'संगीत स्वयंवर शताब्दिपूर्ती'चा अभिनव प्रयोग

Sangeet Natak Machindranath
Sangeet Natak Machindranath

गोव्याला नाटकांची, विशेषतः संगीत नाटकांची असलेली परंपरा शोधू गेल्यास शेकडो वर्षं पाठीमागं जावं लागतं. अर्थात ह्या भूमीत नाट्यप्रयोगांना नुसताच इतिहास नाही, तर वर्तमानही आहे. गोव्यात जसे आज शास्त्रीय संगीताचे आणि नवनव्या नाटकांचे प्रयोग होतात तसेच सातत्यानं संगीत नाटकांचे प्रयोगही होतात. संगीत नाटकांना प्रोत्साहन देण्यासाठी नवी नाटकं लिहिलीही जातात. गेल्याच वर्षी विष्णू सूर्या वाघ यांनी संगीत मच्छिंद्रनाथ हे नाटक लिहून रंगभूमीवर आणलं होतं आणि मध्यवर्ती भूमिका स्वतः साकारली होती.

रंगभूमीवर "संगीत स्वयंवर' ह्या नाटकानं एक काळ गाजवलेला आहे. "संगीत स्वयंवर' ची शताब्दी गेल्या वर्षी सुरू झाली होती. गोव्यात तिची पूर्तता झाली. 10 डिसेंबर 1916 ह्या दिवशी "संगीत स्वयंवर'चा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला होता. "रुक्‍मिणी' साकारली होती अर्थातच बालगंधर्वांनी! कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे काकासाहेब ह्या नावानं ओळखले जात. काकासाहेबांनी एकापेक्षा एक सरस नाटकं लिहिली. त्यांनी लिहिलेल्या नाटकांतील स्वयंवर हे तिसरं नाटक. श्रीकृष्ण आणि रुक्‍मिणी यांच्या प्रेम विवाहाचं कथानक "संगीत स्वयंवर' ला लाभलेलं आहे.

वैदर्भीय राजा भीष्मक याला दोन मुलं होती. राजपुत्राचं नाव रुक्‍मी आणि राजकन्या होती रुक्‍मिणी. आज जिथं अमरावती आहे, तिथं हे रुक्‍मिणी स्वयंवर घडल्याचं सांगितलं जातं. राजपुत्र रुक्‍मी हा स्वभावानं हट्टी, दुराग्रही. शिशुपाल हा त्याचा मित्र. आपल्या मित्राशी- शिशुपालाशी रुक्‍मिणीचा विवाह लावून द्यायचा असा त्याचा हट्ट असतो. पण रुक्‍मिणीनं श्रीकृष्णाची कीर्ती ऐकलेली असते. श्रीकृष्णाचा पराक्रम, त्याचं औदार्य, रसिकता अशा अनेक सद्‌गुणांचं वर्णन ऐकून रुक्‍मिणी त्याच्यावर प्रेम करायला लागते. श्रीकृष्णही रुक्‍मिणीचं गुणवर्णन ऐकून तिच्यावर प्रेम करायला लागतो. एकमेकावर अनुरक्त झालेले श्रीकृष्ण- रक्‍मिणी आणि राजपुत्र रुक्‍मी यांच्यातल्या संघर्षावर हे नाटक आधारलेलं आहे. काकासाहेबांनी हा संघर्ष "संगीत स्वयंवर' मधून प्रभावीपणे मांडलेला आहे. गंमत म्हणजे कथानक पौराणिक असले, तरी आजच्या "आर्ची- परशा'च्या काळातही ते कालबाह्य झालेलं नाही. प्रेम हे चिरंतन मानवी मूल्य आहे. त्याचा परिपोष कसा होतो हे जे काकासाहेबांनी दाखवलंय, त्यामुळे हे नाटक अजरामर झालेलं आहे.

आपल्याला कळलं तर आश्चर्य वाटतं की, "संगीत स्वयंवर' मध्ये तब्बल 57 पदं होती. बालगंधर्वांच्या लडिवाळ स्वरात ही पदं गायली जात असताना रसिक मंत्रमुग्ध होऊन जायचे. त्या काळच्या नाटकांप्रमाणं हेही नाटक रात्री सुरू होऊन अक्षरशः तांबडे फुटेपर्यंत चालायचं. त्या नटांच्या अंगी तेवढा दम होता आणि रसिकही शेवटपर्यंत बसून आस्वाद घ्यायचे.

