गीत रामायण...

Geet-Ramayan
Geet-Ramayan

महर्षि वाल्मिकींनी रचलेलं संस्कृत रामायण गेल्या काही हजार वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग झालं आहे तर आधुनिक वाल्मिकी गदिमा म्हणजेच ग दि माडगूळकरांनी त्या रामायणाला अस्सल मराठी देशीकार लेण्यात घडवलं त्याला काल चौसष्ट वर्षे पूर्ण झाली. या चौसष्ट वर्षांनंतरही गदिमांचं हे गीतरामायण तितकच ताजतवानं, तितकच रसरशीत, तितकच मराठी मनाचा ठाव घेणारं असं राहिलं आहे. केवळ धार्मिक मंडळींनाच नव्हे तर विविध मानवी भावभावनांचं प्रतिभेच्या उत्तुंग भरारीनं घडवलेलं दर्शन आवडणाऱ्या अधार्मिक रसिकांनाही ते तितकच भावत राहिलं आहे.

गीत रामायण म्हणजे गदिमांचे भावपूर्ण शब्द, भावगंधर्व सुधीर फडके उर्फ बाबूजींचं सुरेल संगीत अन काळजापर्यंत पोचणारा स्वर यांचा अतुलनीय असा संगम... अलौकिकत्वाचा स्पर्श असलेलं रसायन.                                
या गीत रामायणाला साठ वर्षे पूर्ण झाली ती चार वर्षांपूर्वी. त्यानिमित्तानं गदिमा प्रतिष्ठाननं प्रसिद्ध केलेल्या स्मरणिकेत माझाही लेख होता. विविध मंडळींनी गीत रामायणाच्या वेगवेगळ्या पैलूंवर लिहिलं होतं. बाबुजी अनेक वर्षे रामनवमीला गीत रामायण पुण्यात सादर करीत असत. शाळेत असल्यापासून मी ते कार्यक्रम चुकवत नसे. त्या आठवणींवर असा तो लेख होता. रामनवमीनिमित्त आज आपल्यापुढं ठेवतो आहे.

भावगंगेत सचैल न्हालो...
गीत रामायण जन्मलं-कागदावर प्रकटलं ते पुण्यात. या अवीट गोडीच्या शब्दकळेला स्वरसाज चढला तो पुण्यात, त्याचं आकाशवाणीवरनं पहिलं प्रसारण झालं तेही पुण्यात. त्यामुळं पुणे हेच गीत रामायणाची गंगोत्री ठरलं. याच गीत रामायणानं पुढं तब्बल साठ वर्षे अवघ्या मराठी मनाला गारूड घातलं. त्यामुळं पुण्यनगरीत जन्मलेल्या या सांस्कृतिक संचिताबाबत पुणेकरांना विशेष ममत्व आहे. 
मराठी मन उचंबळून येतं ते तुकोबाच्या अभंगानं, लता मंगेशकरांच्या सुरेल तानेनं-आषाढी वारीतल्या एकतारीनं, पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणीनं तसंच बाबूजींचा स्वरसाज असलेल्या गदिमांच्या गीत रामायणानं ... महाराष्ट्राच्या मातीतल्या गदिमा या साहित्यशिल्पीनं घडवलेल्या सुघड, भावपूर्ण देशीकार लेण्याचं कौतुक करावं का त्याला सुधीर फडके उर्फ बाबूजींनी दिलेल्या अलौकिक स्वरसाजाविषयी तोंडभरून बोलावं, ते समजत नाही. देशाचं महाकाव्य असलेल्या महाभारतातील संस्कृत देववाणीतल्या भगवद्‌गीतेला ज्ञानदेव बाळानं अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या प्राकृतात आणलं. तितक्‍याच तोलामोलाच्या रामायण या दुसऱ्या महाकाव्यातल्या छप्पन्न प्रसंगांवर आधारित रसाळ काव्यरचना महाराष्ट्रदेशातल्या "अर्वाचीन वाल्मिकी'नं गीत रामायणाच्या रूपानं केली. त्या गीतांनी अवघा मराठी मुलूख डोलू लागला, मंत्रमुग्ध झाला, तृप्त झाला, राममय झाला, भावकल्लोळात बुडून गेला, आसवांमध्ये वाहून गेला, आनंदात न्हाऊन गेला, वीरश्रीनं स्फुरून गेला. 

