फार्मा फंडाची ‘मात्रा’ दीर्घकाळात गुणकारी

औ षधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर गुंतवणुकीसाठी तुलनेने सुरक्षित मानले जातात.
फार्मा
फार्मा sakal
Updated on

औ षधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर गुंतवणुकीसाठी तुलनेने सुरक्षित मानले जातात. आरोग्याविषयी वाढत चाललेली जागरूकता, वाढते आयुर्मान, नवनवीन आजारांवरील बाजारात येणारी औषधे या कारणांमुळे या इंडस्ट्रीचा आकार गेल्या काही वर्षांत वेगाने वाढला आहे. यामुळेच औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळासाठी असावेत असे गुंतवणूक सल्लागार सांगतात

ज्या गुंतवणूकदारांना थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे शक्य नसते असे गुंतवणूकदार फार्मा म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून त्याचा लाभ घेतात. या फंडांची सन फार्मा, डॉ. रेड्डीज, डिवीस लॅब्स, सिप्ला, अपोलो हॉस्पिटल या आणि औषधनिर्माण क्षेत्रातील इतर अनेक चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक आहे. २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीनंतर औषध कंपन्या अधिकच चर्चेत आल्या, त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आणि कंपन्यांचे उत्पन्न वाढले. या सगळ्याचे प्रतिबिंब फार्मा म्युच्युअल फंडात पडले. गेल्या तीन वर्षातील या फंडांची कामगिरी उठावदार झाली.

गेल्या तीन वर्षात चांगली कामगिरी करणारे काही फार्मा फंड पुढीलप्रमाणे आहेत. माहितीसाठी त्यांची गेल्या एका वर्षातील कामगिरीसुद्धा दिली आहे.

वरील कोष्टकावरून लक्षात येते, की सर्वच फंडांची गेल्या तीन वर्षातील कामगिरी अतिशय चांगली आहे; मात्र गेल्या वर्षात या फंडातील गुंतवणूकदारांना तोट्याला सामोरे जावे लागले आहे. वाढती स्पर्धा, कच्च्या मालाचे वाढलेले भाव, वाढत्या उत्पादन खर्चामुळे नफ्यावर आलेला दबाव या कारणांमुळे फार्मा कंपन्यांचे शेअर आणि म्युच्युअल फंड गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी करू शकले नाहीत. अर्थात ही परिस्थिती कायम राहील असे नाही. या सर्व अडथळ्यांवर मात करून दीर्घकाळात या कंपन्यांना पुन्हा एकदा झळाळी प्राप्त होईल.

गुंतवणूकदारांनी काय करावे ?

सेक्टरल फंडात एकाच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम असते. त्या क्षेत्राची भरभराट झाली तर गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो; पण काही कारणांनी त्या क्षेत्राची कामगिरी खालावली तर त्याचा मोठा फटका गुंतवणूकदारांना बसतो. फार्मा फंडात गुंतवणूक करताना ही बाब गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवावी. अर्थात फार्मा फंडांचा एक वर्षाचा परतावा उणे (निगेटिव्ह) आहे म्हणून या फंडात पूर्वी केलेली गुंतवणूक तोट्यात विकून टाकू नये. खरेतर आता पडलेल्या भावात खरेदी करण्याची संधी या दृष्टीने याकडे पहावे.

त्यापूर्वी त्या फंडाचा अभ्यास करावा आणि गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. उदाहरणार्थ वरील कोष्टकात निप्पोन इंडिया फार्मा फंड (ग्रोथ) या फंडातील ऑगस्ट २०२१ ते जुलै २०२२ या एका वर्षातील गुंतवणुकीवर १० टक्के तोटा दिसत असला तरी ऑगस्ट २०१९ ते जुलै २०२१ या कालावधीत या गुंतवणुकीवर वार्षिक ५० टक्के फायदा दिला आहे हे आपल्याला अभ्यासातून कळेल. टाटा इंडिया फार्मा अँड हेल्थकेअर फंड (ग्रोथ) या फंडाचा गेल्या एका वर्षातील तोटा सात टक्के दिसत असला, तरी या फंडाने गेल्या पाच वर्षात सरासरी १५ टक्के वार्षिक परतावा दिला आहे हे सुद्धा अभ्यासाने लक्षात येईल. म्हणजेच संबंधित फंडाची केवळ एका वर्षातील कामगिरी न पाहता त्यापूर्वीच्या कामगिरीचादेखील अभ्यास करावा.

फार्मा फंडात गुंतवणूक करताना एसआयपी आणि एकरकमी गुंतवणूक यांचे योग्य मिश्रण ठेवावे जेणेकरून बाजारातील हेलकाव्यांचा योग्य फायदा करून घेता येईल. सर्वांत महत्वाचे म्हणजे फार्मा फंडात गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवावा कारण फार्मा फंडातील गुंतवणूकरूपी औषधाची ‘मात्रा’ दीर्घकाळात अधिक गुणकारी ठरते असे आत्तापर्यंतची आकडेवारी सांगते.

( लेखक म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजाराचे अभ्यासक आहेत )

फंडाचे नाव तीन वर्षांतील सरासरी वार्षिक परतावा एका वर्षातील परतावा

निप्पॉन इंडिया फार्मा फंड (ग्रोथ) २७ % (-) १० %

टाटा इंडिया फार्मा अँड हेल्थकेअर फंड (ग्रोथ) २४ % (-)८ %

आयसीआयसीआय प्रु. फार्मा,

हेल्थकेअर अँड डायग्नोसिस फंड (ग्रोथ ) २७ % (-) ८ %

आदित्य बिर्ला सनलाईफ फार्मा अँड हेल्थकेअर फंड (ग्रोथ) २०% (-)१२ %

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.