स्वयंवरातील सर्व पदांना देवगंधर्व भास्करबुवा बखले यांनी चाली दिल्या होत्या. भास्करबुवा हे उस्ताद अल्लादियाखॉंसाहेबांचे शागीर्द होते. भास्करबुवांनी वेगवेगळ्या रागातल्या बंदिशींचा उपयोग करून चाली बांधल्या होत्या. विशेषतः मालकंस, मांड, जयजयवंती, यमन, भीमपलास अशा रागामधल्या बंदिशींचा उपयोग त्यांनी केला होता. त्या सगळ्या चाली रसिकांना मान डोलायला लावणाऱ्या आहेत. आजही ती पदं ऐकताना रसिक तन्मय होतात.

"संगीत स्वयंवर' हे संगीत मराठी रंगभूमीवरचे सर्वात श्रीमंत नाटक आहे. त्यात बालगंधर्वांचे नाटक मग काय विचारायलाच नको. स्वतःच्या खर्चापेक्षा जास्त पैसा ते नाटकावर खर्च करायचे. खऱ्या अर्थानं "अत्तराचे दिवे लावणं' म्हणजे काय याचा प्रत्यय "स्वयंवर' बघताना प्रेक्षकांना येत असे. अभिजात भारतीय संगीत घराघरात पोहोचवण्याचं श्रेय "स्वयंवर'कडे जातं.

गोव्यातील नेत्रवैद्य डॉ. अजय वैद्य हे रंगकर्मी आणि अभ्यासू निवेदक म्हणून गोमंतकीयांना जास्त परिचित आहेत. त्यांच्या संकल्पनेतून "संगीत स्वयंवर शताब्दिपूर्ती'चा अभिनव प्रयोग गोव्यात आकाराला आला. कला अकादमी आणि अक्षय, पणजी ह्या संस्थांच्यावतीने इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझामध्ये हा अभिनव प्रयोग सकारला. आरंभी घंटा निनादली, गुलाबपाणी शिंपूण रसिकांचे स्वागत करण्यात आले. "धीर वीर पुरुष पदा' ही नांदी सुरू झाली आणि वातारणात रंग भरला, त्यातच कीर्ती शिलेदार यांच्या "शांत हरी, हास्य करी' ह्या नांदीचे सूर मिसळून एक विलक्षण माहौल तयार झाला. संगीत रंगभूमीवरील प्रतिभावंत गायक कलाकार कीर्ती शिलेदार, प्रख्यात गायक अभिनेते रामदास कदम, दिग्गज गायक कलाकार भालचंद्र पेंढारकर, अभिजात कलावती नीलाक्षी पेंढारकर, तचेच चंद्रकांत वेर्णेकर, सुमेधा देसाई हे गोमंतकातले नामवंत गायक यांनी "संगीत स्वयंवर शताब्दिपूर्ती' प्रयोगात पदं गायली आणि नीलाक्षी आणि ज्ञानेश पेंढारकर यांनी निवडक प्रवेश सादर केले. मूळ नाटकातील 57 पदांपैकी 28 पदे या वेळी सादर झाली. अजय वैद्य यांनी संपूर्ण नाटकाचा रसभरित असा आढावा घेतला. प्रयोगाचं संहिता लेखन त्यांचंच होतं.

कीर्ती शिलेदार यांनी "नाथ हा माझा, मोही मना' हे पद गाऊन बहार आणली; "मम आत्मा गमला, एकला नयनाला' "मम कृष्ण सखा रमा' ही पदं नीलाक्षीबाईंनी विलक्षण तन्मयतेनं सादर केली. सुमेधा देसाई यांच्या "सुजन कसा मन चोरी' ह्या पदाने तर धमाल केली.

रामदास कामत आणि इतर कलावंतांनी केलेल्या गायनाने अपेक्षित परिणाम साधत रंगभरला. एकंदरीत, "संगीत स्वयंवर'चा रसपूर्ण आढावा, निवडक नाट्यप्रवेश आणि पदांनी रसिकांना शंभर वर्षापूर्वीच्या काळात आपसुकच नेले. गायकांनी मूळ पदांना न्याय देतानाच आपल्या विविध हरकतींनी अधिकच रंग भरला.

सोमवारीच दै. "गोमन्तक' च्या कार्यालयात प्रख्यात नाट्यकलावंत पद्मश्री पं. प्रसाद सावकार यांना गुणगौरव कार्यक्रमासाठी आणलं होतं. त्यांनी "आज पाच पाच तासांचे संगीत नाटकांचे प्रयोग बघायला प्रेक्षक येत नाहीत. त्यामुळं जुनी गाजलेली नाटकंसुद्धा काटछाट करून दोन तासात बसवून आणावी लागत आहेत...' अशी खंत व्यक्त केली होती. काळ बदललाय हे खरं, पण अभिजात संगीताची आवड नष्टच झालीय असंही नाही, ही सुखद वस्तुस्थिती आहे. "संगीत स्वयंवर शताब्दिपूर्ती' प्रयोगानं ही रसिकता पुन्हा एकदा सिद्ध केली, असं म्हणायला प्रत्यवाय नाही!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.