स्मार्ट माहिती : आता पुढे काय?

नुकताच ‘सेन्सेक्स’ या शेअर निर्देशांकाने ५६,००० अंशांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा असली तरी पुढे बाजारात काय करावे, हा सर्वसामान्यांना पडत असलेला प्रश्न आहे.
Share Market
Share MarketSakal
Updated on

नुकताच ‘सेन्सेक्स’ या शेअर निर्देशांकाने ५६,००० अंशांचा महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. त्यामुळे सगळीकडे याची चर्चा असली तरी पुढे बाजारात काय करावे, हा सर्वसामान्यांना पडत असलेला प्रश्न आहे. निर्देशांक बघून गुंतवणुकीसंदर्भातील निर्णय घेण्यापेक्षा, कुठे परतावा जास्त मिळण्याची शक्यता आहे, ते बघूनच गुंतवणूक करावी. तसेच जिथे खूपच चांगला परतावा मिळत आहे, तिथे अंशतः नफा काढून घेणे इष्ट ठरेल.

आता सगळीकडे ‘अनलॉक’चे वारे वाहात आहेत. त्यामुळे येणारे तिमाही निकाल हे सुखावह असू शकतात. त्या अनुषंगाने शेअर निवडून गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. केवळ निर्देशांक विक्रमी वाढला म्हणून आनंदी होण्यापेक्षा आपला नफा कसा वाढेल, या हिशोबाने अभ्यासपूर्ण शेअरची निवड करावी.

एकूणच शेअर बाजाराबद्दल सर्वसामान्यांना आकर्षण असते. परंतु, त्यात सहभागी होऊन नफा कमविणे हे तेवढे सोपे नसते. केवळ ‘टीप’ घेऊन व्यवहार करणे कटाक्षाने टाळावे, तसेच अज्ञात लोकांकडून आलेले मेसेज, व्हॉट्स ॲप मेसेज यांच्यावर आलेले सल्ले वाचून गुंतवणुकीचे निर्णय अजिबात घेऊ नयेत. कारण असा फुकट मिळणारा सल्ला शेअर बाजारात खूप महाग पडू शकतो, याची जाणीव ठेऊन स्वतः थोडी माहिती घेऊन केलेली गुंतवणूक फलदायी ठरते.

मागील महिनाभरात निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत असताना मिड आणि स्मॉल कॅप शेअरमध्ये बऱ्यापैकी पडझड दिसली. अनेक शेअर हे या काळात ३० टक्क्यांनी देखील खाली आले. अशा नफेखोरीमुळे खाली आलेले; परंतु बाकी सर्व बाबतीत (फंडामेंटल्स) उत्तम असलेल्या अशा शेअरवर आपली अभ्यासपूर्ण नजर नक्कीच असायला हवी. चांगल्या शेअरमध्ये कोणत्याही कारणाने जेव्हा मंदी किंवा घसरण येते, तेव्हा ती असे शेअर घेण्यासाठीची संधी समजायला हवी.

सोबतच्या यादीतील शेअर हे त्यांच्या नुकत्याच गाठलेल्या उच्चांकी पातळीपासून बऱ्यापैकी खाली आहेत. या शेअरचा वाचकांनी आढावा घ्यावा. ही यादी म्हणजे थेट खरेदीचा सल्ला नव्हे, तर फक्त वाचकांच्या अभ्यासासाठी आहे. कारण गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे हितावह असते.

कंपनीचे नाव सध्याचा भाव उच्चांकी भावापासून घसरण (%)

महिंद्रा फायनान्स १५५ ३०

एजिस लॉजिस्टिक्स २७० ३०

कल्याण ज्वेलर्स ६३ ३०

किर्लोस्कर ऑईल २०८ २५

लुमॅक्स टेक १३९ २४

रॅमको इंडस्ट्रीज २९१ २१

टाटा कॉफी १९५ २१

शेअर बाजाराने गाठलेला छप्पन हजारांचा टप्पा ही मोठी गोष्ट आहे. बाजार वर-खाली होतच असतो. अशा वेळी आपण योग्य संधी शोधून नफा मिळविल्यासच या वाढलेल्या निर्देशांकाच्या आनंदात आपणासही सहभागी होता येईल.

(लेखक शेअर बाजारातील गुंतवणुकीचे अनुभवी सल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.