रिझर्व्ह बँकेने ता. एक नोव्हेंबरपासून सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) म्हणजेच ‘डिजिटल रुपी’ हे कागदी नोटा, मेटल नाण्यांसारखेच; परंतु इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असणारे नवीन पर्यायी चलन प्रायोगिक तत्त्वावर जारी केले आहे. ते भारतीय बाजारात दोन स्वरूपांत आणले जाणार आहे. सीबीडीसी-आर म्हणजेच सामान्य व्यवहारांसाठी आणि सीबीडीसी-डब्ल्यू म्हणजेच घाऊक व्यवहारांसाठी. यातील व्यवहारांसाठी नऊ बँकांची निवड करण्यात आली आहे. यात स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसीचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य व्यवहारांबाबत तीस दिवसानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
चलन कसे मिळेल?
सध्या एक रुपयाच्या कागदी किंवा मेटल रूपयासाठी एक डिजिटल रुपी अशा विनिमय दराने बँकांकडून खरेदी करून हे चलन मिळू शकते. भावी काळात, व्यक्ती पगारदार असल्यास त्याला पगाराद्वारे, आणि व्यावसायिक असल्यास मिळणारे उत्पन्न डिजिटल रुपीमध्ये मागता येईल व देणाऱ्याला ते रिझर्व्ह बँक वा इतर बँकाकडून खरेदी करून द्यावे लागेल. भावी काळात सरकारी; तसेच मोठ्या करदात्यांची पेमेंट्स डिजिटल रुपीमार्फत झाल्यास असे डिजिटल चलन मुबलक प्रमाणात बाजारात येईल.
भीम, गुगल-पे किंवा फोन-पेपेक्षा वेगळे
भीम, गुगल-पे किंवा फोन-पेसारख्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या व्यवहारांमध्ये बँकिंग प्रणालींचा वापर असतो. त्यात वापरकर्त्यांना त्यांची खाती यूपीआयशी वा फोनबरोबर लिंक करणे आवश्यक असते. मात्र, सीबीडीसीमध्ये बँकिंग प्रणालीचा वापर होणार नसल्यामुळे बँकेत खाते असणे आवश्यक असणार नाही. या चलनाचे व्यवहार वित्तीय संस्थांऐवजी मध्यवर्ती बँकेवर म्हणजेच, रिझर्व्ह बँकेशी थेट होणार आहेत. विश्वासार्ह मानल्या गेलेल्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित पद्धतीवर वा डिस्ट्रिब्युटेड लेजर अकौंट पद्धतीवर होणार असल्याने डिजिटल रुपी इतर पद्धतीपासून वेगळा आहे. क्रेडिट कार्डमध्येही अगोदर ग्राहकास क्रेडिट दिले जाते व नंतर उचल केली जाते, तर डिजिटल रुपीमध्ये अगोदर चलन खरेदी करावे लागेल व नंतर वापरता येईल.
डिजिटल करन्सीची वैशिष्ट्ये
ग्राहकाने बँकेत ठेवलेले पैसे ही बँकेची जबाबदारी असते. मात्र, डिजिटल करन्सी ही सरळ रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे. बँकेत पैसे ठेवायला किंवा वापरायला बँक खात्याची आवश्यकता असते. मात्र, डिजिटल करन्सीच्या वापरासाठी बँक खात्याची आवश्यकता नाही. बँक बुडाली, तर ग्राहकांचे पैसे अडकतात. मात्र, डिजिटल करन्सीमध्ये तुम्हाला अशा अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
हे चलन रिझर्व्ह बँकेने सुरू केले आहे आणि ते केवळ त्यांच्याद्वारे नियंत्रित केले जाणार आहे, त्यामुळे किंमत स्थिर राहणार आहे. डिजिटल रुपी ‘व्यवहारावर आधारित’ आहे. त्यामुळे ते क्रिप्टो करन्सीसारखे ‘गुंतवणूक’ म्हणून खरेदी करून ठेवणे इष्ट ठरणार नाही. क्रिप्टोची किंमत मागणी व पुरवठ्यावर ठरत असल्याने त्यात मोठे चढ-उतार असू शकतात व त्यामुळे भांडवलवृद्धी संभवते. तथापि, भारतात हे आभासी चलन अवैध मानले गेले आहे, तर डिजिटल रुपी पूर्णतः वैध आहे. क्रिप्टो खासगी उपक्रम आहे, ज्यामुळे त्यात खूप धोका आहे, तसा डिजिटल रुपीमध्ये नाही- कारण हे सार्वभौम चलन आहे.
डिजिटल रुपीचे फायदे
रिझर्व्ह बँकेचे डिजिटल चलनावर पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट भारताला आभासी चलनांच्या शर्यतीत पुढे नेणे आहे. डिजिटल रुपीची घोषणा निःसंशयपणे गेमचेंजर ठरेल. कारण डिजिटल रुपी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढेल. याव्यतिरिक्त, ब्लॉकचेन खात्यांची देखभाल आणि रिअल-टाइम ट्रॅकिंग शक्य करेल. घाऊक आणि किरकोळ ग्राहक कधीही पेमेंट प्रणालीचा वापर करू शकतील. भारतीय ग्राहक थेट पैसे देऊ शकतील, व्यवहार खर्च वाचवू शकतील. रिअल-टाइम खाते सेटलमेंट सक्षम करू शकतील. याव्यतिरिक्त, सीमापार व्यवहारांना गती मिळेल आणि बँक खाते उघडण्याची गरज दूर होईल.
डिजिटल मनीचे धोके
पेमेंट फसवणूक ही महत्त्वाची जोखीम आहे. ही फसवणूक अनेक प्रकारांमध्ये केली जाऊ शकते. तथापि, सर्वसाधारणपणे, यात सायबर गुन्हेगाराने पूर्ण केलेल्या फसव्या किंवा अनधिकृत व्यवहारांचा समावेश होतो. फसवी देयके, बेकायदा पेमेंट, डेटा चोरी, निर्बंध आणि मंजुरींचे उल्लंघन अशा गोष्टी होऊ शकतात.
पैसे भौतिकरित्या हस्तांतरित केले जात नसल्यामुळे, व्यवहाराच्या दुसऱ्या बाजूला कोण आहे हे जाणून घेणे अशक्य असते. यामुळे सायबर गुन्हेगारांना संवेदनशील माहिती मिळवण्याची किंवा फसवणुकीची संधी मिळते.
सायबर गुन्हेगार धूर्त होत चालले आहेत, सतत नवीन कमकुवतपणाचे शोध घेत आहेत आणि डिजिटल पैशांमध्ये फेरफार करण्याच्या विविध पद्धती शोधत आहेत. स्कॅमर पेमेंट सिस्टमवर हल्ला करण्याचे खूप चिकाटीने प्रयत्न करीत असतात, असे निदर्शनास आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.