सांगायला 'युवा नेतृत्त्व'.. प्रत्यक्षात ती घराणेशाहीच!

politics
politics

'सामान्य माणूस लोकशाहीत राजा व्हावा, तो राणीच्या पोटी नव्हे; तर मतपेटीतून जन्माला यावा' असे आपल्या घटनेचा उद्देश आहे. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत घराणेशाहीच्या वाळवीने लोकशाहीला पोकळ केले असल्याचे चित्र देशात आहे .देशातील सर्व पक्ष घराणेशाहीला आमचा विरोध असल्याचं दाखवतात मात्र सगळीकडे घराणेशाही पहायला मिळते.

सध्या १७ व्या लोकसभेच्या निवडणुका होत आहेत. उमेदवारीच्या याद्या जाहीर होताना युवा उमेदवार देण्याच्या नावाखाली राजकीय कुटुंबातीलच उमेदवाराला उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. मात्र आज सुज्ञ युवा मतदार मात्र, या घराणेशाही विरोधात सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतोय. अनेक पक्षांनी युवा नेतृत्व म्हणून आपल्याच कुटुंबातील सदस्यांना लोकसभेच्या मैदानात उतरवले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर घराणेशाही विरोधात अनेकांनी संताप व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी काय फक्त  सतरंज्या उचलायचे काय ? असे प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत. घराणेशाही काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यासोबत देशातील सर्वच राज्यातील प्रादेशिक पक्षांमध्ये दिसून येते.

घराणेशाही बद्दल आपण जर जगातील प्रमुख लोकशाही देशांमधील नेत्यांच्या वांशिक पार्श्वभूमीकडे दृष्टीक्षेप टाकला तर विकसनशील आणि विकसित दोन्ही समाजात घराणेशाहीची राजकारण ठळक दिसून येते.  जगातील सर्वात मोठा लोकशाहीचा पुरस्कर्ता असणाऱ्या अमेरिकेतही घराणेशाची मागे राहिला नाही. याच उदाहरण म्हणजे केनेडी कुटुंब. या कुटुंबास एखाद्या राजेशाही कुटुंबाप्रमाणे स्थान निर्माण झाले आहे. 

काही देशांमध्ये घराणेशाहीचे राजकारण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे की ती एक समस्या निर्माण झाली आहे आणि लोक त्या विरोधात कायदा करण्याची मागणी करीत आहेत. भारतात तर खासदारांचा मुलगा खासदार, तर आमदाराचा मुलगा आमदार होण्याचे प्रमाण अधिक आहे. वडील मंत्री असतील तर घरातील अजून एखादा व्यक्ती आमदार किंवा खासदार ठरलेले असतेच. या मध्ये सामान्य युवा कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार ?

मागील ५ वर्षात सामान्य कार्यकर्त्यांमध्ये हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, कन्हैया कुमार या युवकांशिवाय दुसरे नेतृत्व समोर आलेले दिसत नाही. या लोकसभेला सुद्धा पुन्हा घराणेशाहीच पाहायला मिळणार असे चित्र दिसते. युवकांच्या देशात युवा नेतृत्व नसणे ही शोकांतिका म्हणावे लागेल. खालील दिलेले आकडे पाहिले तर युवकांचे लोकसभेतील आकडेवारी कमी होताना दिसेल. 

२०१४ मध्ये झालेली निवडणूक म्हणजे १६ वी लोकसभा. भारताच्या इतिहासात सर्वात वयस्क खासदारांची लोकसभा म्हणून ओळखली जाईल. ५४३ खासदारांपैकी २५३ खासदार हे सरासरी ५५ वर्षांपुढचे आहेत. त्याहून विशेष म्हणजे ३५ वर्षाहून कमी वय असलेले युवा खासदार फक्त १६ आहेत. 

