सन 1980, ते दिवस लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीचे होते. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार पडले होते; पण त्याआधी कॉंग्रेस पक्षाची दोन शकले झाली होती. दोन्ही कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात उभ्या. एक इंदिरा कॉंग्रेस, दुसरी अरस कॉंग्रेस. (कर्नाटकातील देवराज अरस हे या पक्षाचे प्रमुख त्यामुळे अरस कॉंग्रेस). इंदिराजींच्या पक्षात सारे आणि मुरब्बी कॉंग्रेसजन, तर अरस कॉंग्रेसमध्ये यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व मानणारे पुढारी. सोप्या भाषेत आजच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पूर्वसुरी. त्या वेळच्या कऱ्हाड लोकसभा मतदारसंघात इंदिरा कॉंग्रेस विरुद्ध अरस कॉंग्रेस, असा सामना झडला. इंदिरा कॉंग्रेसकडून यशवंतराव मोहिते, तर अरस कॉंग्रेसकडून विलासराव उंडाळकर मैदानात. त्या वेळी कऱ्हाड लोकसभा मतदारसंघ कऱ्हाड, पाटण, वाळवा, शिराळा, महाबळेश्वर, जावळी आणि सातारा तालुक्यात पसरला होता. ती लढाई तोडीस तोड होती. एक बाजू म्हणायची "भाऊं न् अप्पा, मारत्यात गप्पा', "अलीबाबा अलीबाबा चाळीस चोर, पक्ष बदलणार हरामखोर,' दुसरी बाजू म्हणायची, "सह्याद्रीचा पत्थर आता फोडायचाच.' मोहिते यांच्या बाजूला प्रेमलाकाकी, विलासराव शिंदे, अभयसिंहराजे आणि इतर लोक, तर उंडाळकरांच्या बाजूला पी. डी. पाटील, भिलारे गुरुजी, विक्रमसिंह पाटणकर, प्रतापराव भोसले, बाबासाहेब चोरेकर, आबासाहेब पार्लेकर, दादासाहेब जगताप. ही यादी तशी मोठी आहे. सामना जोरात झडला. 44 वर्षांचे तडफदार विलासराव उंडाळकर यांची ही पहिलीच संसदीय लढत. यशवंतराव मोहिते हे त्यावेळचे मोठे पुढारी. त्यांच्या विरुद्ध लढणे, ही सोपी बाब नव्हती. या निवडणुकीत उंडाळकरांचा केवळ पंचवीस हजार मतांनी पराभव झाला; पण या पराभवातच त्यांच्या राजकीय सुरुवातीची बीजे रोवली होती. या निवडणुकीत त्यांनी कऱ्हाड उत्तर आणि दक्षिण या विधानसभेच्या दोन्ही मतदारसंघातून आघाडी घेतली होती. दोन चार महिन्यांच्या फरकानेच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. उंडाळकर अलगदपणे चरखा या चिन्हावर विधानसभेत पोचले. पुढे ते 35 वर्षे आमदार राहिले. सलग सात वेळा निवडून येणारे फार कमी आमदार महाराष्ट्राने पाहिले आहेत; पण हे काही एकाएकी घडले नव्हते. उंडाळकरांची, त्यांच्या घराची आराधना, अनेक वर्षांची. त्याचीच ही परिणती.,
उंडाळकरांच्या घरात शामराव, दिनकरराव, जयसिंगराव आणि विलासराव अशी चार मुले. शामराव लवकर निर्वतले. दिनकरराव राज्य सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. वडील दादा उंडाळकर सार्वजनिक सेवेचे भुकेले. घरात प्रश्न निर्माण झाला. आता हा वसा कोण चालविणार? लोकल बोर्ड संपून जिल्हा परिषद अस्तित्वात आली होती. दादा उंडाळकरांना वाटले आपला खोंड सोडावा चाकोरीत. तशी इच्छा त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्याकडे व्यक्त केली. चव्हाणसाहेब म्हणाले, "थांबा, जरा कड काढा.' 1962 मध्ये मिळू पाहणारी संधी हुकली. तोपर्यंत विलासराव पाटील यांचे शिक्षण पूर्ण झाले होते. 1962 ला हुकलेली संधी पुन्हा टकटक करू लागली. 1967 ला उंडाळकर बैलजोडीच्या चिन्हावर जिल्हा परिषदेत पोचले.
