स्त्रियांवरील दुष्परिणामांचा हा अँगल कोणी विचारात घेईल का?

कोरोना
कोरोना

कोरोना व्हायरसने अवघं जग भयकंपीत झालंय. जगावर राज्य करू पाहणारे आणि स्वतःला महासत्ता म्हणू पाहणाऱ्या देशांनी या अदृश्‍य व्हायरसपुढे हात टेकलेत. कोणत्याच राष्ट्राला लॉकडॉउनची अपरिहार्यता टाळता येईना. परिणामतः जागतिक आयात- निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. मेडिसीनपासून ते अनेकविध अत्यावश्‍यक आणि तत्सम महत्त्वाच्या वस्तूंचा तुटवडाही बाजारपेठांमध्येही जाणवतोय. लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगधंद्यांचेही शटरडाऊन झालंय. अदृश्‍य स्वरुपातील व्हायरसने संपुर्ण दुनियेच्या चक्राचा वेग मंदावून टाकलाय. 

भारतालाही या परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. एकापाठोपाठ एक असे लॉकडाउनवर लॉकडाउनवर आदळलेत. जवळपास शंभर कोटी लोकसंख्येला पूर्वीप्रमाणे मुक्तपणे वावर करता येणं अशक्‍य होऊन बसलंय. लोकजीवन संपूर्णपणे बदलून गेलंय. भारतीय माणूस लॉकडाउनमध्ये अडकलाय या स्थितीला सुमारे शंभरहून अधिक दिवस झालेत. त्यामुळे व्यापार- उद्योगही ठप्पच झालांय. एक दिवस जर भारत बंद राहिला, तर त्या एका दिवसाचे नुकसान भरून काढावयास साधारपणे महिना जावा लागतो. आता तर शंभर दिवसही लॉकडाउनने ओलांडलेत. एवढ्या दिवसांतलं बिघडलेलं अर्थगणित कसं दुरुस्त होणार किंवा ते कसे ट्रकवर येणार हे एक भारतापुढे मोठे आव्हानच आहे. 

लॉकडाउनमुळे भारतीय लोकसमुहातील ज्या गरीब, कष्टकरी, मजुरांचे पोट हातावरचे आहे त्यांची हालअपेष्टा आणि कुंचबना पराकोटीची होत आहे. स्त्रियांना तर यातना, वेदनांचा जो भोगवटा वाट्याला आलाय तो तर मन हेलावून टाकणारा असाच आहे. वेगवेगळ्या संकटाना, त्रासाला सामोरे जाताना त्यांची दमछाक होतेय. या लॉकडाउनच्या काळात कौटुबिक हिंसाचाराच्या प्रमाणाचा आलेख वाढल्याचे दिसतोय. लॉकडाउनच्या शंभर दिवसांत कुटुंबातील कर्त्या स्त्रीवर कामाचा अतिरिक्त ताण येऊन पडला. कुटुंबातील सदस्यांच्या म्हणजेच मुले, नवरा किंवा सासू- सासरे यांच्या डिमांडनुसार सर्वांच्याच खाण्यापिण्याच्या गरजा तीला पूर्ण कराव्या लागत आहेत. त्यात काही चूकभूल झाली तर त्यावरून उसळणाऱ्या वादंगाला तीला सामोरे जावे लागत आहे. अनेक स्त्रिया मारहाणीच्या बळी ठरत आहेत. खरंतर शारीरिक मारहाणीपेक्षा होणारा मानसिक त्रास, घुसमट ही त्याहून फार भयंकर आहे. मात्र कुटुंबात असल्याने निमुटपणे सर्व सहन करण्याशिवाय तिच्यापुढे काहीच पर्याय उरत नाही. त्यात काम करणारी (वर्क फ्रॉम होम) स्त्री असेल तर तिला खूपच कसरत करावी लागत आहे. ऑफीसमधून येणारे फोन्स कॉल, मोबाईलवर येणारे मेसेज या आणि अशा कारणास्तव त्या स्त्रीला कुंटुबातून विचारले जाणारे प्रश्न या साऱ्या प्रकारामुळे येणारे मानसिक दडपण याचा अप्रत्यक्षपणे तिच्या सर्वप्रकाराच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य ढासळलेलं आपणास पहायला मिळते आहे. 

या लॉकडाउनमध्ये स्त्रियांच्या व्यथांची चर्चा करत असताना कोणत्याही सामाजिक योजनेच्या लाभार्थी नसणाऱ्या वेश्‍यांच्या यातनांच्या कथेचाही इथं विचार व्हायला हवा. कारण लॉकडाउनच्या काळात सगळ्यात जास्त हाल कोणाचे झाले असेल तर वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या समूहातील कुटुंबांचे. कारण यांचा जो व्यवसाय आहे ते व्यक्तीच्या संपर्कात आल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कोरोनाने तर माणूसच माणसापासून दूर केला आहे. असे असताना आणि शारीरिक अंतराची सीमारेषा घातली असताना या स्त्री समुहाची (वेश्‍यांची) वाताहात काय झालीय, याचा अंदाजही करवत नाही. 

कोरोनाने मरण्यापेक्षा हातातोंडाची भेट होऊ न देता या स्त्रियांची जी जगण्याची प्रतारणा केलीय ती दुर्लक्षून चालणार नाही. एकंदरीत फिजीकल डिस्टन्सिंगच्या परिस्थितीत या स्त्रियांच्या उदरनिर्वाहाचा, रोजीरोटीचा यक्ष प्रश्न निर्माण झालाय. लॉकडाउनने त्याची दाहकता आणखी वाढवलीय. हे जरी खरं असलं तरी मुळात उदरनिर्वाहसाठी त्यांनी अश्‍या पद्धतीचे म्हणजे देह विक्रीची काम करूच नये यासाठी काय करता येऊ शकते याचा विचार होणं महत्त्वाचं आहे. 

