल्याचं चित्र आहे. त्यामुळेच लोक आता नाईलाजाने आपल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम वापरण्याच्या पर्यायाचा विचार करत आहेत. खरं तर भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम ही निवृत्तीनंतरच्या म्हातारपणाच्या आयुष्याची पूंजी मानली जाते. गेल्या सोमवारीच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) आपल्या ग्राहकांना यासंदर्भातील दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लाभार्थ्यांना आपल्या पीएफ अकाउंटमधून दुसऱ्यांदा नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्सची रक्कम काढता येणार आहे. (PF Covid 19 advance rule When should you consider dipping into your EPF)
या निर्णयानुसार, सोमवारी श्रम मंत्रालयानं देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमध्ये त्रासलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा नॉन-रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हान्स काढण्याची परवानगी दिली आहे. ईपीएफओच्या नव्या नियमानुसार, खात्यात जमा रक्कमेच्या 75 टक्के म्हणजेच तीन महिन्यांच्या पगाराइतकी (बेसिक पगार आणि महागाई भत्ता) रक्कम खात्यातून काढता येणार आहे. कोविड-19 अंतर्गत ऑनलाइन दाव्यांवर ऑटो मोडनुसार क्लेम सेटल करण्यात येत आहेत. त्यामुळे केवळ 72 तासांत पैसे आपल्या खात्यात जमा होत आहेत. सध्या ईपीएफओचे 6 कोटी खातेधारक आहेत. 1 एप्रिल 2020 पासून 12 मे 2021 पर्यंत 72 लाख कर्मचाऱ्यांनी एकूण 18,500 कोटी रुपयांचा नॉन रिफंडेबल कोविड-19 अॅडव्हन्सचा लाभ घेतला आहे. आर्थिक वर्ष 2021 मध्ये ईपीएफओने सुमारे 1.63 कोटी खातेधारकांना 81,200 कोटी रुपयांचे क्लेम सेटल केले आहेत.
31 मे 2021 पर्यंत ईपीएफओने 76.31 लाखांहून अधिक कोविड एडव्हान्सच्या रकमेचे दावे मंजूर केले आहेत. आणि त्यातून एकूण 18,698.15 कोटी रुपये वितरित केले आहेत, असे एका सरकारी निवेदनात म्हटले आहे. गेल्या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत ईपीएफओने कोविडच्या महासंकटानंतर आगाऊ सुविधेअंतर्गत 14,310.21 कोटी रुपयांचे 56.79 लाख दावे मंजूर केले होते.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ईपीएफवर मिळणारे व्याज हे बँकेतील इतर बचत ठेवींच्या योजनांमध्ये मिळणाऱ्या व्याजाहून अधिक असते. 2020-21 या आर्थिक वर्षांत तर ईपीएफवर 8.5 टक्के व्याजदर लागू आहे. जो इतर कोणत्याच बचतीच्या योजनांमध्ये मिळत नाही. शिवाय निवृत्तीनंतर प्राप्त होणारी रक्कम ही करमुक्त असते. ईपीएफची रक्कम ही एखाद्या कर्मचाऱ्याच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या नियोजनासाठी साठवलेली रक्कम असते. त्यामुळे जोवर फार मोठं आर्थिक अरिष्ट येत नाही, तोवर ही रक्कम काढण्याचा विचार केला जाऊ नये, असं जाणकार सांगतात. ही रक्कम आपल्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीच वापरली तरच तिचा योग्य परतावा आणि लाभ मिळण्याची शक्यता असते.
अत्यंत मोठी अडचण असल्याखेरीज व पैशांचे अन्य सर्व मार्ग संपल्याखेरीज पीएफ मधील रक्कम काढू नका, असे अर्थसल्लागार नेहमीच सांगतात. या योजनेनुसार काढलेली रक्कम पीएफ मध्ये पुन्हा गुंतवता येणार नसल्याने त्यावरील चक्रवाढ व्याजाला मुकावे लागेलच. पण त्याशिवाय निवृत्तीनंतर मिळणारी करमुक्त, कोणताही धोका नसलेल्या व सरकारची हमी असलेल्या योजनेतील मोठी रक्कम बुडते, असेही अर्थतज्ञ दाखवून देतात. अगदी मोठी वैद्यकीय आणिबाणी असेल तरच ही रक्कम काढा, अन्यथा पुढचा काळ कठीण असल्याने आताच ही रक्कम संपवू नका, असे गुंतवणुक सल्लागार विनायक कुलकर्णी यांनी सकाळ ला सांगितले. येते एक-दीड वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत खडतर असेल, त्यामुळे नोकरदारांनी सध्या कसेही करून भागवावे, नंतर अगदीच काही नसेल तर हा विचार करता येईल. सध्या लग्न आदी आवश्यक बाबीही कमी खर्चात कराव्यात, अन्य खर्च पुढे ढकलावेत. अगदीच गरज असेल तर पीएफ ची रक्कम न काढता घरातले सोने विकले तरीही चालू शकेल, असेही तज्ज्ञ सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.