कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आणि प्रश्‍न...

Artificial intelligence technology and questions
Artificial intelligence technology and questions

निसर्गातील एखाद्या गुंतागुंतीचा प्रश्‍न विचारा असे कुणी सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? तुम्ही म्हणाल, मी तर प्रश्‍न विचारला आहे. उत्तर मिळू शकेल. पण नुसता प्रश्‍न विचारुन एखाद्या प्रश्‍नाचे उत्तर मिळेलच असे नाही; तर हा प्रश्‍न तुम्ही अतिशय शक्तीशाली पद्धतीने विचारला गेला पाहिजे. तेव्हाच निसर्गातील काही गुंतागुंतील रहस्ये उलगडायला सुरवात होईल. तुम्हाला सखोल प्रश्‍न विचारता आला पाहिजे. एकार्थाने त्यातून रहस्याचा उलगडा व्हायला सुरवात होईल. प्रत्येक मनुष्य असे प्रश्‍न विचारु शकणार नाही; पण आता असे प्रश्‍न विचारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान तुमच्या हाती आले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही कितीही अवघड गणिते, निसर्गातील अन्‌ विश्‍वातील कुट उलगडू शकाल. तुमच्यासमोर मशिन लर्निंग (यंत्र शिक्षण) आहे. यंत्र शिक्षण ही कृत्रिम बुद्धिमत्तेची एक शाखा आहे. यामध्ये आकडेवारी आणि माहितीपासून शिकणाऱ्या प्रणाली तयार केल्या जातात. अशा प्रणालींचा अभ्यास केला जातो. अशी प्रणाली इन्बॉक्‍समध्ये येणाऱ्या ई-मेल कचरा अन्‌ महत्त्वाच्या ई-मेलमध्ये वर्गीकृत करू शकते.

कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास आर्टिफिशियल इंटिलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) असे म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधरणत: संगणकच असते. कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय जगभरातील विज्ञानकथांमध्ये जास्त आढळतो. हॉलिवूडमधील चित्रपटात तो दिसतो. ही संगणक शास्त्रातील महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण (मशिन लर्निंग) त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमतांचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्‍यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील. अशा यंत्रांशी निगडित नियोजन, संयोजन, निदान विषयक प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज, चेहरा ओळखण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता दैनंदिन जीवनातील समस्या सोडविणारी विज्ञानातील एक शाखा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली या अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, संगणक गेम्स, संगणक प्रणालीमध्ये वापरल्या जातात.

यंत्र शिक्षणाच्या माध्यमातून निसर्गात किंवा विश्‍वात गुप्त असलेली माहिती बाहेर काढता येईल का, यावर विचार सुरु आहे. जितके शक्तीशाली प्रश्‍न विचारले जातील. तितकी अचूक माहिती मिळायला प्रारंभ होईल. निसर्गातील ही जितकी गुप्त माहिती बाहेर पडेल. तितके शक्तीशाली डाटा तयार होत जाईल. हा डाटा हातात आला की, तुम्ही तशी उपकरणे तयार करु शकाल. स्वत:ला ही उपकरणे वापरु शकाल. नुसती उपकरणेच नव्हे; तर अन्य आवश्‍यक गोष्टीही विकसित करता येईल. ज्या मानवी संस्कृतीसाठी उपयुक्त असतील. जेव्हा असा डाटा जवळ असतो. तेव्हा आर्थिकस्त्रोतही शक्तीशाली पद्धतीने तयार होत असतो. ज्यांच्याकडे अधिक डाटा आहे, तो आर्थिदृष्ट्या सक्षम असतो, हे सिद्ध झाले आहे. म्हणजे, तो हा डाटा विकू शकेल. एखादा उद्योग उभा करु शकेल वगैरे...! अनेक सहस्त्रकांपासून विविध माध्यमातून संशोधने सुरु आहेत. विश्‍वाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात आमुलाग्र बदल होत आहे. राहणीमान सुधारले. तरीही आज अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. सध्या जी काही वैज्ञानिक, औद्योगिक उपकरणे आहेत, तीसुद्धा म्हणाव्या त्या पद्धतीने सक्षम नाहीत. आज हवामान बदल, कोविड-19 ला सक्षम अशी यंत्रणा अन्‌ उपकरणे आपल्याकडे नाहीत, हे मान्य करावे लागेल. म्हणून संशोधक म्हणतात, की आपण निसर्गातील अनेक जटील गोष्टींची उकल अजूनही केलेले नाही. मानवतेसमोरील आव्हाने आजही उभी आहेत. मुलगामी उपाय सुरु केले तरच विज्ञानाची उकल व्हायला सुरवात होईल. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माणूस मुलभूत संशोधने विकसित करु शकेल. अतिखोलवर निसर्गाचे अध्ययन करायला सुरवात करेल. हे अध्ययन जेव्हा खोल पद्धतीने सुरु होईल. तेव्हाच हा गुंता सुटायला सुरवात होईल.

