संदेश कुडतरकर.
msgsandesa@gmail.com
वर्ष संपलं. आतापर्यंत वर्षभरात वाचलेल्या पुस्तकांची यादी बऱ्याच जणांनी सोशल मीडियावर पोस्ट केली असेल.
त्याप्रमाणेच, काहीजणांनी वर्षभरात पाहिलेले चित्रपट, वेब मालिका, लघुपट वगैरेंची यादीही पोस्ट केली असेल.
चित्रपट वगैरेंच्या या यादीकडे एक चित्रपटप्रेमी आणि प्रेक्षक म्हणून तटस्थपणे पाहताना मला स्वतःलाच काही प्रश्न पडतात कधीकधी. त्यांचा विचार करणं महत्त्वाचंही वाटतं, म्हणून या लेखाचा उपद्व्याप.
भारतात सध्या अंदाजे ४०हून अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, ज्यावर प्रेक्षकांना घरबसल्या फोनवर, लॅपटॉपवर चित्रपट, वेब मालिका वगैरे पाहता येतात.
भारतात विविध भाषांमध्ये गेल्या वर्षी किती चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित झाले होते, याची यादी विकिपीडियावर सहज मिळेल.
तीही यादी काही दुर्लक्षित करता येण्याइतकी त्रोटक नाही. इतक्या वेगवेगळ्या माध्यमांतून कंटेंटचा भडीमार होत असताना प्रेक्षक म्हणून आपण या सगळ्याकडे कसं पाहतो, हे जाणून घेणं मला महत्त्वाचं वाटतं.
उदाहरण म्हणून 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाकडे पाहूया. खर्चिक व्हीएफएक्स, रणबीर कपूर आणि आलिया भटसारखी तगडी स्टारकास्ट, अयान मुखर्जीसारखा दिग्दर्शक ज्याने यापूर्वी 'वेक अप सिद'सारखे चांगले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत, सगळीकडे वाजत असलेली गाणी यांमुळे एकीकडे सोशल मीडियावर चित्रपटाच्या संवाद, कथा या ढिल्या पडलेल्या बाजूंबाबत चर्वितचर्वण होऊनही 'ब्रह्मास्त्र'ने तुफान गर्दी खेचली.
यासोबत दुसरं एक उदाहरणही पाहण्यासारखं आहे. जागतिक चित्रपट दिनाच्या निमित्ताने जेव्हा सगळ्या चित्रपटगृहांनी तिकिटाचे दर त्या एकाच दिवशी पंचाहत्तर रुपये असतील, असं जाहीर केलं, तेव्हाही जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता.
योगायोगाने आर. बाल्की यांचा 'चुप' हा नितांतसुंदर, परंतु मुख्य धारेपासून बराच वेगळा असलेला चित्रपट त्याच दिवशी प्रदर्शित झाला होता. तो तिकीटबारीवर काही आठवडे तरी तग धरून होता.
एखादा चित्रपट नेमका का चालतो, यामागची कारणं फार जटिल असतात. परंतु, निदान प्रेक्षक म्हणून आपण एखादा चित्रपट का पाहतोय, याचा स्वत:पुरता तरी विचार व्हायला हवा.
माझ्याप्रमाणेच बरेचसे प्रेक्षक चित्रपटगृह आणि ओटीटी या दोन्ही माध्यमांचा आता वापर करतात.
फिल्म्सचं आणि मनोरंजन क्षेत्राचं एक बिझनेस मॉडेल आहे. कोव्हिडच्या काळात त्यात लक्षणीय बदलही झाले आहेत. त्यानुसार प्रेक्षकांना आवडणारा कंटेंट सतत देत राहणं, ही या माध्यमांची गरज बनली आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म्सची आपापसांत असलेली स्पर्धा, चित्रपटगृहांना असलेलं ओटीटी माध्यमांचं भय, एकपडदा चित्रपटगृहांचं बंद होणं, अशा अनेक घटकांमुळे चांगला, दर्जेदार कंटेंट सतत प्रेक्षकांना पुरवत राहिल्याशिवाय या माध्यमांना आता गत्यंतर नाही.
मात्र, आपण नक्की काय, किती आणि कसं पाहतोय, याकडे प्रेक्षक म्हणून आपण पाहतोय का?
याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे माणसाचा सरासरी अटेन्शन स्पॅन (लक्ष देण्याचा कालावधी) गेल्या काही वर्षांत १२ सेकंदांवरून ८ सेकंदांपर्यंत खाली घसरला आहे. गोल्डफिशचा सरासरी अटेन्शन स्पॅन ९ सेकंद इतका असतो.
आपण सध्या त्याच्यापेक्षाही मागे आहोत. त्यामुळे चित्रपट पाहणंच काय, कुठल्याही मार्केटिंग गिमिकसाठी हा कमी झालेला अटेन्शन स्पॅन हे अलीकडच्या काळातलं एक मोठं आव्हान म्हणून समोर येतंय.
पण त्यापलीकडेही कुठल्याही अनुभवात जास्त काळ गुंतून न पडण्याची मानसिकताही वाढीला लागलीय का?
आपल्यातल्या किती लोकांनी मागच्या वर्षी पाहिलेल्या काही फिल्म्स केवळ 'पीअर प्रेशर'मुळे पाहिल्या होत्या?
सोशल मीडियावर चाललेल्या चर्चेमुळे, मित्रांमध्ये, ऑफिसच्या सहकाऱ्यांमध्ये होणाऱ्या चर्चेमुळे, आपण जर हा चित्रपट पाहिला नाही, तर इतरांच्या तुलनेत मागे राहू, किमानपक्षी तशी आपली गणना चारचौघांत केली जाईल, या भीतीपोटी आपण किती चित्रपट पाहिले?
किती चित्रपट आपण मित्रांनी, समीक्षकांनी तोंडभरून कौतुक केल्यामुळे, 'तूही नक्की पाहा, तुलाही आवडेल' असा सल्ला दिल्यामुळे पाहिले?
किती चित्रपट एखादा दिग्दर्शक आपल्याला आवडतो, म्हणून पाहिले? किती चित्रपट केवळ आपला आतला आवाज पाहायला सांगतोय म्हणून पाहिले?
एक विशिष्ट गट एखाद्या चित्रपटाची भलामण करतो आहे, एखादा अजेंडा रेटण्यासाठी इतरांनाही तो चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन पाहा, म्हणून भावनिक आवाहन करतो आहे, एखाद्या चित्रपट महोत्सवात दुसऱ्याच देशातल्या एका दिग्दर्शकाने त्या चित्रपटावर भाष्य करून रान उठवलं आहे आणि भावनिक आवाहन करणाऱ्या या पहिल्या गटाला केवळ विरोध करण्यासाठी म्हणून दुसरा गट त्या चित्रपटाला विरोध करतो आहे, अशा परिस्थितीत तुम्ही तो चित्रपट जर पाहिला असेल,
तर तुम्ही तो या सगळ्या चर्चेमुळे पाहिला?
असं काय आहे, या चित्रपटात की इतका धुरळा उडालाय मतभेदांचा, या उत्सुकतेपोटी पाहिला? कंटाळा आलाय, तर पाहून टाकूया एकदाचा, या भावनेपोटी पाहिला?
चित्रपटात ज्या प्रश्नाबद्दल भाष्य केलं आहे, तो प्रश्न समजून घेण्यासाठी पाहिला?
की तुम्हांला राजकीय विषयांवरच्या चित्रपटांत रस आहे, म्हणून पाहिला?
की त्या दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपट पाहिले होते आणि ते आवडले, म्हणून पाहिला?
पाहून झाल्यावर मत देताना त्याकडे तुम्ही तटस्थपणे चित्रपट म्हणून पाहून तुमचं मत मांडलं की भावनिक होऊन?
की या सगळ्या फंदात पडायचंच नाही, म्हणून तो पाहिलाच नाही?
आणि नसेल पाहिला, तर काहीतरी चूक केल्याची भावना तुमच्या मनाला खातेय का?
की वेळ मिळाल्यावर तो पाहण्याचं तुम्ही ठरवलं आहे?
चित्रपटगृहात पाहिलेल्या एखाद्या चित्रपटानंतर झालेल्या भावविभोर अवस्थेत तुम्ही किती दिवस होता? त्यातल्या पात्रांनी, घटनांनी तुम्हांला किती दिवस, किती आठवडे, किती महिने अस्वस्थ केलं?
