‘आपल्याला काहीतरी मिळवायचे असेल, तर आपल्याला काहीतरी गमवावे देखील लागते,’ असे सांगतात ‘चुंबक’ या ब्रँडच्या सह-संस्थापिका शुभ्रा चड्ढा! शुभ्रा यांच्यावर व्यवसायासाठी आपले घर विकण्याची वेळ आली, तरीही त्यांनी तो निर्णय घेतला आणि यशस्वी करून दाखविला.‘नेटॲप’ या टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये काम करत असताना २००४ पासून त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळे करायचे, असे होते. परंतु, व्यवसाय करण्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. त्यानंतर २००९ मध्ये शुभ्रा यांना, त्यांच्या पहिल्या मुलाच्या संगोपनासाठी नोकरी सोडावी लागली. ‘पूर्ण वेळ आई झाल्यावर एक वर्षानंतर मला जाणवले, की मला पुन्हा काहीतरी करण्याची गरज आहे,’ असे त्यांनी म्हटले होते. परंतु, काय सुरू करावे, याबाबात त्यांच्याकडे स्पष्ट कल्पना नव्हती. दरम्यान, शुभ्रा यांनी पतीसोबत परदेश दौरा करून परतल्यानंतर, तिकडची आठवण म्हणून फ्रीजवर लावायचे चुंबक (मॅग्नेट) आणले होते. शांत बसलेल्या असताना, त्यांचे अचानक या चुंबकावर लक्ष गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की आपण बाहेरच्या देशातून परत येताना त्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी एक तरी गोष्ट घेऊन येतो. मात्र, भारताबाबत तसे होत नाही. आपल्याकडे परदेशी नागरिकांनी नेण्यासारख्या अनेक वस्तू असल्या, तरी त्या अशा स्वरुपातील नसतात. हे लक्षात आल्यावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करू शकतील अशा वस्तू तयार करण्याचे निश्चित केले. त्यातूनच साकारला गेला तो ‘चुंबक’ हा ब्रँड!
व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारा पुरेसा पैसा त्यांच्याजवळ नव्हता. त्यामुळे त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला. ४० लाख रुपयांमध्ये घर विकल्यानंतर त्यांनी आपले बंगळूरमध्ये पहिले स्टोअर सुरू केले. बंगळूरमध्ये ‘स्टार्टअप’चे स्वागत होत असल्याने, त्यांना सुरवातीला कोणत्याही अडचणी आल्या नाहीत. परंतु, सहा महिन्यानंतर संपूर्ण व्यवसाय डबघाईला येत बंद पडण्याच्या अवस्थेत आला. अशावेळी शुभ्रा यांचे पती विवेक प्रभाकर त्यांच्या मदतीला धावून आले. मोठ्या कंपनीतील पदाचा राजीनामा देत त्यांनी ‘चुंबक’चे मुख्य कार्यकारी अधिकारीपद स्वीकारले. त्यांनी ‘चुंबक’चे मार्केटिंग आणि सेल्स विभाग, तर शुभ्रा यांनी डिझाईन आणि प्रॉडक्शन विभाग पाहायला सुरवात केली.
पुढच्या आठ वर्षांत, शुभ्रा आणि विवेक या दांपत्याने ‘चुंबक’ला ११ शहरांमध्ये ७० हून अधिक मोठ्या स्टोअरसह विस्तारित केले. लाइफस्टाईल आणि घर सजावटीपासून फॅशनपर्यंत सर्व गोष्टी त्यात समाविष्ट केल्या. ‘चुंबक’चे वार्षिक उत्पन्न २०.६ टक्क्यांनी वाढून ते आता ४१ कोटी रुपयांवर गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.