अमेरिकन अभियंता आणि विज्ञान अधिवक्ता व्हनीवर बुश एका निबंधात म्हणतो की, लोकांचे विचार वाढविण्यासाठी लवकरच बाह्य उपकरणांवर अवलंबून राहणे आवश्‍यक आहे. आता वैज्ञानिक शोधाचा दर इतका उत्कृष्ठ आहे की, माहिती साठवण्याची, प्रक्रिया करण्याची आणि समजून घेण्याची आवश्‍यकता आधीपासूनच लोकांच्या जैविक क्षमतेपेक्षा जास्त आहे. जितका जास्त डाटा गोळा होईल. तितके आपण अधिक सक्षम होत जाऊ. काही वर्षांपूर्वी फ्रान्समधील लार्ज हेड्रॉन कोलायडरच्या माध्यमातून विश्‍वाचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला गेला. गॉड पार्टिकलचा (मुलभूत कण) शोध घेतला. हे कण सापडल्याचा दावाही केला गेला. जनूकांचा प्रकल्प असो की, हेड्रॉन कोलायडरमधून मिळालेला डाटा असो. या डाटाच्या माध्यमातून आपण प्रश्‍न विचारुन त्याची सोडवणूक करायला हवी; कारण हा डाटा इतका प्रचंड निर्माण झाला आहे की, कितीतरी वर्षे लागतील. तो सोडवायलाच हवा आहे. इथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र उपयोगी पडेल. मशिन लर्निंगच्या माध्यमातून आपण या डाटातून मौलिक माहिती मिळवायला जेव्हा वैयक्ति सुरवात होईल. तेव्हा अनेक प्रश्‍न सुटायला सुरवात होतील.

संशोक गेली अनेक वर्षे ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग वापरत आहेत. कॉम्प्युटिंगद्वारे मॉडेल्स्‌ (प्रारुपे) तयार करणे, निसर्गातील काही घटनांचे तर्क आणि बुद्धिनिष्ठ चिकित्सा तयार करणे ही प्रक्रिया सुरु आहे. इतकेच नव्हे तर अणूंची प्रारुपे (मॉडेल्स्‌), विश्‍व नेमके कसे आहे, हेसुद्धा प्रारुपांद्वारे पाहिले जात आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक विषय, प्रश्‍न सोडवू शकते. तेही कॉम्प्युटिंगच्याद्वारे. यासाठी कितीही कठीण प्रश्‍न असला तरी तो सुटेल, असा विश्‍वास कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात. मानवी प्रज्ञा जिथे संपते तिथून पुढे विश्‍वाचे रहस्य उकलायला सुरवात होईल, अशी आशा कृत्रिम बुद्धिमत्तेला वाटते. जेव्हा हे होईल, तेव्हा अनेक प्रश्‍न चुटकीसारखे सुटतील; पण त्यातून अनेक प्रश्‍न निर्माण झाले तर काय करायचे? कारण एका प्रश्‍नात अनेक उत्तरे असतात. हा गुंता कसा सोडवायचा यावर ही विचार सुरु आहे. एखादा अचूक प्रश्‍न सोडवायचा असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता ते विज्ञान अशी सोडवणूक करता येईल, असे संशोधक म्हणतात.

