मोदी परिधान करतात तो 'श्वास मास्क' बनविणारी इ-स्पिन नॅनोटेक स्टार्टअप

SWASA N95 Mask
SWASA N95 Mask sakal
Updated on

आयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन असो किंवा अन्य कोणताही कार्यक्रम... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाचा मास्क आपल्याला दिसेल.. तो मास्क बनविणाऱ्या स्टार्टअप कंपनीची आणि त्याचे संस्थापक डाॅ संदीप पाटील यांची ही कहाणी आहे...

धुळे जिल्ह्यातील पिंपरी चिमठाण्याच्या छोट्याशा गावात डाॅ संदीप यांचा जन्म झाला. ७५ टक्के आदिवासी आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या या गावात शिक्षणाची संधी नसल्यामुळे नंदूरबार जिल्ह्यातील शहाडा येथील मामाच्या गावामध्ये जाऊन संदीप यांनी मराठी माध्यमाच्या शाळेतून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षातच नापास

डाॅ संदीप सांगतात, "माझे संपूर्ण बालपण गावातच गेले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण घेता-घेता शेतात काम करावे लागत. तसेच, वडिलांनी घराशेजारीच सुरू केलेल्या छोट्याशा दुकानातही काम करावे लागत. तेथे मला काही प्रमाणात उद्योग-व्यवसायाचे काही धडे मिळाले. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला जळगावातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नाॅलाॅजी (यूडीसीटी) येथे बीटेक केमिकल इंजिनिअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला."

SWASA N95 Mask
करन्ट अकाउंटसंबंधी नवे नियम लागू करण्याचे RBIचे बँकाना निर्देश

अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकताना संदीप यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागले. बहुतेक विषयांमध्ये नापास झाल्यामुळे ते निराश होऊन घरी परतले. इंजिनिअरिंग सोडून देण्याचा विचार केला आणि पुन्हा शेतात काम करायला सुरवात केली. मात्र काही दिवसातच त्यांच्या लक्षात आले की शेतात काम करण्यापेक्षा इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले केव्हाही बरे. ते पुन्हा अभ्यासाला लागले आणि पुढील परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण झाले.

आयआयटी कानपूरमध्ये पीएचडीसाठी दाखल

संदीप यांना २००६ बडोद्यातील एम एस विद्यापीठात एमटेक पाॅलीमर टेक्नाॅलाॅजी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. कोलॅबोरेटिव्ह कोर्सच्या अंतर्गत एक वर्ष त्या विद्यापीठात तर एक वर्ष आयआयटी मुंबईमध्ये त्यांना संधी मिळाली. इंजिनिअरिंग करत असतानाच नॅनोटेक्नाॅलाॅजी विषयातील संशोधन कार्यात त्यांना आवड निर्माण झाली होती. नंतर आयआयटी कानपूरमध्ये ते पीएचडीसाठी दाखल झाले.

डाॅ संदीप सांगतात, "घरापासून ९५० किलोमीटर दूर असलेल्या आयआयटी कानपूर, उत्तर प्रदेशमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाण्यास माझ्या कुटुंबियांचा विरोध होता. तरीही मी गेलो. आयआयटीमधील वातावरण, संस्कृतीच वेगळी होते. सर्व प्राध्यापक, विद्यार्थी इंग्रजीत बोलत असत. मला त्यांच्यासारखे बोलता येत नसल्यामुळे खूप अडचण येत. त्या वातावरणात स्थिर होण्यासाठी मला दोन वर्ष लागली. अभ्यासाचे तंत्रही वेगळेच होते. पीएचडीसाठी बंधनकारक असलेल्या क्युम्युलेटिव्ह परफाॅर्मन्स इंडेक्समध्ये (सीपीआय) ७ गुण मिळवण्यास मी अपयशी ठरलो. प्रथम शैक्षणिक क्षेत्रात ६ तर दुसऱ्या सत्रात ६.५ गुण मिळाले. मला शेवटची संधी देण्यात आली. त्यानंतर मात्र मी पुन्हा जोरदार प्रयत्न केले आणि ७ गुण मिळविले. आयआयटी कानपूर येथे घालवलेल्या ४ वर्षात माझ्यात खूप बदल झाला."

SWASA N95 Mask
VIDEO : जय हो! 5 मिनिटात 3 गोल; पाहा मॅचचा टर्निंग पॉइंट

पीएचडी करत स्टार्टअपची स्थापना

पीएचडी करत असताना संदीप यांची भेट प्रा आशुतोष शर्मा यांच्याशी झाली. प्रा शर्मा हे सध्या केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे सचिव आहेत. शर्मा यांनी संदीप यांना इलेक्ट्रोस्पिनिंग (नॅनो फायबर स्पिनिंग) मशीन बनविण्यास सांगितले. डाॅ संदीप म्हणाले, "संशोधनासाठी आवश्यक असलेली अनेक उपकरणे आपण आयात करतो. त्यामुळे नॅनो फायबर मशीन बनविण्यासाठी सर्व मटेरियल आम्ही भारतातूनच जमविले. जेमतेम सहा महिन्यातच आम्ही प्रयोगशाळेत यशस्वीरित्या ते मशीन बनविले. संशोधनाच्या पार्श्वभूमीतून आल्यामुळे मला व्यावसायिक गोष्टी माहिती नव्हत्या मात्र मटेरियल गोळा करताना मिळालेल्या अनुभवामुळे मशीनची किंमत कशी ठरवावी याचा मला अंदाज आला."