आपल्याकडे युवा म्हणजे २५ ते ४० असे गृहीत धरले जाते. १९५२ ते १९५७ च्या या दोन लोकसभांमध्ये १६४ युवा खासदार होते. १९६२ ते १९८४ च्या निवडणुकांमध्ये युवा खासदारांची संख्येत कमी अधिक फरक असला तरी १०० पेक्षा कधीही कमी नव्हती. १९८९ ते २००९ या काळात मात्र युवा खासदारांची संख्या १०० पेक्षा कमी होत गेली. १६ व्या लोकसभेत तर २५ ते ४० वयोगटातील युवा खासदार ७१ होते. यामुळे आपण भारतीय संसदेत युवा खादारांची संख्या वाढली, हा दावा नाकारू शकतो.

भारतातील निवडणुकीच्या राजकारणाची बहुतांश चर्चा ही राजकीय पक्षांसाठीच्या जातींच्या संदर्भाने होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीनंतर भारतीय राजकारणातील युवा मतदार वर्गावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. परंतु यावर काळजीपूर्वक सूक्ष्मपणे विश्लेषण केल्यास १६ व्या लोकसभेत केवळ ७१ युवा उमेदवार निवडून आले. युवा मतदार युवा उमेदवारास अनुकूल असतो. युवा मतदार युवा उमेदवाराचे परीक्षण करताना मागील पिढीच्या तुलनेत अधिक सकारात्मकरित्या करतात. युवा मतदार हा युवा उमेदवाराकडे आस्थेने पाहतात. मात्र युवाच्या नावाखाली घराणेशाही चालवली जात आहे. 

भारतीय राजकारण आणि युवा यांचा प्रश्न हा घराणेशाहीच्या राजकारणाशी संबंधित आहे.सध्या भारतातील लोकसभा आणि विधानसभेत बहुतांश बहुतांश खासदार-आमदार हे राजकीय पार्शवभूमीतून आलेले आहेत. लोकशाहीतील घराणेशाहीच्या शिरकावास साहाय्यभूत होणारी परिस्थिती का निर्माण का झाली यावर अनेक बुद्धिवंत लोकं अभ्यास करीत आहेत.

१६ व्या लोकसभेतील ३५ पेक्षा कमी वय असलेले युवा खासदार जवळपास सर्वच राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. पॅट्रिक फ्रेंच यांच्या 'इंडिया : अ बुक पोर्टेट' पुस्तकात १५ व्या लोकसभेच्या ५४५ सदस्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीची माहिती संकलित केली आहे. त्या पुस्तकात घराणेशाहीबद्दल फ्रेंच म्हणतात, जर या या प्रवाहात बदल झाला नाहीतर लोकसभेचे वंशसभेत व्हायला वेळ लागणार नाही.

१६ व्या लोकसभेत राजकीय कुटुंबातून आलेले वय ३५ च्या आतले युवा खासदार 

अभिषेक सिंग, छत्तीसगड, राजनांदगाव लोकसभा मतदारसंघ, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांचे चिरंजीव आहेत.

अक्षय यादव, उत्तर प्रदेशात, फिरोजाबाद लोकसभा मतदारसंघ, समाजवादी पक्षाचे मुलायम सिंग यांचे ते भाचे असून त्यांच्या कुटुंबातील ते ७ वे सदस्य आहेत जे राजकारणात आले आहेत. 

चिराग पासवान, बिहार, जमुई मतदारसंघ, लोक जनशक्ती पार्टी. केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे ते चिरंजीव आहेत.

दुष्यंत चौटाला, हरियाणा,हिसार लोकसभा मतदारसंघ,  हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे ते नातू आहेत. 

गौरव गोगोई, आसाम, कालियाबोर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे ते चिरंजीव आहेत.

डॉ. हिना गावित, नंदुरबार लोकसभा मतदारसंघ, त्यांचे वडील डॉ. विजयकुमार गावित हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

के. कविता, तेलंगणा, निजामाबाद लोकसभा मतदारसंघ त्यांचे वडील तेलंगाना राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष व तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आहेत.

पूनम महाजन, मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघ, भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रमोद महाजन यांची मुलगी आहे.

प्रवेश वर्मा. पश्चिम दिल्ली लोकसभा, वडील भाजपचे नेते.

रक्षा खडसे, रावेर लोकसभा, भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून 

डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण लोकसभा, शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.