कोरोना हा व्हायरस विमानातून आला असला तरी त्यांचे परिणाम जमिनीवर राहणाऱ्या उपेक्षित, वंचित गरीब कुटुंबावर जास्त प्रमाणात झालेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर भरडल्या गेल्या आहेत, त्या वेश्‍या... त्यांचं जगण्याचं भयावह वास्तव हे खरतंर न पटण्यासारखं आणि सहन न होण्यासारखं आहे. वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांच्या प्रश्नावर अनेक सामाजिक संस्था काम करताहेत. अशाच एका संस्थेतील एका मैत्रिणीकडून मिळालेली माहिती अशी, सरकारची रेशनींग सेवा या स्त्रियांकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना उपलब्ध झालेली नाही. बऱ्याच स्त्रीयांची मुले सामाजिक संस्थेच्या सहकार्यातून आश्रमशाळेत असतात. ती सर्व मुले लॉकडाउनमुळे आता त्यांच्याजवळ आलेली आहेत. त्यामुळे त्यांचा खाण्याचा प्रश्न अधिक बिकट होऊन बसलाय. काही संस्था, काही लोक धान्यवाटपाचे वेश्‍या वसाहतीत "इव्हेंट' करताहेत तर, काहींनी मानवतावादी दृष्टिकोनातून जीवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा केलाय. पण मला इथे असे म्हणायचे आहे, ही जी मदत दिली गेली आहे ही तात्पुरत्या स्वरुपाची आहे. तेव्हा, इतर स्त्रियांना ज्या सोयी सुविधांचा लाभ मिळत आहे अगदी तसाच वेश्‍यांनाही तो मिळायला पाहिजे. 

समाजकार्याचे शिक्षण घेत असताना मला वेगवेगळ्या वंचित समूहाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मी ज्या सामाजिक संस्थेमध्ये ट्रेनिंगसाठी होते, त्या संस्थेनं वेश्‍याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी एक टास्क दिला होता. ज्या लाभार्थीना शिक्षणासाठी स्पॉनसरशिप द्यायची आहे त्यांची माहिती जमा करण्यासाठी अशा वस्तीत जावून सर्वेक्षण करावयाचे होते. माझ्यासोबत गोव्याची एक इंटर होती. आम्ही दोन्ही संस्थेच्या मदतीने ग्रॅंडरोड येथील रेड लाईट एरियामध्ये गेलो. तिथे काही महिला आम्हांला भेटल्या. एक स्त्री म्हणून जगत असताना किती भयावह संकटाना त्यांना सामोरे जावे लागते याची वेदनादायी मालिकाच त्यांनी आम्हाला ऐकवली. त्याची फसवणूक आपल्याच जवळच्या माणसांकडून कशी झालेली असते, या व्यवसायासाठी त्यांना कसे प्रवृत्त केले जाते, चांगल्या हसत्याखेळत्या कुटुंबातून तोडून त्यांना कुंटणखाण्यापर्यंत कसे पोचवले जाते आणि मग तिथून पुढचा प्रवास वगैरे वगैरे हे सारंच मन आणि काळीज पिळटून टाकणारी अशीच त्याची दर्दभरी कहाणी होती. 

मुळात स्त्रीला आपले शरीर विकून चरितार्थ करावा लागणं, ही कल्पनाच मानवी मनाला वेदना देणारी आहे. तेव्हा स्त्रीच्या अशा वेदनादायी जीवनाकडे पाहताना खूपच संवेदनशीलतेने पहावे लागणार आहे. तीच्या वाट्याला हे जगणं का आले. कशासाठी तिला ही वाट धुंडाळावी लागली या आणि अशा प्रश्नांच्या खोलात गेले की मग नेमक्‍या कारणापर्यंत पोहचणं शक्‍य होईल. कोणी म्हणेल पोटासाठी, कोणी अय्याशीसाठी तर कोणी आणखी काहीही म्हणेल. मुद्दा हा म्हणण्याचा नाहीच. स्त्रीचे स्त्रीत्व पैशात ओरबडून घेणं कितपत योग्य आहे, प्रश्‍न हा आहे. वेश्‍या व्यवसायाच्या संबंधी अनेक मतप्रवाह आहेत. कोणी म्हणतंय याला कायदेशीर मान्यता द्या, तर कोणाचा याला तीव्र विरोध आहे. जे मान्यता द्या असे म्हणताहेत तो विशिष्ट वर्ग आहे, जो की त्या वर्गसमुहातील स्त्रीया व्यवसायात कुठे दिसत नाहीत. जे तीव्र विरोध करताहेत त्यांचे म्हणणे असे की गरीब, उपेक्षित आणि भाकरीविना तडफडणाऱ्या वर्गाची जो की या व्यवसायात आहे त्यांची यातून सुटका करावी आणि इतर स्त्रियाप्रमाणे त्यांच्या जीवनाला चांगली दिशा द्यावी वगैरे वगैरे. 

एकंदर, लॉकडाउन काळातच नव्हेतर कायम स्वरुपात स्त्री आणि तीच्या सर्वप्रकारच्या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक पहायला हवे. तरच तिचे जगणं तिच्यासाठी सुसह्य होईल. अन्यथा केवळ स्त्री सबलीकरणाचा आणि सक्षमीकरणाचा डांगोरा पिटत राहणं ही भारतीय स्त्रीत्वाची घोर फसवणूक ठरेल ! 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com