नवी दिल्ली: कोरोनामुळे देशात जवळपास पाच महिने लॉकडाऊन होते. याकाळात देशातील जवळपास सर्व व्यवहार, व्यवसाय आणि सेवाक्षेत्र बंद होते. यामुळे देशाचा GDP देखील मोठा कोसळला होता. पण आता देशात अनलॉक सुरु केल्यापासून परिस्थिती थोडीफार सुधारताना दिसत आहे. लॉकडाऊननंतर भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोन विक्रीत वार्षिक आधारावर मागील तिमाहीत तब्बल 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
2020च्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत 5 कोटी स्मार्टफोनची विक्रीची नोंद झाली आहे. कॅनॅलिस या रिसर्च फर्मच्या रिपोर्टनुसार, ही आतापर्यंतच्या कोणत्याही तिमाहीतील सर्वोच्च विक्री आहे. तर 2019च्या याच तिमाहीत एकूण 4.62 कोटी स्मार्टफोन विकले गेले होते.
रिपोर्टनुसार मागील तिमाहीत शाओमी, सॅमसंग, विवो, रिअल्मी आणि ओप्पो या टॉप-5 स्मार्टफोन कंपन्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. कंपनीचे विश्लेषक अद्वैत मार्डिकर यांनी सांगितले की, भारतात मागील तीन महिन्यांपासून अनलॉक केले जात असल्याने या कंपन्यांच्या विक्रीत वाढ दिसली आहे.
कंपनी | विक्री | बाजारातील हिस्सा |
शाओमी | 1.31कोटी | 26.1 टक्के |
सॅमसंग | 1.02 कोटी | 20.4 टक्के |
विवो | 88 लाख | 17.6 टक्के |
रियल्मी | 87 लाख | 17.4 टक्के |
ओप्पो | 61 लाख | 12.4 टक्के |
ऍपल | 8 लाख |
याकाळात केंद्र सरकार अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी वारंवार प्रयत्न करत आहे. सरकार उद्योगवाढीसाठी चांगले वातावरण निर्माण करत असल्याचेही दिसत आहे. याचा परिणाम सर्व स्मार्टफोन कंपन्यांच्या विक्रीवर दिसून आला असून त्यांच्या खपात प्रचंड वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात अधिक विक्री अपेक्षित असते. ई-कॉमर्स कंपन्यांनी नुकत्याच झालेल्या सणासुदीच्या काळात तब्बल 1.10 कोटी मोबाइल फोन विकले आहेत.
भारतीय बाजारपेठेतील चिनी कंपन्यांचा हिस्सा 2 टक्क्यांनी वाढला-
रिपोर्टनुसार, चिनी मोबाइल कंपन्यांचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा मागील वर्षाच्या तुलनेत 2020 मधील तिमाहीत 2 टक्क्यांनी वाढून 76 टक्क्यांवर पोहोचला आहे. 2019मध्ये याच तिमाहीत चिनी कंपन्यांचा हिस्सा 76 टक्के होता. याअगोदर सीमावादामुळे जून तिमाहीत चिनी वस्तूंची खरेदी कमी झाली होती. तब्बल 14 टक्क्यांची घसरण चिनी वस्तूंच्या खरेदीत झाली होती.
प्रतिमा सुधारण्यात गुंतलेले ब्रँड-
कॅनॅलिस रिसर्चचे विश्लेषक कन्नन यांच्या मते, मागील काही महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यात सतत तणाव असूनही ग्राहकांच्या खरेदीवर फारसा परिणाम झालेला नाही. मात्र, याचा परिणाम चिनी स्मार्टफोन ब्रँडच्या धोरणावर झाला आहे. ते व्यवसायासाठी पुराणमतवादी पद्धतींचा अवलंब करून खर्चात कपात करत आहेत.
त्याचबरोबर ते आपली प्रतिमा सुधारण्यात काळजीपूर्वक गुंतलेले दिसत आहेत. या कंपन्यांचा असा विश्वास आहे की भारताच्या आर्थिक विकासात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, पण त्यांची विक्री वाढवण्यासाठी काही बदल करावे लागतील.
(edited by- pramod sarawale)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.