मराठमोळ्या मनाला झुलवणारी, सर्वार्थानं फुलवणारी ही गीतरामायणरूपी मौक्तिकमाळ पुण्यात गुंफली गेली. गदिमा जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरच्या वाकडेवाडीतल्या आपल्या घरी बैठक मारून एक-एक गीत रचत होते. प्रत्येक आठवड्याला नवं गीत रचलं जाई, त्याला बाबूजी तत्परतेनं चाल लावत आणि दर रविवारी सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून त्याचं प्रक्षेपण होई. आकाशवाणीचे अधिकारी पुरूषोत्तम जोशी यांच्या धीरगंभीर आवाजातल्या निवेदनाची जोडही त्याला होती. पहिलं गीत झालं की पुढच्या गीताची तयारी सुरू होई आणि पुढच्या रविवारपर्यंतचा प्रवास हा प्रसववेदनेपासून सुरू होणाऱ्या सृजनसोहळ्याचा असे. पुण्याच्या टिळक रस्त्यावरच्या चित्रकुटीत बाबूजी गीतांना चाली लावत. एकदा लावलेली चाल आकाशवाणीच्या केंद्रापर्यंत पोचेपर्यंत बाबूजींनी कशी बदलली, याच्याही सुरस कथा पुणेकरांना माहिती आहेत. तात्पर्य काय, तर गीतरामायणाच्या जन्मसोहळ्यात पुण्यनगरी केवळ साक्षीदारच नव्हे तर एक भागीदार झाली होती. 

गीत रामायण पुण्यात प्रथम आकाशवाणीवरून सादर झालं आणि त्याच्या सादरीकरणाचे प्रयोग राज्यभर सुरू झाले, पण त्यानंतर काही काळातच प्रत्येक वर्षी रामनवमीच्या मुहूर्ताला बाबूजींचं गीतरामायण पुण्यात होणार, हे ठरूनच गेलं. या कार्यक्रमाच्या जागा बदलत गेल्या. कधी बाजीराव रस्त्यावरच्या नू. म. वि. प्रशालेचं प्रांगण तर कधी रेणुकास्वरूप प्रशालेचं मैदान, पण हे गीत रामायण चुकवायचं नाही, असा पुणेकरांचा नेमच झाला. बाबूजी संवादिनी म्हणजे हार्मोनियम घेऊन बैठक मारणार, पहिल्या मनोहारी स्वरभेंडोळ्यांनंतर "श्रीराम...श्रीराम...श्रीराम' या स्वरांची फेक करणार आणि त्यानंतर काही तास आपल्याला एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जाणार, हे ठरलेलं होतं. असंख्य पुणेकर वर्षामागून वर्षे या स्वरसोहळ्यात तृप्त होत होते. पहिल्या गीतरामायणातील गीतं वेगवेगळ्या गायकांनी गायलेली होती, मात्र त्यानंतरच्या पुण्यातल्या कार्यक्रमांत सहसा बाबूजीच सर्व गीतं सादर करत. अन्य गायकांशी तुलना करण्याचा विषय नाही, पण बाबूजींकडून गीतरामायण ऐकणं, हा एक वेगळाच अनुभव होता. प्रत्येक गीतातली त्यांची तन्मयता आम्ही पुणेकरांनी अनेक वर्षे पाहिली आहे. आरोह-अवरोहातील स्वरलगाव सांभाळत शब्दांतून भाव व्यक्त नव्हे तर जिवंत करणं, ही बाबूजींची खासियत. गदिमांनी रचलेल्या गीतांमधून विविध मनोभावना तरलपणं, अचूकपणं व्यक्त झाल्या, त्या तितक्‍याच ताकदीनं बाबूजींनी उतरवल्या. "स्वये श्री रामप्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती' या गीतापासून हा स्वरप्रवास सुरू होतो, त्यातील निवेदकाचा प्रसन्न स्वर त्यांनी नेमका टिपलाय. "उगा का काळीज माझे उले, पाहुनी वेलीवरची फुले' मधील कौसल्येची कातरता, "दशरथा, घे हे पायसदान' मधील कणखरता, "सावळा ग रामचंद्र'मधील वात्सल्य, "स्वयंवर झाले सीतेचे' मधील शब्दचित्राची ताकद, "नको रे जाऊ रामराया'मधील हृदय विदीर्ण झालेली आई, "जेथे राघव तेथे सीता' मधील पतीप्रेमाची उत्कटता, "जय गंगे जय भागीरथी'मधील उत्फुल्लता, "माता न तू वैरिणी'मधील भरताचा स्फोटक-ठिणग्या बाहेर पडणारा संताप, "दैवजात दुःखे भरता', मधील तटस्थ स्थितप्रज्ञता, "कोण तू कुठला राजकुमार' तसंच "मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा' मधील स्त्रीसुलभ नाजूकता, "सूड घे त्याचा लंकापती'मधील त्राटिकेचा आवेश, "सेतू बांधा रे' मधील सांघिक भावना, "मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे' मधील सीतेचा त्रैलोक्‍य अपुरा पडणारा शोक...ही झाली गीतरामायणांतील वानगीदाखलची काही उदाहरणं. स्त्रीस्वभाव कसा असतो, त्याचे बारकावे गदिमांनी अचूक टिपलेत. "का भरतावर छत्रे पाहू, दास्य का करू कारण नसता', असं कौसल्या रामाला विचारते. त्याच गीतात ती स्त्रीस्वभावाचा आणखी एक नाजूक पदर उलगडते. कैकयीबाबत कौसल्या म्हणते, सांगू नये ते आज सांगते, मजहून यांना ती आवडते, तसंच "पती न राघव केवळ नृपती' असं रामानं त्यागलेली सीता म्हणते. संयत संताप दुसऱ्या कोणत्याही शब्दांनी व्यक्त झाला असता ? बाबूजींनीही अनेक पंक्तींमध्ये कमालच केली आहे. "फुलू लागले फूल हळूहळू गाली लज्जेचे', या पंक्तीतील लडिवाळपणा बाबूजीच व्यक्त करू जाणोत. "माता न तू वैरिणी'मधे भरत संतापून तार स्वरात भराभर बोलत असतानाही त्यातील प्रत्येक शब्द अचूक समजतो. ही ताकद केवळ बाबूजींमध्येच होती. "बोलत बोलत ते गहिवरले, कमलनयनि त्या आसू भरले, करूण दृष्य ते अजुन न सरले, गंगातीरी - सौमित्रीसह - उभे जानकी - राम...,' या पंक्ती जेव्हा सादर होत, तेव्हा ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावत. या मौक्तिकमाळेतला मध्यभागी असलेला टपोरा मोती म्हणजे दैवजात दुःखे भरता... भारतीय तत्त्वज्ञानाचं तसंच गीतेचं सार या गीतात गदिमांनी सांगितलय. कधीतरी कशाचा तरी आधार हवा, असं माणसाला वाटतं तेव्हा हे गीत ऐकलं की चित्तवृत्ती स्थिर होतात, हा अनेकांचा अनुभव आहे.