उंडाळकर जिल्हा परिषद सदस्य झाले. साताऱ्याला राहायला आले. त्यांचा सुरुवातीला निवास कमानी हौदाशेजारी होता. नंतर ते यादोगोपाळ पेठेत राहायला गेले. त्या वेळी साताऱ्यात कॉंग्रेसचे मोठे प्राबल्य होते. राजे तेव्हाही होतेच; पण अदालत वाड्यात आणि अदालतवाड्यापुरतेच. सातारा शहराचे सार्वजनिक जीवन तेव्हा बन्याबापू गोडबोले, मनोहरपंत भागवत, अनंत कुलकर्णी (समर्थ साप्ताहिकाचे) यांच्या ताब्यात होते. दुसरी फळी होती ती कॉ. ऍड. व्ही. एन. पाटील यांची. चांगली व सभ्य माणसे होती ती. जिल्ह्यात तेव्हा एकाच नावाचा दबदबा किसन वीर यांचा. यशवंतराव मोहिते, दादासाहेब जगताप, बाळासाहेब देसाई हे स्वतंत्र व राखीव खेळाडू. किसन वीर जिल्ह्याची पटावरची रचना अशी काही करायचे, की सारे वजीर प्याद्यांच्या गर्दीत अडकवून ठेवायचे. दादासाहेब जगताप डोईजड होताहेत, असे वाटले की वीरांनी घातलाच पायकूट. यशवंतराव मोहिते कऱ्हाड दक्षिणेत अजिंक्य होते. (तसे भाऊ त्यांच्या आयुष्यात कोणतीच निवडणूक हरले नाहीत.) प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांना ते प्रश्न विचारते व्हायचे. त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण करायचे. त्यांना म्हणजे मोहित्यांना आव्हान निर्माण करील, असा एकही पुढारी कऱ्हाड दक्षिणेत नव्हता. स्वातंत्र्यसैनिकाच्या घराची परंपरा असणारे विलासराव किसन वीरांच्या हाती लागले. त्यांनी उंडाळकरांना जिल्हा परिषदेत निवडून आणले. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत घेतले आणि तिशी-पस्तिशीत असतानाच जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्षही केले. काकांची ही "येरा पाव, दोरा चिठ्ठी' गेली 60 वर्षे सुरू होती.
हेही वाचा : विलासकाका : प्रगल्भ राजयात्री
रयत संघटनेची बांधणी
विलासराव पाटील 1980 मध्येच आमदार झाले; पण त्याआधी त्यांनी काय काय सोसले. 15 वर्षे उमेदवारी करताना घरचे खावून लष्कराच्या खूप भाकऱ्या भाजाव्या लागल्या. उंडाळकर तेव्हा राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करीत. एवढेच कशाला; 1985 मध्ये विधानसभेचा अर्ज भरायच्या दिवशी त्यांनी बोलावलेली गाडी वेळेवर आली नाही, म्हणून त्यांना सातारा ते खोडशी हा प्रवास मालवाहू ट्रकच्या केबिनमधून करावा लागला होता. साधनांची प्रचंड कमतरता, शिल्लक रकमेची वानवा अशा परिस्थितीत त्यांचे राजकारण सुरू होते. 1967 ते 1980 या काळात गावोगावी त्यांनी स्वत:चे असे नेटवर्क तयार केले. पदरमोड करून त्यांच्यासाठी संघटना बांधणारे पाच- पंचवीस कार्यकर्ते अहोरात्र राबायचे. तेव्हा कुठे ती त्यांची रयत संघटना उभी राहिली. या रयत संघटनेवर बक्कल होते ते कॉंग्रेस पक्षाचे. त्यापुढे चिन्ह बैलजोडी असो, चरखा असो, हाताचा पंजा असो आणि कालपरवाचा नारळ साऱ्या निवडणुकांत खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी होत असे. अपवाद 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीचा. (त्याचा उल्लेख पुढे येईल.) कॉंग्रेस पक्षात राहून सारी व्यवधानं सांभाळून सलग पस्तीस वर्षे आपली चिमुटभराची का असेना दौलत सांभाळणे फार कमी लोकांना जमले आहे. त्यात उंडाळकर काका हे शीर्षस्थ.
