रंजल्या गांजलेल्यांचा मूकनायक : क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर

Mahatma Basaveshwar article photo
Mahatma Basaveshwar article photo

महापुरुषांची प्रज्ञादृष्टी ही अलौकिकाचा वेध घेत असते.मानवी हक्क व मूल्यांसाठी महापुरुष अविरत संघर्षरत असतात.लोकांचे दुःख यातनांना आपले दुःख समजून घेण्याचे संवेदनशील मन त्यांना जन्मतःच लाभलेले असते. माणसातील पशुत्व नष्ट करुन त्याच्यात माणूसकीचा पाझर फोडण्याचे काम निश्चलतेने आणि दृढनिर्धाराने ते करीत असतात. याच मांदियाळीतील महापुरुष म्हणजे महात्मा बसवेश्वर होय. 

अज्ञान अंधश्रध्देचा अंधःकार दूर करणारा ज्ञानसूर्य म्हणजे महात्मा बसवेश्वर. निष्प्राण-निर्बल समाजात विद्रोहाचा निखारा फुलविणारा विद्रोही म्हणजे महात्मा बसवेश्वर. मानवी हक्क व न्यायाचा झंझावात म्हणजे महात्मा बसवेश्वर. रंजल्या-गांजल्या मूकिया समाजाचा हुंकार म्हणजे महात्मा बसवेश्वर. परिवर्तन लढ्याचा अग्रदूत म्हणजे महात्मा बसवेश्वर. महाकारुणिक तथागत बुद्धा नंतर उमटलेला समतेचा निनाद म्हणजे महात्मा बसवेश्वर.

तत्कालीन परिस्थिती: महात्मा बसवेश्वरांच्या समतेच्या, मानवतेच्या महान कार्याचे मोल जाणून घ्यायचे असेल तर कुठल्या धार्मिक व सामाजिक परिस्थितीत त्यांचे कार्य झाले हे जाणून घेणे अत्यावश्यक ठरते. बाराव्या शतकात असणारी धार्मिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती व धर्मांध धर्मसत्ते बरोबरचा संघर्ष ह्या पार्श्वभूमीवरच महात्मा बसवेश्वरांच्या अलौकिक कार्याचे, त्यांच्या  त्याग व बलिदानाचे अवलोकन केले पाहिजे.

अस्पृश्यता : महात्मा बसवेश्वरांचे कार्य हे बाराव्या शतकात झालेले आहे. या कालखंडातील धार्मिक, सामाजिक वातावरण हे मानवतेला कलंकीत करणारे होते. धर्मांध धर्मसत्तेद्वारे इथल्या श्रमजीवी, कष्टकरींना जात-पातीच्या बेड्यांमध्ये अडकवून टाकण्यात आले होते. त्यांच्यावर रोटी-बेटी व्यवहार करण्याची बंदी होती. उच्च जातीत  अथवा अतिशूद्र जातीत जन्म झाल्याचा संबंध नशिब-भाग्याशी, पाप-पुण्याशी अत्यंत सफाईदारपणे जोडून त्यांना दैववादी बनवून आपल्या नादी लावण्यात धर्म व्यवस्था यशस्वी ठरली होती. आपल्या दैन्न्याला इथली व्यवस्था जबाबदार आहे याचे भान या शोषितवर्गाला होणार नाही याची पुरेपूर दक्षता व्यवस्थेने घेतली होती. वाट्यास आलेले दैन्न्य, दुःख हे आपल्या नशिबाचे भोग आहेत हे शोषितवर्गाच्या मनावर बिंबविण्यात आले. मने मारली की मेंदू आणि मनगटे ताब्यात घेता येतात व शस्त्र न चालविता शूद्र-अतिशूद्रांचे शोषण पिढ्यांपिढ्या बिनबोभाटपणे सुरु होते.