उदाहरणार्थ, इथे एक प्रश्‍न घेऊ तो जीवशास्त्राचा. जीवशास्त्रातील जी काही कोडी आहेत, त्यावर विचार करु. प्रथिनांची नेमका आकार कसा असतो, हा प्रश्‍न आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला विचारला तर ते कसे उत्तर देईल? प्रथिने ही शरिराला अत्यंत उपयुक्त असतात. शरिराचे आरोग्य ते सांभाळत असतात. समजा ही रचना आणि आकार समजला की, संशोधकांना औषधे, लसी विकसित करण्यासाठी उपयोग होईल. शिवाय प्रथिने शरिात नेमकी कसे काम करतात हे सुद्धा समजेल. प्रथिनांची आतापर्यंतची सर्व माहिती जेव्हा "एआय'ला दिली जाईल. तेव्हा प्रथिनांचे रहस्य उलगडू शकेल. नवीन औषधे, गोळ्या अचूकपणे विकसित होऊ शकतील. होय, यावरसुद्धा काम सुरु आहे. गेली काही वर्षे एकल प्रथिनवर संशोधन सुरु आहे. यासाठी क्रिस्टलोग्राफी तंत्रज्ञान वापरले जात आहे. क्रिसलोग्राफी म्हणजे, स्फटीकांचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान. एकल प्रथिनांचा आकार आणि त्याबद्दलची माहिती ही "एआय'ला दिली तर एकल प्रथिनांचा आकार समजेल. तसेच सैद्धांतिकदृष्ट्या तरी एकल प्रथिनांची आकार, रचना समजायला सोपी होईल. यातून अमायनो ऍसिडचा क्रम समजेल. हे सर्व मशिन लर्निंगद्वारे आपण बोलत आहोत. म्हणजे, जितका कुट प्रश्‍न आपण विचारु तितकी उकल सोपी होत जाईल. विशेषत: मानवाच्या शरिराबद्दल जर रहस्य अशापद्धतीने उलगडत गेले तर कितीतरी घातक असे विषाणू, जीवाणूंवर आपण विजयी प्राप्त करु शकतो. नवीन लसी, औषधांद्वारे आपण या जीवाणू, विषाणूंचा फडशा पाडू शकू. प्रथिनांबद्दल अल्फाफोल्ड मॉडेलद्वारे खूप डाटा देऊन प्रथिनांची रचना कशी असते हे पाहिले गेले. अमायनो ऍसिडची एक स्ट्रिंग ही त्रिमितीय रचनेसारखा आकार कसा प्राप्त करते, याचा शोध घेतला गेला.

असाच प्रयत्न सहा प्रथिनांचा आकारबद्दल केला. सार्स सीओव्ही-2 मध्ये सहा प्रथिनांच्या रचनेमुळे कोविड-19 होतो. समजा ही लिंक कशी असते, हे समजले तर संशोधकांना औषधे विकसित करता येतील. प्रतिपिंड कशी तयार होते, ते समजेल. आता जो कोविड-19 चा जगाला जो धोका आहे, तो या माध्यमातून सुटेल असा विश्‍वास आहे. काही अचाट लोक जग बदलत असतात. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आपल्या हाती आले आहे. असे जरी असले तरी हे तंत्रज्ञान वापरण्याची हातोटी आणि त्याबद्दलची पूर्व माहिती असणे आवश्‍यक आहे. तुमच्याकडे मुळातच डाटा (माहिती) नसेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर तुमची हुकमत असेल तर एखादा प्रश्‍न तुम्ही कसे सोडवू शकाल? म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेबरोबर माहितीचा शक्तीशाली स्त्रोत ही आपल्याबरोबर असावा....

(आधार : सायंटिफिक अमेरिकन)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.