1952 ते 1980 या काळात कॉंग्रेस पक्षात राहून राजकारण करणे, सत्तेचे पद मिळविणे, ते पद टिकवणे ही काही फार अप्रुप वाटावी, अशी गोष्ट नव्हती. त्या काळात अनेक गडबडगुंडे, नर्मदेचे गोटे पवित्र झाले; पण आणीबाणीनंतर कॉंग्रेस पक्षात राहून आपले वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचे राजकारण करणे ही आजच्याएवढीच कठीण गोष्ट होती. विलासराव उंडाळकर अशा व्यक्तीपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या संसदीय राजकारणाच्या काळात अनेक उन्हाळे- पावसाळे बघितलेच; पण अवकाळी पाऊस आणि दुष्काळी झळाही अनुभवल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षात यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचे नेतृत्व स्वीकारले; पण 1980 नंतर अरस कॉंग्रेसचे अस्तित्व गैरलागू झाल्यावर ते एकाकीच यशवंतराव चव्हाण यांना सोडून इंदिरा कॉंग्रेस पक्षात परतले. स्पष्टपणे त्यांनी आपली मते यशवंतराव चव्हाण यांना ऐकविली. ते शरद पवार यांच्या चरखा चिन्हाच्या पक्षात होते खरे; पण त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व तेव्हाही स्वीकारले नाही आणि अखेरपर्यंतही. काही काळ (1985 च्या निवडणुकीत) त्यांचे नेते वसंतदादा पाटील होते; पण ते त्यांना कार्यकर्ता मानायला तयार नव्हते. 1984 च्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रेमलाकाकी चव्हाण आणि विलासराव उंडाळकर यांच्या गावोगावी सभा झाल्याचे अनेकांना आठवत असेल; पण तो एकोपा फार दिवस राहिला नाही. उंडाळकरांच्या उमेदीच्या काळात ते शंकरराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून राज्यात ओळखले जात; पण तोही एक भ्रमच. कारण उंडाळकर यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिले ते सुधाकरराव नाईक यांनी. दुसऱ्यांदा माधवराव शिंदे यांनी. तिसऱ्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी. त्यांचे आमदारकीचे पहिले तिकीट फायनल केले ते शरद पवार यांनी. (असे पवारांनीच वाठार मुक्कामी सांगितले) अशी सारी जंत्री पाहिल्यावर त्या-त्या परिस्थितीत उंडाळकर कुणाचेतरी समर्थक भासतात खरे; पण अगोदर सांगितले त्याप्रमाणे आहे तो भ्रमच. उंडाळकर यशवंतराव चव्हाण सोडले तर कुणाचेच कार्यकर्ते नव्हते. ते स्वत:ला स्वयंभू नेता मानतात. रयत संघटना ही या स्वयंभू नेत्यापुढची आरास...!
हेही वाचा : साताऱ्याच्या बहादराची उद्योगात मुकेश अंबानींशी स्पर्धा; ‘दुकान’अॅप पुढे जिओ मार्ट हतबल
मी स्वयंभू नेता
"स्वयंभू नेता आहे,' ही भावना उंडाळकरांच्या मनात खोलवर रुजली आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात ही भावना खरीही होती. त्यामुळेच या स्वयंभू भावनेने त्यांनी आपल्या भोवतीची प्रभावळ निर्माण केली. जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, जिल्हा कॉंग्रेस, कॉंग्रेसची मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी- विक्री संघ, पंचायत समिती आणि आमदारकी, असा त्यांचा सर्वव्यापी वावर एखाद्या स्वयंभू नेत्यासारखा होता. सारे काही आपल्या भोवती, पक्षाभोवती फिरले पाहिजे, याची ते काळजी घेत. आपले स्वयंभूपण टिकले पाहिजे, यासाठी ते जरूर त्याची मदत घेत, कुणालाही नडत. येणेप्रमाणेच त्यांनी आपले स्वयंभूपण टिकवताना त्यांनी यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील, प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक- निंबाळकर यांचा विरोधही केला आणि स्वीकारही. पूर्वी मैदानी खेळात हाडकी गोट्यांचा खेळ होता. त्या खेळाचे एक सूत्र असते, गद कधी सोडायची नाही. गदीवरचा नर माद्यांना प्रसंगी गट्टी कोपराने ढोपरायला लावतो. विलासराव उंडाळकर यांनी कऱ्हाड दक्षिणच्या गदीवरून जिल्ह्यात अनेकांना "ताड्या' दिले.