शूद्र अतिशूद्रांचे मानसिक खच्चीकरण : शूद्र-अतिशूद्रांना, स्त्री वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले होते. त्यांना गावात प्रवेश निषिद्ध होता. उच्च वर्णियांचे अनुमतीनेच गावात प्रवेश दिला जात असे. या शोषितवर्गाला शिक्षण घेऊ नका, चांगले अन्न खाऊ नका, चांगले कपडे वापरु नका, चांगल्या घरात राहू नका अशा अनेक प्रकारच्या नकारघंटा वाजवून शूद्र-अतिशूद्रांचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले. मने मेली की अभिमान-स्वाभिमान संपतो अपमान वाटेनासा होतो. कशाचेच काही वाटेनासे होते. नैतिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वच बाजूंनी उच्चवर्णिय शूद्र-अतिशूद्रांची पिळवणूक करीत होते. मानवतेला कलंकीत करुनही त्यांना त्याचे काहीच  वाटत नव्हते उलट आपण धर्माप्रमाणे वागल्याचा वृथा अभिमान वाटत असे.

स्त्री शक्तीचे शोषण : समाजाने कुत्रा, गाय, बैल, माकड, हत्ती, वाघ, सिंह ई.जनावरांची पूजा बांधली पण समाजाचे अर्धांग असलेल्या स्त्रीच्या पायात गुलामी व शोषणाच्या बेड्या ठोकल्या. ऊदात्तीकरणाची मानसिक भूल देऊन सतीप्रथे सारखी अनिष्ट प्रथा रुढ करण्यात आली. शास्त्रसंमत बालविवाह प्रथा रुढ होती. देवाच्या सेवेच्या नावाखाली देवदासी सारख्या अनिष्ट प्रथा रुढ करण्यात आल्यात. अशा प्रकारे अनिष्ट रुढी-प्रथा परंपरेचे ओझे स्त्री वर्गाच्या मानगुटीवर टाकून त्यांचे हवे तसे शोषण करण्यात आले. 

कर्मकांड पाखंडाचे स्तोम : कर्मकांड पाखंडाचे जाळ्यात शूद्र-अतिशूद्रांना अडकवण्यात आले. मंदिरे  व तीर्थक्षेत्रे ही पुरोहितांची, धनिकांची कमाईची, मनोरंजनाची क्षेत्रे झाली होती. धर्म ही मूठभर लोकांची मक्तेदारी झाली होती. माणुस होता पण माणुसकी सापडेनाशी झाली होती.

महात्मा बसवेश्वरांचे मानवतावादी महान कार्य: अशा बिकट काळात महात्मा बसवेश्वरांचे मानवतावादी  महान कार्य होऊन गेले. बिकट परिस्थितीच महापुरुषांच्या कर्तृत्वाला व हिंमतीला आव्हान देत असते. त्या आव्हानांना सामोरे  जाऊन गतानुगतिक झालेल्या समाजात अभिमान-स्वाभिमानाचे  बिजांकूर करुन समाजाला चालते-बोलते करणे हेच महापुरुषांच्या जीवनाचे ध्येय असते. महात्मा बसवेश्वर याच महापुरुषांच्या  मांदियाळीतील अग्रदूत होत.

जन्म व कौटूंबिक: महात्मा बसवेश्वरांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेस ई.स.११३१ साली  मादरस व मादलांबिका या वीरशैव-लिंगायत दांपत्यापोटी, बागेवाडी जिल्हा विजापूर येथे झाला. ते जन्माने व कर्माने वीरशैव-लिंगायत होते. कुडलसंगम येथील जातवेद मूनींनी महात्मा बसवेश्वरांना त्यांचे  बालपणीच लिंगदीक्षा दिली होती. आपल्या ३६वर्षांच्या अल्पजीवन काळात सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक,साहित्यीक, व राजकीय क्षेत्रात प्रचंड काम करुन समतेचे बिजांकूर केले. शूद्र-अतिशूद्रांना मोकळ्या वातावरणात श्वास घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली. संपलेल्या रसातळी गेलेल्या वीरशैव-लिंगायत धर्माचा प्रचार व प्रसार करुन त्याला पुनर्रप्रस्थापित केले.

