Annabhau Sathe Jayanti : मराठीला जागतिक पातळीवर नेणारे अण्णाभाऊ.. चक्क जर्मन रशियन भाषेत झाला होता साहित्याचा अनुवाद

साहित्य सेवेद्वारे मराठी साहित्याचा अवकाश जागतिक पातळीवर नेणारे अण्णाभाऊ साठे.
Annabhau Sathe Jayanti
Annabhau Sathe Jayantiesakal
Updated on

प्रा. डॉ. बळीराम गायकवाड

Annabhau Sathe Jayanti Blog In Marathi :

महाराष्ट्रातील मराठी साहित्याच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासातील व ज्ञान चळवळीतील सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले नाव म्हणजे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे. आपल्या साहित्य सेवेद्वारे मराठी साहित्याचा अवकाश जागतिक पातळीवर नेण्याचे आणि मराठी साहित्याची पताका १९५० च्या दशकापासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकविण्याचे महत्तम राष्ट्रीय योगदान देणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंना त्यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त अभिवादन.

भारतीय साहित्य व्यवहाराचा १९५० च्या दशकातील व्याप्तीचा विचार करता आशिया खंडातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर, मुल्कराज आनंद, राजा राव, आदी साहित्यिकांनी आपल्या दर्जेदार इंग्रजी साहित्य निर्मिती द्वारे भारतीय साहित्याची पाश्चात्त्य जगात ओळख दृढ केली होती.

परंतु एखाद्या प्रादेशिक भाषेतून लेखन करणाऱ्या लेखकाचे साहित्य इतर भारतीय भाषांमध्ये किंवा जागतिक परकीय भाषांमध्ये भाषांतरीत होणे ही त्या साहित्यकाराचा आणि त्या प्रदेशाच्या सकस वैचारिक परंपरेचा मोठा बहुमान म्हणावा लागेल, जो अण्णा भाऊ साठे यांच्या रूपाने महाराष्ट्राला मिळाला.

०१ ऑगस्ट १९२० ला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव ते मुंबई हे स्थलांतर रोजगारशोधातून झाले खरे परंतु शाळा, महाविद्यालयामधील कोणत्याहीऔपचारिक शिक्षणाची शिदोरी न मिळालेले अण्णा भाऊ साठे जीवनानुभवांच्या जोरावर व स्वज्ञानार्जन करून मराठी साहित्यातील नवतेचे निर्विवाद नवाब बनले.

३५ कादंबऱ्या, २२ कथासंग्रह, ३ नाटकं, एक प्रवास वर्णन, १३ लोकनाट्य, १० पोवाडे असे एकूण ९२ अचंबित करणारे साहित्यविष्कार अण्णा भाऊंनी निर्माण केले. जाती विषमता वर्गीय विषमता आणि आर्थिक विषमतेची झळ स्वतः भोगले असल्याने ग्रामीण व नागर जीवनाच्या स्वानुभावातून यथार्थ चित्रण केले.

स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण ९२ साहित्यकृतीतून अण्णा भाऊंनी सामाजिक उतरंडीतील तळागाळाशी असणाऱ्यांना ‘मार्जिन वरून सेंटर’मध्ये आणले व त्या नायक नायिकांच्या रुपाने दलित साहित्याचे बीजारोपण व मध्यमवर्गीयांच्या भोवतीच घीरट्या घालणाऱ्या साहित्य प्रवाहाला दलित वंचित समाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.

अण्णा भाऊ तळागाळातील नायक-नायीका यांना नेतृत्वसंधी देवून, जातीव्यवस्था जुगारून नेतृत्वाचे डीसेंट्रलायझेशन करतात आणि भारतीय वारकरी चळवळीप्रमाणेच सर्वसमावेशक नेतृत्वाची संकल्पना सर्वप्रथम अमलात आणतात. ही अण्णा भाऊंची कृती एकाच वेळी अनेक पातळ्यांवर समाज सांधण्याचे काम करते.

महाराष्ट्रातील कला, संस्कृती, साहित्य कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देणारे असे अण्णांचे साहित्य ठरले म्हणूनच या योगदानाची दखल जागतिक स्तरावर देखील घेतली गेली आणि जगभरातील शोषित जनतेशी नाळ जोडणाऱ्या अण्णांच्या साहित्यात रशिया, चीन, जपान, आणि कोरिया या देशांबद्दल विस्तृत लेखन आढळते यामुळे एकंदरीतच अण्णा भाऊंचे साहित्य जणू साहित्य सौंदर्याचे नव मापदंड बनले आहे.

