Kasaba By Election 2023: कसब्याची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि त्याचबरोबर इच्छुकांच्या आशा आकांक्षाही. मात्र, उमेदवारी एकालाच मिळणार हे स्पष्ट होतं. त्यामुळं इतर नाराज होणार हे देखिल नक्की होतं.
भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे या निवडणुकीतले प्रमुख पक्ष. (Analysis on Kasaba By Election Campaign by BJP And Congress)
मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर होणाऱ्या या पोटनिवडणुकीत त्यांचे पती शैलेश आणि पूत्र कुणाल इच्छुक होते.
माजी सभागृह नेते गणेश बीडकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृह नेते धीरज घाटे हेही प्रमुख इच्छुक.त्यात पक्षानं उमेदवारीची माळ टाकली ती रासनेंच्या गळ्यात.
दुसरीकडं काँग्रेसकडं (Congress) तब्बल १६ जण इच्छुक होते. अरविंद शिंदे, रविंद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे,नीता रजपूत,संगीता तिवारी, शिवाजीराव आढाव, गोपाळ तिवारी ही त्यातली मोठी नावं. उमेदवारी मिळाली रविंद्र धंगेकरांना.
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे काही नेतेही या जागेसाठी इच्छुक होते. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं तसा प्रस्तावही प्रदेश नेत्यांकडं पाठवला होता. पण नंतर ही जागा काँग्रेसकडं गेली. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटानेही ही जागा मागितली होती. पण त्यांच्याही पदरी निराशाच आली.
कसबा मतदारसंघात थोडा नाराजीचा सूर उठतोय हे लक्षात येताच भाजपचे नेते जागे झाले आणि त्यांनी झपाट्यानं वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेऊन नाराजी दूर करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला. आपण प्रचारात नाही, असं सांगणारे गिरीश बापट (Girish Bapat) आॅक्सिजन सिलेंडरसह प्रचार मेळाव्यात उतरले.
माजी खासदार संजय काकडेंनीही आपण नाराज नसल्याचं जाहीर केलं. पुण्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शैलेश आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली. गिरीश बापटांच्या निवासस्थानीही ते गेले.
त्यामुळं आता भाजपमध्ये (BJP) नाराजी असल्याचा सूर उमटतोय तो त्या पक्षातून नाही, तर सोशल मिडियाच्या (Social Media) नॅरेटिव्हमधून. ही निवडणूक झाली की पुढं महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत.
त्यामुळं नाराज राहणं हे भाजपच्या इच्छुकांना परवडण्यासारखं नाही. कितीही नाही म्हटलं तरी संघ परिवाराची यंत्रणा नेहमीच भाजपच्या मागं उभी राहिली आहे.
भाजपच्या परंपरागत मतदारांमध्ये मोदींचं असलेलं वलय विरोधक म्हणतात त्या प्रमाणात कमी झालेलं नाही. ही देखिल भाजपच्या जमेची बाजू ठरु शकते.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं मेधा कुलकर्णींना तिकिट नाकारल्यानंतर तिथला ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा होत्या. पण मतदानात मात्र ते दिसलं नाही.
सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या मतदारसंघातून मोठ्या फरकानं निवडून आले. पूर्वी तिथं शिवसेनेचा प्रभाव होता. पण तोही म्हणावा तसा राहिलेला नाही. किंबहूना तिथले अनेक शिवसेना नेते सध्या अज्ञातवासातच आहेत.
हीच स्थिती कसबा विधानसभा मतदारसंघाची आहे. एकेकाळी काका वडकेंच्या रुपानं या मतदारसंघात शिवसेनेचं मोठं वजन होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. गेल्या महापालिका निवडणुकीत कसबा विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे दोनच नगरसेवक निवडून आले होते.
भाजपने या मतदारसंघात जेवढी ताकद लावली आहे, तेवढी ताकद महाविकास आघाडीनं एकत्र होऊन लावली आहे, असे आतापर्यंत तरी दिसून आलेलं नाही. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख असे नेते प्रचाराला आले.
अजित पवारही रॅलीत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचेही स्थानिक नेते धंगेकरांबरोबर दिसताहेत. पण भाजपच्या धडाक्यापुढं आघाडीचा धडाका कमीच दिसतो आहे, अशी सध्यातरी स्थिती आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भाजपच्या प्रचारात उतरले आहेत.
कालच त्यांनी विविध समाजाच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. २४ तारखेलाही ते रॅलीत सहभागी होणार आहेत.
सोशल मिडियावरचं नॅरेटिव्ह वेगळं सांगतो आहे. पण किमान आजपर्यंत तरी भाजपनं मोठ्या सभा, रॅली याला हात घातलेला नाही. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं वैयक्तिक गाठीभेटी, समाजभेटी यांच्या माध्यमातून भाजपचे नेते प्रचार यंत्रणा पुढं नेताना दिसताहेत.
देवेंद्र फडणवीसांसारखे नेते जवळपास रोज पुण्यात हजेरी लावताहेत. त्यांनीही वैयक्तिक गाठीभेटी आणि बैठकांवरच वेळ दिलाय. दुसरीकडं काँग्रेसनं रॅली, जाहीर सभा घ्यायला सुरुवात केलीये.
निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला पाचच दिवस उरलेत. प्रत्यक्ष प्रचारासाठी चारच दिवस हातात आहेत. हे शेवटचे चार दिवसच कसब्याचा आमदार निश्चित करणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.