..तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थपूर्ण महाअभिवादन ठरेल!

..तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थपूर्ण महाअभिवादन ठरेल!

हा डिसेंबर अर्थात महापरिनिर्वाण दिन! सहा डिसेंबर १९५६ या दिवशी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याचा अस्त झाला. हा दिवस प्रत्येक वर्षी कोट्यावधी अनुयायांच्या अश्रूंना वाट करून देत काळजाला स्पर्शून जातो. जिथे डॉ. आंबेडकरांवर अंत्यसंस्कार झाले, त्या चैत्यभूमीवर उसळणारी गर्दी आणि प्रत्येक वर्षीचा ब्रेक होणारा गर्दीचा उच्चांक हा डॉ. बाबासाहेबांबद्दलच्या श्रद्धेचा अन् आदराचा दाखलाही देऊन जातो. 

एका बाजूला अथांग सागर आणि दुस-या बाजूला विराट जनसागर असे अचंबित करून टाकणारे चित्र इथे प्रत्येकाला पहायला मिळते. जगाच्या पाठीवर इतर कोणत्याच महापुरुषाच्या महापरिनिर्वाणदिनाला अशी ऐतिहासिक गर्दी कोठेच दिसत नाही. मात्र, या क्रांतीनायकाबाबत हे घडते. केवळ भारताच्याच नव्हेतर, जगाच्या कानाकोप-यातील असंख्य अनुयायी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर दाखल होत असतात. महत्वाचे म्हणजे इथे येऊन भौतिक सुखाची कोणी मागणी करत नाही की कोणी संतती अन् संपत्तीसाठी नवस बोलत नाही. मुलाबाळांचे परिणय जुळावे म्हणून कोणी डॉ. आंबेडकरांच्या नावाने हातात गंडे-दोरे बांधत नाहीत की, कुटुंब सुखी रहावे, रोगराईतून मुक्तता मिळावी म्हणून कोणी गळ्यात ताईत बांधत नाहीत. मात्र, तरीही इथे अचाट अन् अफाट गर्दी उसळतेच!

का घडते हे? या प्रश्नाकडे वळले म्हणजे लक्षात येते की, या सृष्टीवर हजारो वर्षे सूर्य उगवत होता, पण तो कधीही शोषित पीडित, वंचित दलितांना प्रकाशित करू शकला नाही. मात्र या सूर्यापेक्षाही प्रखर तेजाने आपली बुध्दी ऊर्जा पेरणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाप्रज्ञासूर्याने 'अंधारयुगात' चाचपडणा-या माणसाला 'ज्ञानप्रकाश' दिला. त्याच्यातील जगण्याची उमेद जागवली. जो सर्वहारा माणूस शेकडो वर्षे जातीव्यवस्थेच्या एकदम तळाला गटांगळ्या खात होता, त्याचे प्राण वाचविण्याचे तेजस्वी आंदोलन या क्रांतीनायकाने छेडले. त्यामुळे स्वयंविश्वासाचा पूर्णतः चोळामोळा झालेल्या दलित, उपेक्षित माणसाला 'माणूसपण' मिळाले. त्याच्या अंगात दहा हत्तींचे बळ आले. तो ताठ उभा राहिला. त्याच्या धमण्याधमण्यांतून स्वयंविश्वास अन् स्वयंअस्मितेचे रक्त सळसळू लागले. प्रस्थापित व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड त्याच्या पायातून निखळून पडले. तो मुक्त झाला. तो स्वतंत्र झाला..!  त्यामुळे मानवी स्वातंत्र्याच्या या उदगात्याबद्दची अपार श्रध्दा सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर उफाळून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाला आज ६४ वर्षे होत आहेत. या महापरिनिर्वाणाच्या पार्श्वभूमीवर चिंतन आणि मंथन होणे आवश्यक आहे. या ६४ वर्षांच्या कालखंडात आंबेडकरांचा समतामूलक समाजनिर्मितीचा लढा, आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय अशा पातळ्यांवर आपण कुठपर्यंत पुढे नेला? जाती निर्मूलनाची चळवळ आपण किती यशस्वी केली? अन्याय-अत्याचार रोखण्याबरोबर सांस्कृतिक परिवर्तनासाठी कोणती ठोस भूमिका घेतली? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपण किती झटलो? सफलतेच्या दृष्टीने देश कुठपर्यंत नेला? संविधानातील मार्गदर्शक तत्वात नवभारताचे जे चित्र रेखाटले ते आपण साकार केले काय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही समाजवाद, धर्मनिरपेक्षता ही मूलभूत तत्वे जर आदर्श समाजरचनेची पायाभरणी करणारी असतील तर या तत्वांशी भारत देश प्रामाणिक राहण्यासाठी आपण कोणत्या स्वरुपाची आंदोलने केली? जीवनाच्या सुंदर उभारणीचा व सर्जनशील निर्माणाचा जोरकसपणे पुरस्कार करण्यासाठी आपण काय केले? हजारो वर्षे प्रस्थापित संस्कृतीने-व्यवस्थेने इथल्या माणसाला नाकारून, झिडकारून, लाथाडून यातनांच्या तुरुंगात बंदिस्त केले, त्या बंदीवानाच्या मुक्ततेसाठी आपण बाबासाहेबांच्यानंतर कोणता संघर्ष छेडला? 

कालबाह्य तत्वांचा, श्रध्दांचा, अंधश्रध्दांचा, कर्मकांडाचा, उच्च-निचतेचा, विषमतेचा, वर्ण-वर्गभेदाचा सर्व धर्मसंभार गाडून ज्ञानवादी, मनोधारणांसाठी, विज्ञानवादी, भाववृत्तीसाठी, स्वयंप्रज्ञ चित्तवृत्तीसाठी आपण किती आणि कशी वाटचाल केली? निरंतर मानवी प्रगती बुध्दीप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद या अजरामर आशा तीन सिध्दांतावर होते, आशी विचारधारा पेरणारा सर्वोत्तम भूमिपुत्र जो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ५६ साली या भारताला दिला, त्या गौतम बुध्दाच्या तत्वज्ञानाचा आपण किती निष्ठापूर्वक स्वीकार केला? का फक्त किर्तनात बुध्दाचे नाव आणि वर्तनात काहीच नाही, असेतर आपण वागत नाही ना? या आणि अशा प्रश्नांचा ठाव घेऊन समग्र व्यवस्था परिवर्तनाची चळवळ नव्याने गतिमान करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याचे भान या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने नव्याने येणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचार चळवळ भावनिक पातळीपेक्षा बौध्दिक पातळीवर अधिक तेजस्वी आणि यशस्वी कशी करता येईल यासाठी व्यापक प्रयत्न झाला पाहिजे, तरच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्थपूर्ण महाअभिवादन ठरेल!

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.