भागाकारापासून दहा हात दूर
वक्तशीर बोलणे म्हणजे लागू पुरता उतारा, कार्यकर्त्यांची उतरंड परफेक्ट, कोणते मडके कुठं ठेवायचं याचं उत्तम भान, राजकीय व्यवहाराची एक स्वनिर्मित आचारसंहिता, पैशाचा वापर जवळजवळ नाहीच; पण प्रभावाचा वापर चलनासारखा, सरकारी अधिकाऱ्याची नस अचूक पकडणार. राजकीय मित्र- समर्थक- विरोधक या पटाची मांडणी अगदी व्यवस्थित, विरोधकापर्यंत पोचेल असा संपर्क सेतू, संयमी भाषणकला, हे भाषण करताना कुणाचा उल्लेख करायचा आणि कुणाचा अनुल्लेख करायचा याचे व्याकरण मुखोद्गत, छोट्या निवडणुकीत काहीही करून काठावर पास होण्याची कला, बेरजेला सतत तयार, गरज पडत्यास वजाबाकीही करणार; पण भागाकारापासून चार नव्हे दहा हात दूर. राजकीय मित्र उद्या शत्रू होणार आहे, हे गृहित धरून म्हणजे हातचे राखून वर्तन, तर राजकीय विरोधक उद्या मित्र होणार आहे, हे गृहित धरून अगोदरच त्याच्यासाठी आरक्षण (यशवंतराव मोहिते, पी. डी. पाटील व इतर) साम, दाम, दंड आणि भेद या चारही अस्त्रांचा गरजेनुसार वापर. मराठा समाजातल्या व त्यातल्या त्यात राजकीय परंपरा असणाऱ्या घरातील व्यक्तीला रांगेत उभे करून कुणबी, रयत- मराठा आणि तत्सम साधर्म्य असणाऱ्यांचीच मोठी गर्दी करणे, संघटनेत दोनच पदे एक नेता (हे पद अर्थातच उंडाळकरांकडे) दुसरे कार्यकर्ता. उपनेता औषधालाही नाही. अगदी घरातलाही नाही. नातेवाईकही नाही. ही सारी वैशिष्ट्ये विलासराव उंडाळकरांना कमी अधिक प्रमाणात चिकटली. खास उल्लेख करायचा म्हणजे राजकारणातील "यशवंतराव चव्हाण स्कूल'चीही तीच वैशिष्ट्ये. उंडाळकर चव्हाण स्कूलचे कार्यरत असणाऱ्यांपैकी "लास्ट फेलो'...! सतत आणि सातत्य ठेऊन प्रभाव कायम कसा राखावा, याचा अभ्यास करावयाचा झाला, तर राज्यशास्त्राच्या एखाद्या विद्यार्थ्यांने अभ्यास करावा. संशोधन करावा असेच उंडाळकरांचे राजकारण आहे. त्यांच्या राजकारणात अपयश तसे दृष्टोत्पत्तीस नव्हते; पण ते आले. त्यांचे अनेक सहाध्यायी, मित्र पराभवाच्या अबीरात न्हाऊन निघाले; पण उंडाळकर बचावले होते.
हेही वाचा : राष्ट्रवादीला धूळ चारणा-या विलासकाकांचे सोनिया गांधींनी केले हाेते काैतुक
मोठ्या विजयापासून डाऊनफॉल
अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रस्तुत लेखक विलासराव उंडाळकर यांच्या दोन तृतीयांश राजकारणाचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. याचा अर्थ ज्ञात आहे, ते सर्वच लिहिता येते, असा नाही. असो. उंडाळकरांचं वय तेव्हा 68 असावे. 2004 मधील ही गोष्ट. उंडाळकर राजकीयदृष्ट्या सर्वोच्च अशा बिंदूवर पोचले होते. साऱ्या एकजात संस्था ताब्यात होत्या. ते मंत्री होते. 