गुंतवणूक हा विषय निघाला की बहुतांश तरुण गुंतवणूकदारांच्या डोळ्यासमोर शेअर बाजारच येतो. अनेक तरुण हल्ली गुंतवणूकीची सुरूवात करताना शेअर बाजारात पैसे गुंतवूनच सुरूवात करतात. मात्र गुंतवणूकीकडे बघण्याची ही चुकीची पद्धत आहे. इक्विटी किंवा शेअर बाजार हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय नक्कीच आहे. मात्र या प्रकारातील गुंतवणूक ही गुंतवणूकीची सर्वात शेवटची पायरी आहे. त्याआधी टप्प्या टप्प्याने आणि संयमाने इतर गुंतवणूक प्रकारांमधून आपण गुंतवणूक करायला हवी. यामुळे तुमच्या गुंतवणूकीतील जोखीम कमी होते आणि या विषयाचे चांगले आकलन होण्यास, आर्थिक शिस्त लागण्यास मदत होते.
श्रीमंत होणे किंवा संपत्ती निर्मिती ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. चटकन पैसे गुंतवून लगेचच भरपूर परतावा मिळवून श्रीमंत होण्याची अपेक्षा बाळगणे बहुतांश वेळा आर्थिक संकटाकडेच घेऊन जाते. गुंतवणूकीचा सुरूवात करताना सुरक्षित मात्र तुलनेने कमी परतावा देणाऱ्या पारंपरिक गुंतवणूक प्रकारांनी सुरूवात करणे केव्हाही योग्य. कारण गुंतवणूक करताना जोखीम आणि परतावा या दोन्ही मुद्द्यांचे एकत्रित भान राखणे खूप महत्त्वाचे असते. बऱ्याचवेळा फक्त परताव्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
1. गुंतवणूक करताना लक्षात घ्यायची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व गुंतवणूक एकाच गुंतवणूक प्रकारात किंवा अॅसेट क्लासमध्ये करू नका. विविध गुंतवणूक प्रकारात आपली गुंतवणूक विभागलेली असली पाहिजे. कोणत्या गुंतवणूक प्रकारात किती गुंतवणूक असावी ही गोष्ट तुमचे वय, जोखीम क्षमता, उत्पन्न, आर्थिक उद्दिष्टे या घटकांवर अवलंबून असते. त्यासाठीच चांगल्या आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घ्यावे.
2. बँकेतील मुदतठेवी, अल्पबचत योजना, पोस्टातील योजना हे गुंतवणुकीचे प्रकार तुलनेने सर्वाधिक सुरक्षित पर्याय असतात. अर्थातच यातून मिळणारा परतावा हाही माफकच असतो. मात्र या प्रकारच्या गुंतवणूक पर्यायांमुळे आपला गुंतवणूकीचा पोर्टफोलिओ संतुलित होतो. कारण पुढच्या टप्प्यात आपण अधिक जोखमीच्या आणि अधिक परतावा गुंतवणूक प्रकारांकडे वळणार असतो. बँक निवडताना नेहमी सुरक्षित आणि चांगले व्यवस्थापन असलेल्या बँकेलाच प्राधान्य द्यावे. अधिक परताव्याच्या मोहात पडून आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकणाऱ्या वित्तसंस्था किंवा बँकांपासून सावध राहावे.
हेही वाचा : आर्थिक नियोजन करताना 'हे' लक्षात घ्या
3. सोने हा देखील एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे. सद्याच्या आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात तर सोन्याने भरघोस परतावा दिला आहे. त्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचाही मर्यादीत प्रमाणात समावेश नक्की असावा. अर्थात गुंतवणूक करताना सोने हे शुद्ध स्वरुपातच विकत घ्यावे. दागिन्यांच्या रुपाने गुंतवणूक करू नये. कारण त्यामुळे भविष्यात गुंतवणूक काढून घेताना घट लागणार असते.
4. गुंतवणूक करतानाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे करबचतीचे नियोजन. पीपीएफ, एनएससी, ईएलएसएस, एनपीएससारखे अनेक चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून प्राप्तिकरात बचत तर होतेच शिवाय दीर्घकालात चांगली रक्कम उभी राहते. संपूर्ण प्राप्तिकर सवलत घेतल्यानंतरच इतर गुंतवणुक पर्यायांचा विचार केला पाहिजे. नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या सुरूवातीलाच या मुद्दयाकडे लक्ष द्यावे. त्यामुळे एक प्रकारची आर्थिक शिस्तदेखील तयार होते.
5. या सर्व पायऱ्या चढत आपण गुंतवणुकीच्या जेव्हा पुढच्या टप्प्यात येतो. तेव्हा भविष्यातील गरजांचा, चलनवाढीचा मुद्दा प्रकर्षाने लक्षात घ्यावा लागतो. चलनवाढीच्या दरापेक्षा म्हणजेच महागाई दरापेक्षा जेव्हा आपल्या गुंतवणुकीचा परतावा जास्त असतो तेव्हाच संपत्तीची निर्मिती होत असते. त्यासाठीच इक्विटी हा गुंतवणूक प्रकार योग्य ठरतो. अलीकडच्या काळात इक्विटी या गुंतवणूक प्रकाराची लोकप्रियता वाढत चालली आहे. यात इतर कोणत्याही गुंतवणूक प्रकारापेक्षा जास्त जोखीम असते. मात्र यातून मिळणारा परतावा हा चलनवाढीपेक्षा कितीतरी अधिक असल्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहेत. इक्विटी म्युच्युअल फंडांच्या रुपाने सर्वसामान्यांना इक्विटी प्रकारात गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय निर्माण झाला आहे. जर तुमचा अभ्यास चांगला असेल, जोखीम क्षमता असेल तर तुम्ही प्रत्यक्ष शेअर बाजारातदेखील गुंतवणूक करू शकता. अन्यथा म्युच्युअल फंडांद्वारे इक्विटी गुंतवणूक करणे योग्यच. शिवाय यात एकरकमी आणि एसआयपी अशा दोन्ही पद्धतीने गुंतवणूक करता येते. त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी शिस्तबद्धपणे गुंतवणूक करून भविष्यात मोठी रक्कम उभारता येते. इक्विटी हा गुंतवणूक प्रकार दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.
वर उल्लेखलेल्या सर्वच गुंतवणूक प्रकारात योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास गुंतवणूकीचा चांगला पोर्टफोलिओ तयार होतो आणि तो आपल्यासाठी संपत्ती निर्माण करतो.
या पद्धतीने शिस्तबद्धपणे आणि एकेक पायरी चढत गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थैर्याकडे यशस्वी वाटचाल करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.