कधी कधी बाबूजींचा आवाज बसलेला असायचा, तब्येत नगमगरम असायची. त्यावेळी ते सुरवात अशी करायचे..."आवाज बसलाय... तरीही गाणार आहे...' त्याला श्रोत्यांकडून टाळी यायची. मात्र एकामागून एक गीतं पुढं सरकत गेली, की मग आवाजही खुलू लागे. भरताचं गीत आवेशात गायल्यानंतर काही मिनिटं संवादिनीवर डोकं टेकवून बाबूजी तसेच बसून राहायचे. बऱ्याचदा त्या गीतानंच मध्यंतर व्हायचं. बाबूजींनी सादर केलेलं हे गीतरामायण पुणेकरांनी असंच वर्षानुवर्षे कानांनी प्यायलं. गीतरामायणाच्या पंचविसाव्या आणि पन्नासाव्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम झोकात आणि भव्य प्रमाणात पुण्यातच झाले. अटलबिहारी वाजपेयी तसेच इतरही अनेक नामवंतांच्या प्रमुख उपस्थितीत झालेला सोहळा पुणेकरांच्या दृष्टीनं संस्मरणीय ठरला. उत्कृष्ट वक्तृत्वाचा नमुना म्हणजे अटलजी. "पूना दख्खन की काशीं हैं...' हे वाक्‍य त्यांनी आपल्या खास शैलीत उच्चारलं मात्र, भारावलेल्या पुणेकरांनी टाळ्यांची गजराची जी दाद दिली, ती अजूनही आठवते. 

याच गीतरामायणाची साठीही पुण्यातच मोठ्या उत्साहानं, दिमाखात साजरी होतेय. साठ वर्षे उलटूनही गीतरामायण तितकंच ताजंतवानं आहे, स्फूर्तिदायी आहे. रामभक्त हनुमानाच्या तोंडी "जोवरी हे जग, जोवरी भाषण, तोवरि नूतन नित रामायण' या पंक्ती गदिमांनी घातल्या खऱ्या, पण त्या गीतरामायणाच्या बाबतीतही प्रत्येक मराठी माणूस निश्‍चितच म्हणेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.