सामान्य व्यक्तीला गुंतवणूक करून त्यावर चांगला परतावा मिळवण्याचे अनेक पर्याय बाजारामध्ये उपलब्ध आहेत. मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक हा एक सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित पर्याय आहे. मुदत ठेवीवर मिळणारे व्याज हे मुदत ठेवीच्या काळात निश्चित असते. त्यामुळे हा पर्याय गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित समजला जातो;परंतु बॅंका किंवा पोस्ट ऑफीस यांना प्राप्तिकर कायद्यानुसार ठराविक रकमेपेक्षा जास्त मिळणाऱ्या व्याजातून स्रोतावर कर (TDS) कापावा लागतो. गुंतवणूकदारांना याचा आपल्या गुंतवणुकीवर किती परिणाम होईल याची माहिती असणे आवश्यक आहे.
प्राप्तिकर कायद्यानुसार बॅंक आणि पोस्टातील गुंतवणुकीवरील व्याजाद्वारे मिळणारे सामान्य गुंतवणूकदारांचे वार्षिक उत्पन्न रू. ४०,००० तसेच ज्येष्ठ नागरिकांचे वार्षिक उत्पन्न रू. ५०,००० पेक्षा जास्त असेल तर १० टक्के टीडीएस कापला जातो.
नॉन बॅंकींग कंपनीमधील गुंतवणुकीवरील व्याजाद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न रू. ५००० पेक्षा जास्त असेल तर १० टक्के ‘टीडीएस’ कापला जातो.
गुंतवणूकदाराने बॅंक, पोस्ट ऑफिस किंवा इतर संस्थाकडे पॅनकार्ड जमा केले नसेल, तर २० टक्के ‘टीडीएस’ कापला जातो.
ज्या गुंतवणूकदाराचे एकूण वार्षिक उत्पन्न प्राप्तिकर कायद्यानुसार करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेबाहेर आहे त्यांच्या व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून ‘टीडीएस’ कापला जातो.
ज्या गुंतवणूकदाराचे एकूण वार्षिक उत्पन्न प्राप्तिकर कायद्यानुसार करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेबाहेर नाही, परंतु त्यांच्या व्याजाद्वारे मिळणारे वार्षिक उत्पन्न रू. ४०,०००पेक्षा जास्त असेल किंवा रु.५०,०००पेक्षा (वरीष्ठ नागरिक) जास्त असेल तरी १० टक्के ‘टीडीएस’ कापला जातो.
ज्या गुंतवणूकदाराचे एकूण वार्षिक उत्पन्न
प्राप्तिकर कायद्यानुसार करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेबाहेर नाही, त्यांना व्याजाद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातून टीडीएस कापला जात नाही. यासाठी गुंतवणूकदारांनी फॉर्म नं. १५ जी (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी) किंवा १५एच (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त, वरीष्ठ नागरीक) संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
एकूण वार्षिक उत्पन्न ‘टीडीएस’ मर्यादेबाहेर असेल तरी लागू वजावटीनंतर येणारे अंदाजित उत्पन्नावर कर लागू होत नसेल तर आपण फॉर्म नं. १५ जी किंवा १५एच भरून ‘टीडीएस’ टाळू शकता.
ठेवीच्या परिपक्वता मूल्यावर ‘टीडीएस’ कापल्यामुळे कसा विपरीत परीणाम होतो?
आपण असा विचार करत असाल, की मुदत ठेवीवरील व्याज रकमेवर ‘टीडीएस’ कापणे हे काही विशेष नाही तर पुन्हा एकदा विचार करा. प्रत्यक्षात ‘टीडीएस’ कपातीचा मुदत ठेवीच्या परिपक्वता मूल्यावर विपरीत परिणाम होतो. ज्या मुदत ठेवीवरील व्याज पुनर्गुंतवणूक पध्दतीने दिले जाते त्या ठेवीवर मुदत संपल्यानंतर किती परिपक्वता मूल्य (मॅच्युरीटी व्हॅल्यू) मिळेल ते दर्शविलेले असते. परिपक्वता मूल्यामध्ये ‘टीडीएस’वरील कंम्पाउंडीगमुळे मिळणाऱ्या वाढीव व्याजाचाही समावेश असतो. कारण परिपक्वता मूल्य हे ‘टीडीएस’ कापला जाणार नाही या गृहीतावर आधारीत असते.