प्रा शर्मा यांच्याशी चर्चा केल्यानंतर डाॅ संदीप यांनी २४ नोव्हेंबर २०१० रोजी इ-स्पिन नॅनोटेक नावाने स्टार्टअप कंपनी सुरू केली. आयआयटी कानपूरकडून मला माझी पहिली ऑर्डर मिळाली आणि पहिल्या मशीनच्या विक्रीतून मला ४.५ लाख रुपये मिळाले. ते सर्व पैसे त्यांनी कंपनीच्या विस्तारासाठी वापरले. डाॅ संदीप यांच्या पत्नी जागृती या देखील कंपनीमध्ये संचालक म्हणून रुजू झाल्या.

व्यावसायिक उत्पादनाला सुरवात

आयआयटी कानपूरच्या स्टार्टअप इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर ने (एसआयआयसी) खूप महत्त्वाची भूमिका बजावली. कंपनीला २०११ मध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे (डीएसआयआर) राबविण्यात येणाऱ्या प्रोमोटिंग इनोव्हेशन इन इंडिव्हिज्युअल्स, स्टार्टअप अँड एमएसएमई (प्रिझम) या योजनेंतर्गत ४.५ लाख रुपयांचा अनुदान-स्वरुपातील निधी उपलब्ध करून देण्यात आला. "प्रिझमचा निधी मिळाल्यानंतर आम्ही मशीनचे व्यावसायिक उत्पादन सुरू केले. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, रशिया येथेही आम्ही मशीनची विक्री केली. मिळालेले सर्व उत्पन्न आम्ही पुन्हा संशोधन विकासाकरिता वापरले."

कोव्हिड-१९ महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी दोन वर्ष म्हणजे २०१७ मध्येच डाॅ संदीप यांनी व्हायरस आणि बॅक्टिरियापासून संरक्षण करणाऱ्या व नॅनोफायबर तंत्रज्ञानावर आधारित फिल्टर मास्कची संकल्पना मांडली होती. आयआयटी कानपूरमधील डाॅ सुनील ढोले, युडीसीटी जळगावमधील विद्यार्थी व युरोपमधील ग्रीन कार्ड सोडून देत भारतात परतलेले नितीन चऱ्हाटे आणि महेश कठेरिया यांच्या सोबतीने श्वास एन९५ मास्कच्या प्रकल्पावर डाॅ संदीप यांनी काम सुरू केले.

SWASA N95 Mask
तीन भाषांमध्ये लिहिता येणार पीएचडीचे पेपर! 17, 18 ऑगस्टला 'पेट' परीक्षा

श्वास एन९५ मास्क बाजारात दाखल

डाॅ संदीप म्हणाले, "परिधान करायले सोपे आणि श्वास घ्यायला सोयीचे व आरामदायी असा मास्क आम्ही बनविला. अमेरिकेतील प्रतिष्ठित नेल्सन लॅबने त्याला प्रमाणित केले. ९९.५ टक्के बॅक्टिरिया आणि व्हायरस या मास्कच्या माध्यमातून फिल्टर होऊ शकतात असे या प्रमाणित चाचण्यांमधून सिद्ध झाले."

ऑगस्ट २०१८ मध्ये श्वास एन९५ मास्क बाजारात दाखल झाला. कोव्हिडच्या उद्रेकापूर्वी साधारण सव्वा वर्ष आधी. त्यामुळे महामारी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मास्कचे उत्पादन करणे कंपनीला शक्य झाले. आयआयटी कानपूरचे अभय करंदीकर आणि अमिताभ बंडोपाध्याय यांनी डाॅ संदीप यांना खूप मदत केली. उत्पादन वाढीसाठी आवश्यक असलेली संसाधने कंपनीकडे नव्हती. आयआयटी कानपूरने पुन्हा जून २०२० मध्ये इ-स्पिन नॅनोटेकसाठी आपले दरवाजे उघडले. आयआयटी कानपूरमध्येच उत्पादनाला सुरवात केल्यानंतर दिवसाला २५ हजार ते ३० हजार मास्कचे उत्पादन करणे शक्य झाले.

डाॅ संदीप म्हणाले, "सर्व डाॅक्टरांचा विश्वास संपादन केल्यामुळे श्वास मास्कचा वापर सर्वत्र वाढला. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेला मास्क हा श्वास एन९५ होता हे आम्हाला टीव्हीवर पाहायला मिळाले."

पोर्टेबल ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटर यंत्र विकसित

डाॅ संदीप यांच्या आईला फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली. त्या रुग्णालयात असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ शकतो याचा अंदाज डाॅ संदीप यांना आला. त्यामुळे त्यांनी पोर्टेबल ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटर यंत्र विकसित करण्यावर भर दिला. कोरोनाच्या दुसरी लाट आली तेव्हा डाॅ संदीप, डाॅ सुनील ढोले आणि तुषार वाघ यांच्या टीमने पूर्ण तयारी केली होती. ओएनजीसीने जून २०२१ मध्ये पाच हजार ऑक्सिजन काॅन्सेन्ट्रेटरची ऑर्डर कंपनीला दिली.

डाॅ संदीप म्हणाले, "आम्ही भविष्यात एसी व्हेन्ट, एयर प्युरिफायर असे घरगुती वापरासाठी असलेले फिल्टर प्रोडक्ट बाजारात दाखल करणार आहोत. तसेच नॅनोफायबर तंत्रज्ञानावर आधारित बेबी-केअर प्रोडक्ट, सॅनिटरी नॅपकीनचे लवकरच उत्पादन सुरू होणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()