स्त्रीमुक्ती लढ्याचे रणशिंग फुंकले: बाराव्या शतकात मनूवादी धर्मव्यवेस्थेचा प्रचंड पगडा बहुजन समाजावर पडलेला होता. काही जातीतर स्वतःला ऊच्च दाखविण्यासाठी 'देवब्राम्हण'तर काही 'लिंगी ब्राह्मण म्हणवून घेत होत्या. महात्मा बसवेश्वरांच्या घराण्यातही मुंज प्रथा अशीच रुढ झाली होती. वयाच्या आठव्या वर्षी त्यांची मुंज करण्याचे त्यांचे आई-वडिलांनी ठरविले. माझी मुंज करता मग माझ्यापेक्षा वयाने मोठ्या अक्क नागम्माची मुंज का नाही? हा प्रश्न ऊपस्थित करुन मुंज करण्यास नकार दिला. ही अनपेक्षितपणे घडलेली घटना नव्हती तर धर्मव्यवस्थेने स्त्रीवर्गाला नाकारलेले मानवी हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी वयाच्या आठव्या वर्षी  फुंकलेले  स्त्रीमुक्तीचे रणशिंग होते. पुढे महात्मा बसवेश्वरांनी शास्त्रसंमत बालविवाह आणि सतीप्रथेला विरोध केला.जातीअंतासाठी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला.देहविक्रय करणा-या स्त्रीयांना सन्मानाने व नैतिकतेने ऊभे केले. स्त्रीयांना शिक्षा व दीक्षे चे अधिकार दिले. वचन साहित्याचे माध्यमातून अनेक शूद्र-अतिशूद्रांनी,स्त्रीयांनी समाजाला दिशा देण्याचे अभूतपुर्व काम करुन दाखविले व महात्मा बसवेश्वरांनी दाखविलेला विश्वास सार्थ केला.

काळाच्या कितीतरी पुढिल कामे महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात करुन दाखविलीत. स्त्रीवर्गाच्या ऊत्थानासाठी कल्याणासाठी लढणा-या महात्मा बसवेश्वर ,महात्मा जोतीराव फुले, क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांची नावे आज स्त्रीवर्गाला आठवत नाहीत पण पुराणातली वांगी तिला बरोबर आठवतात ही खरी शोकांतिका आहे.

शूद्र-अतिशूद्र, अस्पृश्यांमध्ये विद्रोहाचा वणवा चेतविला : विषमतेच्या दाहकतेने पोळून निघालेल्या शूद्र-अतिशूद्रांवरा महात्मा बसवेश्वरांनी समतेची फुंकर घातली. आपल्या प्रखर बुद्धीने, ज्ञानाने व विज्ञानवादी तर्क शुद्ध मांडणीने त्यांनी गतानुगतिक झालेल्या समाजाचे मानसिक प्रबोधन करुन विद्रोहाचा वणवा चेतविला. बोलायला, लिहायला हे सोपे वाटत असले तरी धर्मांधांच्या दहशतीच्या जबड्यातून निर्बल, निष्क्रिय झालेल्या, असाहाय्य शूद्र-अतिशूद्रांना बाहेर काढणे हे असंभव वाटणारे काम महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात करुन दाखविले. आपल्या वचनांच्या माध्यमातून त्यांनी अनिष्ट रुढी-प्रथा परंपरांना विरोध केला. मंदिर-तीर्थक्षेत्री जाऊ नका. तिथे देव नाही तर त्याचे दलाल असतात. शिक्षीत व्हा. ऊच्च-कनिष्ठ भेद मानू नका. असा ऊपदेश करुन तत्कालीन सामाजाचे प्रबोधन केले. महात्मा बसवेश्वरांच्या प्रबोधनामुळे शूद्र-अतिशूद्र समाज खडबडून जागा झाला. कंबरेला लटकवलेला झाडू व गळ्यातील मडके भिरकाऊन देता झाला. धर्मव्यवस्थेची दैवते, प्रथा-परंपरा नाकारता झाला.

