पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात काही बदल केले असून, त्यांची अंमलबजावणी एक एप्रिल २०२१ पासून झाली आहे. यातील काही बदलांमुळे विवरणपत्र (रिटर्न) सादर करणे सोपे होणार आहे. तसेच काही बदलांमुळे नागरिकांना ‘रिटर्न’ फाईल करणे क्रमप्राप्त होणार आहे.
काय आहेत हे प्रमुख बदल, याची आज आपण माहिती घेऊया.
१) मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर जशी करआकारणी होते, तशीच करआकारणी भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) मध्ये रु. २.५० लाखांवरील कर्मचाऱ्याने केलेल्या गुंतवणुकीवर केली जाईल. यामुळे सर्वसामान्य नोकरदारांचे काहीच नुकसान होणार नसून, ज्यांचे मासिक उत्पन्न रु. दोन लाखांहून अधिक आहे, असे नोकरदार रु. २.५० लाखांवरील गुंतवणुकीवर करमुक्त व्याजाचे उत्पन्न मिळवू शकणार नाहीत. नुकतीच ही मर्यादा रु. पाच लाखांपर्यंत वाढविली आहे. मात्र, ज्यांच्या कंपन्या किंवा संस्था ‘पीएफ’मध्ये योगदान करत नाहीत, अशा नोकरदारांनाच या वाढीव मर्यादेचा लाभ घेता येईल. थोडक्यात, ज्या सरकारी नोकरांना पेन्शन लागू आहे असेच लोक याचा फायदा घेऊ शकतील. इतरांसाठी ही मर्यादा रु. २.५० लाख इतकीच असणार आहे.
२) जास्तीत जास्त लोकांनी प्राप्तिकर विवरणपत्र (रिटर्न) भरावीत म्हणून या अर्थसंकल्पात कलम २०६एबी आणि २०६ सीसीए यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार ‘रिटर्न’ सादर न करणाऱ्या करदात्यांचा ‘टीडीएस’ वाढीव दराने केला जाणार आहे. परिणामी, जर एखाद्याचे उत्पन्न करपात्र असूनसुद्धा ‘रिटर्न’ सादर केले नसेल तर मिळणाऱ्या व्याजावर १० टक्क्यांऐवजी आता २० टक्के ‘टीडीएस’ होईल.
३) ७५ वर्षांवरील वयाच्या ज्येष्ठ नागरिक व ज्यांना पेन्शन व व्याजाव्यतिरिक्त अन्य काही उत्पन्न नसेल, अशा ज्येष्ठ नागरिकांना आता ‘रिटर्न’ सादर करण्याची गरज नसेल.
४) सर्वसामान्य करदात्यास ‘रिटर्न’ भरणे सहज व सोपे व्हावे म्हणून यापुढे ‘रिटर्न’च्या फॉर्ममध्ये पगाराचा तपशील, भरलेला कर, टीडीएस ही माहिती आधीच त्या फॉर्ममध्ये भरलेली असेल. थोडक्यात, ‘प्री फिल्ड’ फॉर्म मिळेल. याशिवाय ‘रिटर्न’ भरणे आणखी सोपे व्हावे म्हणून ‘लिस्टेड सिक्युरिटीज’च्या विक्रीतून होणारा भांडवली नफा (कॅपिटल गेन), लाभांश, बँक, पोस्ट किंवा तत्सम गुंतवणुकीतून मिळणारे व्याज याचाही तपशील या ‘प्री फिल्ड’ फॉर्ममध्ये असणार आहे. यामुळे ‘रिटर्न’ भरणे अगदी सोपे होईल. याआधी ही सुविधा केवळ नोकरदारांनाच होती, की ज्यांचा फॉर्म १६ हाच उत्पन्नाचा तपशील असतो.
५) आधार कार्ड आपल्या पॅनकार्डला जोडण्याची (लिंक करण्याची) अंतिम मुदत ३१ मार्च २०२१ होती. मात्र, नुकताच याचा कालावधी ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. जर या तारखेच्या आत पॅनकार्ड हे आपल्या आधार कार्डला लिंक झाले नाही, तर संबंधित पॅनकार्ड निष्क्रीय (इनअॅक्टिव्ह) होईल; तसेच प्राप्तिकर कलम २७२बी नुसार रु. १० हजारांचा दंडही होऊ शकतो. त्यामुळे आपले आधार कार्ड अद्याप पॅनकार्डला जोडले नसेल, तर लवकरात लवकर ते करावे.
थोडक्यात, एक एप्रिल २०२१ पासून लागू झालेले प्राप्तिकरातील बदल प्रत्येकाने समजून घेऊन त्यानुसार नियोजन करणे हिताचे होईल.
(लेखक सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर- सीएफपी आहेत.)
- अर्थविश्वातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.