2004 च्या निवडणुकीत ते राज्यात क्रमांक एकच्या मताधिक्याने विजयी झाले होते. (काही जण म्हणतात, याच वेळी काकांनी थांबायला हवे होते. मुलाला संधी द्यायला हवी होती. कारण मतदारसंध सेफ होता.) पण या विक्रमी विजयानंतर त्यांच्या राजकारणाचा "डाऊनफॉल' सुरू झाला. तसे ते होणारच होते. कारण कळत- नकळत विलासराव उंडाळकर यांच्या स्पष्टवक्तेपणाचा तोटा त्यांना झाला. राज्यात क्रमांक एकच्या मताधिक्याने विजयी होऊनही जीवश्च मित्र विलासराव देशमुख यांनी त्यांची मंत्रिपद सलग ठेवले नाही. ते ठेवायला हवे होते. कॉंग्रेसवाल्यांचे राजकारण वरकड पैशातून चालते. भाजपवाल्यांचे निधीतून आणि कम्युनिष्टांचे लेव्हीतून, हे वास्तव असताना उंडाळकर यांच्या मागची फळी जमा आणि खर्च याचा समतोल विसरले. संघटनेत, संघटनेतल्या माणसांत जी गुंतवणूक केली आहे, तिच्या व्याजावर, कृतज्ञतेच्या भावनेने हे सारे चालावे, असे त्यांना वाटत असे; पण 2004 नंतर उतरण वेगाने होऊ लागली आहे. सर्वोच्च बिंदू गाठल्यानंतर तिथे मुक्काम थोडाच घडणार. उतरण ही अटळ होती. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या राजकारणाचे संदर्भ बदलले होते. त्यांचे मित्र, त्यांचा मित्रपक्ष म्हणून लागला, "मांडव आमचा, वऱ्हाडी आम्ही, रुखवत आमचा आणि तुम्ही वरबाप कसे? हा प्रश्न त्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत "अंतिम शब्द कोणाचा' या अनुषंगाने विचारला गेला. तोपर्यंत राष्ट्रवादीला वाटणारी कॉंग्रेसबद्दलची भीती संपली होती. राष्ट्रवादीने त्यातल्या त्यात शरद पवार- अजित पवार यांनी आपलेच पीक, आपलेच खळे, आपलीच रास आणि आपलीच सुगी, अशी द्वाही फिरवली. 2007 मध्ये विलासराव उंडाळकर यांना जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शह दिला. 2005 मध्ये मोकाच्या केसमधून मोकळे झालेल्या पैलवान संजय पाटील यांनी मोट बांधून 2008 मध्ये बाजार समितीत पॅनेल उभे करून उंडाळकरांच्या पॅनेलचा पराभव घडवला. 2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीत विलासराव उंडाळकर जिंकले खरे; पण तो त्यांचा शेवटचा विजय होता. ती पुढच्या पराभवाची सुरुवात होती. काळाच्या सावध हाका त्यांनी ऐकल्या असत्या, तर पुढचे बरेच काही न घडते; पण ते घडले. उंडाळकरांना त्यांच्या मित्रांनी-विरोधकांनी दाबत दाबत फक्त कऱ्हाड दक्षिण मतदारसंघापुरते मर्यादित केले. त्यांची कोंडी केली. ही कोंडी एकट्या त्यांची नव्हती, ती यशवंतराव चव्हाण स्कूलची होती... कदाचित त्यांच्या बरोबरच राजकारणात (1967 मध्ये) आलेल्या शरद पवार यांच्याशी त्यांचे जुळले असते तर काका तहहयात आमदार राहिले असते आणि जिल्ह्याचे तहहयात कारभारी; पण ते घडले नाही. घडणार नव्हते. कारण राष्ट्रीय विचार मानण्यातला सूक्ष्म भेद आणि दोन्ही व्यक्ती स्वयंभू असणे.
त्यांनी 2011 ची तडजोड केली असती तर..!
