म्युच्युअल फंड : बिझनेस सायकल फंड : काळाच्या कसोटीवर खरे ठरेल

Mutual Fund
Mutual Fund
Updated on

आपण जसे वेगवेगळे ऋतुचक्र अनुभवतो, अगदी तसेच अर्थव्यवस्थाही वेगवेगळ्या चक्रांतून जात असते. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत चार प्रमुख टप्पे लक्षात घेतले पाहिजेत. तेजी आणि फेरउभारीच्या टप्प्यांमध्ये अर्थव्यवस्थेच्या तुलनेने चांगली कामगिरी आपण अनुभवतो, तर मंदी आणि पीछेहाटीच्या टप्प्यांत एकूण अर्थचक्र आणि कामकाजातही नरमाई जाणवते. 

अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये फरक हाच, की या प्रत्येक टप्प्याचा आणि संपूर्ण व्यापारचक्राचा कालावधी हा केव्हाही एकसारखा नसतो. त्यामुळे कोणता टप्पा केव्हा सुरू होईल आणि केव्हा संपेल, याबाबत अनुमान करणे कठीण असते. व्यापारचक्रात बदल झाल्याचे सूचित करणारे काही निश्‍चित संकेत मात्र आहेत. उदा. बँकांच्या पतपुरवठ्यात वाढ आणि कंपन्यांकडून भांडवली वस्तूंच्या मागणीत वाढ, हे फेरउभारीच्या टप्प्याची सुरुवात झाल्याचे सूचित करतात. याउलट महागाईचा भडका आणि व्याजदर चढे राहणे, हे तेजीच्या टप्प्याचा शेवट नजीक आल्याचे निर्देशक मानले जातात. परंतु, हे संकेत आणि वास्तविक बदल या दरम्यानचा कालावधी सांगता येणे कठीण आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एकंदर, आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्था ज्या चक्रात आहे, त्या आधारावर फंड मॅनेजर गुंतवणुकीसाठी योग्य क्षेत्राबाबत निर्णय घेतात. अगदी चांगल्या काळातही एखाद्या क्षेत्रातील सर्वच कंपन्या चांगली कामगिरी करू शकत नसल्यामुळे फंड मॅनेजरला त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या संशोधन समितीच्या मदतीने योग्य तो निर्णय घेण्याची सोय आणि कौशल्य असते. त्यामुळे पुढची पायरी ही मजबूत कंपन्यांवर लक्ष केंद्रित करण्याची आहे.

गुंतवणुकीचा हा दृष्टिकोन पाहता, अशा तऱ्हेने तयार होणारा पोर्टफोलिओ हा बाजारपेठेच्या आवर्तनाचा सामना करण्यासाठी आणि बाजारातील उपलब्ध संधीचे भांडवल करण्यासाठी सक्षम असेल, याची गुंतवणूकदारांना खात्री बाळगता येईल.

व्यापारचक्राचे अनुसरण करणाऱ्या फंडामध्ये उद्योग क्षेत्रातील अशा मजबूत कंपन्यांचा संचय असल्यास, अन्य कोणत्याही मापदंडाऐवजी अर्थव्यवस्थेच्या बदलत्या टप्प्याच्या आधारावर त्या चांगली कामगिरी करतील. त्यामुळे अशा फंडाच्या पोर्टफोलिओत अधिकाधिक उद्योग क्षेत्रांचा अंतर्भाव असेल आणि त्या त्या क्षेत्रांमधील वैविध्यपूर्ण कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची धारणा असेल. सेक्टोरल अथवा थीमॅटिक गुंतवणूक धोरणाच्या विपरीत व्यापारचक्र (बिझनेस सायकल) या थीमवर आधारित गुंतवणूक तुलनेने स्थिर असेल. व्यापारचक्रात बदलानुसार उद्योग क्षेत्रात बदल होत राहतील. समिष्ट अर्थव्यवस्थेच्या स्थितीवर आधारित निर्णय घेणाऱ्या फंडात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘बिझनेस सायकल’ अर्थात व्यापारचक्रावर आधारित फंड सर्वोत्तम पर्याय ठरतात.

उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, सध्या अशा स्वरूपाचा नवा फंड (एनएफओ) आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड कंपनीने बाजारात आणला असून, तो १२ जानेवारीपर्यंत खुला आहे. 

डिस्क्लेमर - म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणुकीचा निर्णय घेण्याआधी संबंधित योजनेविषयीची कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

  • अर्थव्यवस्थेचा प्रवासही वेगवेगळ्या व्यापारचक्रांतून.
  • व्यापारचक्रांतील बदलानुसार उद्योग क्षेत्रात बदल.
  • अर्थव्यवस्थेचा प्रत्येक टप्पा आणि व्यापारचक्र एकसारखे नसते.
  • आर्थिक परिस्थिती आणि अर्थचक्राच्या आधारावर निर्णय हवा.
  • व्यापारचक्रावर आधारित फंड सर्वोत्तम पर्याय 
  • पोर्टफोलिओत अशा फंडाचा समावेश हितकारक ठरू शकतो.

(लेखक ‘ओप्यलन्स मनी’चे संचालक आहेत.)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.