चार वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड पालिका भाजपच्या ताब्यात आली. याला दोन कारणे आहेत. एक मोदी लाट आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसची निष्क्रियता. पहिल्या कारणाला जोड मिळाली, ती म्हणजे राष्ट्रवादीतून बाहेर पडून आमदार झालेल्या लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांच्या अफाट ताकदीची. कारण त्यांच्यापाठोपाठ अनेक छोटे-मोठे कार्यकर्ते धावले आणि नगरसेवकापासून महापौर अगदी सहज बनले. यातील ८० टक्यांनी कधी पालिका इमारतही बघितली नव्हती. उमेदवारीच मिळाली नसते. त्यामुळे आजही लांडगे व जगताप यांच्याच भरवशावर भाजप उभा आहे. मूळच्या भाजपची व मातृसंघटनेची ध्येय, धोरणे, विचार एकदम वेगळे आहेत. ते माहीत असणारे, त्याच्याशी सुसंगत असणारे, तसे वागणारे किती नगरसेवक आहेत? हा संशोधनाचा विचार आहे. निष्ठावंत-दलबदलू, नवे-जुने अशा शब्दप्रयोगातून गट-तट निर्माण झाले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. चार वर्षांपूर्वी दोन-चार दिवस जो काय विजयोत्सव साजरा तेवढाच. नंतर शिमगाच सुरू आहे. भाजपमधील कोणत्याही नगरसेवक, पदाधिकाऱ्याशी बोला वाद, भांडण, आरोप, नाराजी याशिवाय कोणी काही बोलतच नाही. टेंडर, फाइल, ठेका, टक्केवारी यातून अंगावर धावून जाणे, कॉलर पकडणे, शिव्या देणे, असे प्रकार सतत सुरू आहेत. निवडणूक जवळ येऊ लागल्याने या प्रकारात वाढ झाली आहे. कोण कोठे सापडतोय याचीच वाट बघत बसलेले असतात. या सर्वांच्या नाड्या हातात असणारे लांडगे, जगताप काहीच बोलत नाहीत याचेच आश्चर्य वाटते.
राष्ट्रवादी काँग्रेस कुंभकर्ण
राष्ट्रवादी अगदी कुंभकर्ण आहे. कधीतरी त्यांच्यातले एक-दोघे जण एखादं आरोपाचं पत्रक काढतात. भ्रष्टाचार असा एक शब्द त्यात असतो. बाकी सगळा मजकूर भरताड. त्यांचं हे पत्रक इतकं टाकाऊ असतं, की सत्ताधारी त्याला उत्तरही देत नाहीत. या पक्षातही गटतट. अजित पवार दौऱ्यावर आले, की जवळजवळ करणारे, सत्ताधाऱ्यांशी आतून संधान असणारे, श्रीमंत-गरीब, गाववाला-बाहेरचा, तीनवेळा-चारवेळा विजयी झालेला, पडलेला. चार वर्षांत सत्ताधाऱ्यांची एकही फाइल कोण बाहेर काढू शकले नाहीत, यातच सर्व काही आले. सत्ता गेली तरीही अजून तोरा कमी नाही.
शिवसेनेचा दबदबा नाही
शिवसेना म्हणजे दबदबा हे समीकरण राज्यात आहे; मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये नाही. सदस्यसंख्या कमी आहे, तरीही एकजूट नाही. गटनेत्याच्याच मागे कोणी नाही. मुख्यमंत्री आपला आहे, हे कोणाच्याच ध्यानी नाही. निवडणूक तोंडावर आली आहे. मात्र, एकसंधपणा कोणत्याच पक्षात दिसत नाही. मोदी पुन्हा तारतील, असा गाढ विश्वास भाजपचा असावा व अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणजे सत्ता मिळालीच, अशा स्वप्नात राष्ट्रवादी असावी. पोट फुटेपर्यंत खाऊनही ढेकर कोण देईना, याचे आश्चर्य आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.