राजकारणात जर- तरला वाव नसतो. असे घडले असते, तर आणि तसे घडले नसते तर, असे म्हणून चालत नाही; पण कशामुळे काय घडले, याचा धांडोळा घेता येतो. उंडाळकरांची धाटणी, प्रकृती तशी अपराजित श्रेणीतील; पण त्यांना पराभवाने शिवले. मर्यादेपुढची तडजोड अमान्य केल्यानेच असे घडले. फेब्रुवारी 2011 मध्ये त्यांच्यापुढे तडजोडीचा प्रस्ताव आला होता. त्या वेळी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते पृथ्वीराज चव्हाण. त्यांना राज्यात येऊन दोन-तीन महिने झाले होते. ते विधिमंडळाच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नव्हते. तसे सदस्य त्यांना व्हायचे होते. त्यासाठी चव्हाण यांनी लोकांमधून निवडून येण्याचा पर्याय अजमावून पाहिले. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ त्यांच्यामते योग्य होता. त्यासाठी उंडाळकरांशी बोलणी करण्यात आली. उंडाळकरांनी कऱ्हाड दक्षिणचा राजीनामा द्यायचा. त्याबदलीत त्यांना विधान परिषदेवर घेऊन मंत्रिपद देण्याचा शब्द होता. अगोदर उंडाळकरांनी या प्रस्तावास संमती दिली; पण नंतर शब्द पाळला जाण्याची खात्री त्यांना वाटत नव्हती. दुसरे असे; खळं कायमचेच पैरेकऱ्याच्या मालकीचे होण्याचा धोका वाटत होता. उंडाळकरांनी या प्रस्तावाला नकार दिला आणि त्यानंतर उंडाळकरांच्या राजकीय इतिहासाच्या कारकिर्दीत प्रथम "स्टेट पॉवर' त्यांच्या विरोधात गेली. त्यानंतरचा कटू घटनाक्रम त्यांच्या स्वत:च्या आणि समर्थकांच्या स्मरणात राहील, असाच आहे. जाणकार लोक म्हणतात, "विलासकाकांनी ती तडजोड केली असती, तर पुढचे काहीच न घडते. उंडाळकरांच्या वाटचालीत एवढे व्हायला हवे होते; पण ते झाले नाही. 1990, 1995, 1999, 2004 आणि 2009 या पाच निवडणुकांत रेठऱ्याची धाकटी आणि थोरली पाती सत्तेच्या ताटात कधी कोशिंबिरीची, कधी पापडाची जागा व्यापून होते. 2014 च्या निवडणुकीत त्यापैकी एका पात्याचा वापर उंडाळकरविरोधी मतांचे विभाजन करण्यासाठी केला गेला, ही एक मोठी चूक आणि अंधश्रद्धा होती. निवडणुकीचे निकाल, आकडेवारी त्यावर झगझगीत प्रकाश टाकते. हा पराभव त्यांचा एकट्याचा नव्हता, तर तो लोकांच्या संघटेनाचाही होता.
हेही वाचा : माणसं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते हाच विलासकाकांचा हाेता श्वास !
माणूस मोठा चिवट
उंडाळकर काका हा माणूस मोठा चिवट होता. 1967 पासून सार्वजनिक जीवन हीच आराधना. सतत तोच विचार. स्वतःची वाट त्यांनी स्वतः निर्माण केली. लोकजीवन, त्यातही ग्रामीण जीवन यासाठी काय हवे याचा डोक्यात पक्का आराखडा. माणसे जोडायची. ज्यांची योग्यता जेवढी तेवढीच त्याची जपणूक करायची. घट्ट जनाधार कसा निर्माण करावा याचा वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला. सातपैकी सहा निवडणुकीत तगडा विरोधक असताना लीलया त्याला पराभूत केले ते त्या बळावर. संघटना सर्व समाजात पोचविली. देशात भाजपची सत्ता असताना आणि पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने व्यापला असताना 2003 मध्ये त्यांनी सोनिया गांधी यांना कऱ्हाडात बोलावून अतिभव्य सभा घेतली. तशी उन्हातली सभा पुन्हा होणार नाही.
राष्ट्रीय विचारांचा खंदा समर्थक
विलासकाका यांनी स्वतःचे नेतृत्व घडविले. संघटना घडविली. संस्थांचे नेतृत्व केले; पण त्यात राष्ट्रीय विचारधारा अग्रेसर होती. त्यांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पक्षात काम केले, तसेच अच्युतराव पटवर्धन यांच्यापासून भाई वैद्य यांच्यापर्यंत असंख्य राष्ट्रीय विचाराच्या लोकांना आपल्या गावी, कऱ्हाडात, सातारा जिल्ह्यात आणले. कऱ्हाडचे नाते देशाशी सतत जोडते ठेवले. अखेरच्या काळात मोहाची आवतण त्यांनाही घरात येऊन दिली; पण ती त्यांनी धुडकावली. मुलाला उदयसिंह पाटील यांना कॉंग्रेस पक्षात पुनश्च कार्यरत केले. जाता जाता उंडाळकर यांनी समाज, संघटना आणि परिसराला राष्ट्रीय संदेशच दिला आहे. काळ बदलला की माणसे बदलतात; पण स्वातंत्र्योत्तर काळातल्या पिढीत उंडाळकर काका फिट अँड परफेक्ट होते. अस्सल आणि अव्वल असा कॉंग्रेसी नेता गेला. त्यांना मनस्वी आदरांजली.
संपादन : सिद्धार्थ लाटकर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.