अनुभव-मंटप: अनुभव-मंटप विचारपीठाच्या व वचनसाहित्याच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी परिवर्तनाची किमया साधली होती.आपल्या अनुभवाच्या कनाती ताणून ७०० शरण व ७० शरण्णम्मांनी अनुभव-मंटप साकार केले होते.हे सर्वजण जाती पंथ प्रदेशाच्या,भाषेच्या,वर्ण-वर्गाच्या  भिंती गाडून अनुभव-मंटपात एकत्र बसत,चर्चा करीत व त्याची अंमलबजावणी करीत.अनुभव-मंटप हे भारताच्या संसदीय व्यवस्थेचे मूळ प्रारुप होय.

कल्याण क्रांती : चांभार जातीतून आलेले महाशरण हरळय्या यांचा मुलगा शिलवंत याचा विवाह ब्राह्मण जातीतून आलेले मधुवरस यांची मुलगी कलावती उर्फ वनजा हिचे सोबत महात्मा बसवेश्वरांनी अनुभव-मंटपात लावून दिला. महात्मा बसवेश्वरांच्या मानवतावादी विचारांनी संत्रस्त झालेल्या धर्मांधांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. धर्म बुडाल्याची ओरड या सनातनी वर्गाकडून करण्यात आली. राजा बिज्जलावर दडपण आणून महाशरण संत हरळय्या त्यांचा मुलगा शिलवंत आणि महाशरण मधुवरस यांना 'एळहट्टे' ही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली व अंमलबजावणी करण्यात आली. सारे कल्याणराज्य या घटनेने हादरुन गेले. राजा बिज्जलाची हत्या झाली, या घटनेचे खापर शरणांवर फोडून राज व्यवस्थेला महात्मा बसवेश्वर व त्यांच्या परिवर्तन चळवळीविरुद्ध ऊभे करण्यात सनातनीवर्ग यशस्वी ठरला. भविष्यात पुन्हा कोणी धर्मांधांसत्तेविरुद्ध प्रश्नचिन्ह निर्माण करु नये म्हणून 'अनुभव-मंटप' खाक करण्यात आले. मानवकल्याणाची क्रांतीगिते असलेले वचन साहित्य पेटऊन देण्यात आले. हजारो शरण-शरण्णम्मांना कापून काढण्यात आले. महाशरण डोहार कक्कय्या, गणाचारीदल सुत्रधार माडिवळ माचय्या, महात्मा बसवेश्वर पत्नी गंगांबिका, महशरण संत हरळय्या पत्नी कल्याणम्मा यांचेसह हजारो शरण-शरण्णम्मांना वचनसाहित्याचे रक्षणार्थ हौतात्म प्राप्त झाले.कुडलसंगम जिल्हा बागलकोट येथे रंजल्या-गांजलेल्यांचा मूकनायक महात्मा बसवेश्वरांची हत्या करण्यात आली. मानवी हक्क व न्यायाचा झंझावात, विषमतेचा कर्दनकाळ, समतादूत शांत करण्यात आला.

अस्पृश्यता निर्मुलनासाठी, स्त्रीमुक्तीसाठी, अज्ञान व अंधश्रध्देचा काळोख दूर करण्यासाठी, श्रमाला व श्रमिकांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, समता-बंधूता-मानवी हक्क मूल्यांच्या स्थापनेसाठी महात्मा बसवेश्वरांना बलिदान द्यावे लागले. आज समाज सुशिक्षित झाला, पण संस्कार विसरला. म्हणूनच उन्नाव, हैद्राबाद, हिंगणघाटसारख्या माणूसकीला काळीमा फासणाऱ्या निंदनीय घटना देशभरात घडताहेत. म्हणूनच आज समाजाला, देशाला  महात्मा बसवेश्वरांच्या मानवतावादी कृतीशील विचारांची नितांत गरज आहे. 
रंजल्या गांजलेल्यांचा मूकनायक क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांना त्यांच्या आठशे एकोणनव्वदाव्या जयंती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन! मानाचा जय शिवा.

महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! जय शिवा!

(लेखक हे शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.