अण्णा भाऊंचा लेखन काळ हा सामाजिक, राजकीय दृष्ट्या प्रचंड घडामोडीचा होता. ब्रिटिशांविरोधात उभारलेला भारतीय स्वातंत्र्यलढा, कामगार चळवळी, दुसरे जागतिक महायुद्ध, संयुक्त महाराष्ट्राचा लढा व नवमहाराष्ट्र चळवळ अशा सामाजिक परिस्थितीत स्वतःचा चरितार्थ आणि उपेक्षा, हालअपेष्टांचे जीवन जगत असतानाही १९४२ ते १९६९ या केवळ २९ वर्षाच्या कालावधीत अण्णा भाऊंनी जागतिक मानवतावादी साहित्याचा निर्मळ साहित्यझरा जगाला दिला.

सुरवातीला मार्क्सवादाकडे झुकलेले अण्णा भाऊ नंतर आबेडकरवाद स्वीकारतात आणि भारतीय परिपेक्षामध्ये मध्ये आंबेडकरवाद हा इतर कोणाही पेक्षा सर्वात प्रभावशाली आहे असे प्रतिपादनही अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून आणि कृतीतून केल आहे.

अण्णांची मास्टरपीस ' फकिरा ' ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्या झुंजार लेखणीस अर्पण करतात ज्यामधून भारतीय राज्यघटना, अनिहीलेशन ऑफ कास्ट, बुद्ध अँड हीज धम्मा, द प्रॉब्लेम ऑफ रुपिज, सारख्या दैदीप्यमान साहित्यकृतीची निर्मिती झाली. याचबरोबर बाबासाहेबांच्या चळवळीचा सच्चा पाईक म्हणून ते लिहितात, ' जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव '.

जरी अण्णांच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा कायम समाजाच्या परिघाबाहेरचा वंचित मानवी समाज असला तरीही, अण्णा भाऊंचे साहित्य प्रादेशिक अस्मितेच्या पुढे जाऊन राष्ट्रीय विचारांची मांडणी करतच विस्मृतीत गेलेल्या समूहांना सोबत घेवून वैश्विक समाजाला जोडण्याचा संस्कार करते.

म्हणून अण्णांचे साहित्य भारतीय संत परंपरेतील कबीर, तुकाराम, मीरा यांच्याबरोबरच अमेरिकेतील झोरा नील हरस्टन, सोजोर्नर ट्रूथ, माँटो , पॉब्लो नेरुदा, इस्मत चुगताई, अलेक्स हेक्सले या सारख्या असंख्य आंतरराष्ट्रीय असामान्य प्रतिभा लाभलेल्या साहित्यिकांबरोबरचे समजले जातात. अण्णा भाऊंनी त्यांची लेखणी मराठी साहित्य जगतालाही पूर्णपरिचित नसलेल्या परंतु महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या शोषितांच्या आयुष्यातील अंतरंग जसे च्या तसे उलगडून दाखवण्यासाठी झिजवली.

स्वतः अण्णा भाऊंना त्यांच्या जिवंतपणी मराठी साहित्यिक म्हणून, व्यक्ती म्हणून उपेक्षेला सामोरे जावे लागले तरी अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्याच्या आजपर्यंतच्या इतिहासातील एकमेव असावेत ज्यांनी त्यांच्या साहित्याचा वैश्विक प्रवास स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे.

१९६१ साली अण्णा भाऊंना रशियातील इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीचे दुसऱ्यांदा निमंत्रण आले तेंव्हा रशियातील जनते समोर जेंव्हा जेंव्हा अण्णा भाऊ गेले तेव्हा रशियन लोकांनी त्यांच्या साहित्यावर किती प्रेम केले याची अण्णांना प्रचिती येत होती. अण्णांच्या साहित्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक साहित्यिक, लेखक, नाटककार व अनुवादकाराणी असाच जय जयकार केला ज्याचा परिपाक म्हणून अण्णांचे साहित्य जर्मन, पोलीस, झेक रिपब्लिक, रशियन, इंग्रजी अशा जगातील अनेक जागतिक व हिंदी, तेलुगु, कन्नड, तमिळ, मल्याळम या भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले.

भारतीय साहित्य निर्मात्यांमध्ये मराठी भाषा व मराठी साहित्य यांना कायम प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे मोलाचे कार्य करणाऱ्या नगण्य मराठी लेखकांपैकी अण्णा भाऊ हे एक आहेत. यामुळे मराठी साहित्यकारांच्या मांदियाळी मध्ये मराठीला १९५0 च्या दशकापासून ते आजपर्यंत साता समुद्र पार सन्मान मिळवून देणारे साहित्यिक म्हणून एकमेव अण्णा भाऊ साठे होते हे निर्विवादपणे मान्य करावे लागेल.

प्रा. डॉ. बळीराम गायकवाड

-प्रभारी संचालक,

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन,

मुंबई विद्यापीठ तथा प्राचार्य- कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय,

उरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.