आर्थिक स्थैर्यासाठी तर आर्थिक नियोजन महत्त्वाचे असतेच. परंतु आर्थिक नियोजनामुळे फक्त तितकाच लाभ होत नाही तर त्यातून आपल्याला निर्णय स्वातंत्र्य मिळत असते. कारण आर्थिक अडचणींवर मात करता येते आणि आयुष्यातील अनेक निर्णय आपण कोणत्याही परिस्थितीच्या दबावाखाली न येता शांतपणे घेऊ शकतो. संपत्ती निर्मिती ही आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या आयुष्यात एखादी लॉटरी लागेल किंवा अचानक नशीब मेहबान होईल या मानसिकतेत राहण्यापेक्षा आर्थिक नियोजनातून समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करणे श्रेयस्कर आहे.
मात्र संपत्ती निर्मितीसाठी फक्त आपण मेहनत करून होत नाही तर आपण कमावलेल्या पैशालादेखील कामाला लावावे लागते. म्हणजेच चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणे, त्यातून बचत करणे आणि मग गुंतवणूक करणे. जोपर्यत आपण हे लक्षात घेत नाही तोपर्यत आर्थिक नियोजनाचा मार्गावर आपण मार्गक्रमण करू शकत नाही. आर्थिक नियोजन करताना नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात ते पाहूया.
१. नियमित बचत
आपल्या मासिक उत्पन्नाचा आणि खर्चाचा योग्य तो आढावा घ्या. अनावश्यक खर्च टाळत दरमहिन्याला बचत करा. ही बचतच भविष्यातील आपल्या समृद्धीची दारे उघडणार असते.
२. आर्थिक शिस्त लावून घ्या
आर्थिक व्यवहारांसंदर्भात शिस्त असणे खूप महत्त्वाचे असते. कारण अशी शिस्त असेल तरच दीर्घकालाचे नियोजन करता येते आणि त्याची अंमलबजावणी शक्य होते.
३. आर्थिक उद्दिष्टांची आखणी
आपल्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांची आखणी करा. असे केल्याने परिपूर्ण आर्थिक नियोजन करणे शक्य होईल.
४.आपत्कालीन निधी
अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटासाठी वेगळी तरतूद करणे आवश्यक आहे. यालाच आपत्कालीन निधी म्हणतात. आपल्या मासिक उत्पन्नाच्या साधारण सहापट तरी हा निधी असावा. हा निधी लिक्विड फंडात किंवा बॅंकेच्या मुदतठेवीत ठेवावा. असे केल्यास दीर्घकालावधीसाठी केलेली गुंतवणूक मोडायची वेळ येत नाही.
५. नियमित गुंतवणूक
संपत्ती निर्मतीसाठी नियमितपणे गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुदतठेवी, सोने, शेअर, म्युच्युअल फंड, बॉंड्स, पीपएफ, पोस्टाच्या योजना यासारख्या गुंतवणूक प्रकारात नियमित गुंतवणूक केली पाहिजे.
६. जोखीम आणि परतावा
गुंतवणूक प्रकार निवडताना आपले वय, उत्पन्न, आर्थिक उद्दिष्टे आणि जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घ्या. त्यानुसार गुंतवणूक प्रकाराची विभागणी करा. तरुणवयात इक्विटीसारख्या जोखमीच्या प्रकारात अधिक गुंतवणूक करता येते. मात्र जसजसे वय वाढत जाते तसतसे डेट प्रकारात किंवा निश्चित परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारातील गुंतवणूक वाढवत नेली पाहिजे.
७. विमा हवाच
गुंतवणूक करतानाच आयुर्विमा आणि आरोग्यविमा घ्यायला विसरू नका. विमा हा आपल्या संरक्षणासाठी असतो. आपल्या वैद्यकीय खर्चासाठी आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी विमा अत्यंत आवश्यक आहे.
८. आर्थिक सल्लागार
ही सर्व आखणी करताना आणि त्यावर अंमलबजावणी करताना आर्थिक सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे योग्य ठरते. कारण ते या क्षेत्रातील तज्ज्ञ असतात. आपल्या गरजांनुरूप नियोजनाची आखणी ते करू शकतात. आपण ऐकीव माहितीच्या किंवा अपूर्ण ज्ञानाच्या जोरावर केलेले नियोजन आणि गुंतवणूक भविष्यात आपल्याला अडचणीची ठरू शकते किंवा त्यामुळे अपेक्षित लाभ मिळत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.