'गोदावरी'मधल्या निशिकांतच्या आत्मशोधाच्या प्रवासाने तुमची झोप उडवली का? 'डॅमर' मालिकेतला जेफ्री डॅमर अनेक रात्री तुमचा मेंदू पोखरत राहिला का?
'कला' चित्रपटातील कलाच्या पात्राचे 'सॉरी, मम्मा' हे शब्द काळजावर घाव घालत राहिले का? किती काळ त्या चित्रपटाच्या निमित्ताने तुमच्या मनाचा तळ सतत ढवळत राहिला आणि पडद्यावरचा तो सुंदर, दिव्य अनुभव आत आत झिरपत राहिला?
तुम्ही तो झिरपू देण्याइतका वेळ त्या अनुभवाला दिलात? की दुसऱ्याच क्षणाला घरी येऊन नवीन वेब मालिका किंवा त्याच वीकएंडला एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आलेला चित्रपट पाहून घेतलात? आणि आधीच्या अनुभवांची अक्षरं ओली असतानाच पाटी कोरी करून नव्या अनुभवाला सिध्द झालात? 'एकदा पाहायचं राहून गेलं, की मग राहूनच जातं कामाच्या गडबडीत' असं स्वतःला समजावत?
कुठल्याही एका चित्रपटाने तुम्हांला दिलेल्या अनुभवाला लिमलेटची रंगीत गोळी जिभेवर बराच वेळ घोळवत ठेवावी आणि तिने आपली आंबटगोड चव, गंध आणि भडक रंग जिभेवर सोडावा, तितकं घोळवत ठेवण्यासाठी,
त्या अनुभवातून हळुवार समृद्ध होणाऱ्या माणूसपणाकडे तटस्थपणे पाहण्यासाठी आणि एखाद्या कलाकृतीच्या आस्वादातून स्वतःचीच होणारी वाढ पाहून मनोमन आनंदी होण्याइतका वेळ, इतका ठहराव आपण एखाद्या तरी कलाकृतीला दिला का?
त्या अनुभवाला, कलाकृतीला प्रेक्षक म्हणून नक्की न्याय दिला का?
चित्रपट किंवा वेब सिरीज पाहून झाल्यानंतर त्याबद्दल कुठेही व्यक्त होण्यामागे आपली नेमकी कोणती भावना होती?
पोस्ट लिहून लाईक्स मिळवून होणारा आनंद आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा होता की आपल्या लिखाणामुळे एखादी चांगली, दुर्मिळ कलाकृती आणखी चार लोकांपर्यंत पोहोचतेय, ती आपल्याप्रमाणेच कदाचित त्यांनाही समृद्ध करू शकेल, याचं समाधान जास्त होतं?
व्यक्त होताना आपण संयम बाळगला का? की भावनेच्या भरात केवळ चांगलं लिहून सगळ्यांना खुश ठेवण्यात यशस्वी झालो?
की एखाद्या प्रश्नाबद्दलचा, एखाद्या दिग्दर्शकाबद्दलचा, नटाबद्दलचा आपला वैयक्तिक राग, आकस ओतून मोकळे झालो?
आणि त्यात त्या कलाकृतीचा निखळ आनंद घेण्याचंच विसरून गेलो?
चित्रपट पाहण्याचं वेड असणाऱ्या सगळ्यांनी या नवीन वर्षात नवीन काही पाहताना या सगळ्याचा निदान निसटता विचार करायला काहीच हरकत नाही.
चित्रपटगृहं हाऊसफुल होत असतील तरच एखादा चित्रपट चांगला अन्यथा वाईट, हे गृहीतक केव्हाच मागे पडलंय.
मात्र प्रेक्षक म्हणूनही या सगळ्याकडे पाहताना केवळ संख्यात्मक वाढीकडे लक्ष न देता आपण केवळ जंक फूड तर खात नाही आहोत ना, एकामागोमाग एक फिल्म्स पाहून संपवून टाकण्याचा भस्म्या रोग तर आपल्याला झाला नाहीये ना, हे कधीतरी नक्कीच तपासून पाहायला हवं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.