‘टीडीएस’ कापला तर त्या रकमेबरोबर त्यावर कंम्पाउंडीगमुळे मिळणारे वाढीव व्याजही कमी होते. उदाहरणार्थ, १० लाख रुपये मुदतठेवीमध्ये पाच वर्षांसाठी ६.१५ टक्के प्रतीवर्ष दराने पुनर्गुंतवणूक पध्दतीने ठेवले तर परिपक्वता मूल्य रू. १३.५७ लाख होईल. यावर रू. ३५,३२४ ‘टीडीएस’ कापला जाईल. त्यामुळे रू. १३.२२ लाख परिपक्वता मूल्य होईल. प्रत्यक्षात मुदतीनंतर रू. १३.१७ लाख मिळतील. रूपये ४,७२९ चा तोटा होईल, कारण ‘टीडीएस’ रकमेवर न मिळालेले व्याज.
ठेवीच्या परिपक्वता मूल्यावर ‘टीडीएस’ कापल्यामुळे होणारा तोटा कमी कसा करता येईल?
मुदतठेवीची रक्कम फार मोठी नसेल तर हा तोटा कमी करता येईल
वरीष्ठ नागरिकांनी फॉर्म नं. १५एचचा गांभीर्याने वापर करावा. बरेच वरीष्ठ नागरिक मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून असतात. त्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असते तर सुपर वरीष्ठ नागरिकांना (८० वर्षे वय व अधिक) पाच लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असते.
ज्या करदात्यांचे करपात्र उत्पन्न करमर्यादेपेक्षा कमी आहे, परंतु बॅंक व्याज उत्पन्न ४०,००० रुपये वरीष्ठ नागरिक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांना ‘टीडीएस’ १० टक्के दराने द्यावा लागतो. असे वरीष्ठ करदाते फॉर्म नं. १५एच तसेच इतर करदाते फॉर्म नं. १५जी बॅंकेमध्ये भरून ‘टीडीएस’ टाळू शकतात.
ज्या सामान्य करदात्यांचे करपात्र उत्पन्न करमर्यादेपेक्षा जास्त आहे. परंतु पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच सेक्शन ८७ए अंतर्गत सूट मिळाल्यामुळे करदायित्व शून्य आहे. असे करदाते फॉर्म नं. १५जी चा वापर करू शकत नाहीत. अशा करदात्यांनी मुदत ठेवी वेगवेगळ्या बॅंकेत विभागून ठेवल्या तर ‘टीडीएस’ कापला जाणार नाही आणि त्यामुळे ‘टीडीएस’ परतावा मिळण्यासाठीची कटकट वाचेल.
इतर करदाते ज्यांना कर भरावा लागतो ते
सुध्दा मुदत ठेवी वेगवेगळ्या बॅंकेत विभागून ठेवू शकतात जेणेकरून ‘टीडीएस’ कापला जाणार नाही. ते कर स्वतंत्रपणे भरू शकतात ज्यामुळे त्यांना परिपक्वता मुल्यामध्ये ‘टीडीएस’वरील कंम्पाउंडीगमुळे मिळणाऱ्या वाढीव व्याजाचाही फायदा घेता येईल.
ज्यांना कर भरावा लागतो ते सुध्दा मुदत ठेवी बॅंकेत कुटुंबीयांच्या नावे विभागून ठेवू शकतात जेणेकरून टीडीएस कापला जाणार नाही आणि कर बचत होऊ शकेल. परंतु हे उत्पन्न क्लबिंग इन्कमच्या तरदुतीखाली येऊ शकते याची जाणीव ठेवावी लागेल.
पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीवर ‘डीआयसीजीसी’चे (DICGC) सुरक्षाकवच असते. याचाही ठेवीदारांनी विचार करून आपली ठेव सुरक्षित करावी.
(लेखक निवृत्त बँक अधिकारी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.