माणुसकीचे 'एहसास' देणारे विश्‍‍व

Ehsas
Ehsas

अनेकदा बस स्थानक, रेल्वे स्टेशन, हॉस्पिटल आदी ठिकाणी फिरताना आपल्याला मतिमंद मुले दृष्टीस पडतात. त्यांची अवस्था पाहून आपल्याला वाईट वाटते, सहानुभूतीही वाटते. पण, त्यांची जबाबदारी घेण्याचे धाडस आपल्यात नसते. त्यांचे नेमके काय होत असेल, हा प्रश्न मात्र आपल्याला नेहमी पडतो. अशा निराधार मतिमंद मुलांचा मायेने सांभाळ करणारी साताऱ्यातील अशीच एक संस्था म्हणजे एहसास मतिमंद मुलांचे बालगृह, सातारा. अनेक अनाथ मतिमंद मुलांचे संगोपन करणारी, त्यांच्या जीवनात आशेचा किरण पेरणारी एक संस्था. 

मतिमंद मुलं म्हटली की समाज त्यांची चेष्टा करतो. त्यांच्या पालकांनाही ती बोजा वाटू लागतात. मग बऱ्याचदा पालकच त्यांना एखाद्या ठिकाणी सोडून त्यांचे निघून जातात. अशाच निराधार अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी "एहसास'गेल्या 13 वर्षांपासून घेत आहे. एहसाससाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे संजय कांबळे सांगतात, ""समाजासाठी काहीतरी करायचंय, हा निर्धार आम्ही पक्का केला होता. त्यावेळी अशा लोकांसाठी काहीतरी करावं, जे आधाराशिवाय जगू शकत नाहीत. दरम्यान, समाजातील मतिमंद मुलांची अवस्था बघितली. त्यांची असहाय्यता आम्हाला बेचैन करायची. म्हणूनच आम्ही निर्णय घेतला अनाथ मतिमंद मुलांसाठी बालगृह सुरू करायचं. पण, आर्थिक अडचणी होत्या. सुरवातीला स्वतःच्या घरी 2006 मध्ये एहसास सुरू केले. सुरुवातीला पाचच मुले होती; परंतु आजुबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून साताऱ्याजवळ वळसे येथे एक जागा भाडेतत्त्वावर घेतली. तिथं "एहसास' सुरू केले. सध्या इथे 50 मुले आहेत. त्यांच्या सेवेसाठी सुमारे 20 कर्मचारी दिवसरात्र झटत असतात. त्यांच्या नि:स्वार्थ कष्टामुळेच हे काम चालू आहे. पोलिसांना राज्यभरात कुठे अशी अनाथ मतिमंद मुले सापडली की ते "एहसास'ला कळवतात. मग आम्ही न्यायालयातील कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतो. अनेकजण देणग्या देतात, काहीजण इतर मार्गांनी मदत करतात. त्यातून बराच हातभार लागतो.'' 

"एहसास'मध्ये सामान्य माणसाप्रमाणे या मुलांचे दिवसाचे वेळापत्रक ठरलेलं आहे. ही मुले रोज योगा करतात, प्रार्थना-गाणी म्हणतात, वाचन करतात, चित्रे काढतात, खेळ खेळतात, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होतात, स्वतःची कामं स्वतः करतात, त्यांच्यात येणाऱ्या नवीन सदस्यांना सामावून घेतात. त्यांना व्यवस्थित शिकवलं; तर काही अपवाद वगळता एक सामान्य माणूस जे करू शकतो ते सर्व स्वतःची कामे ही मुलं करू शकतात. 
अनाथ मतिमंद मुलांना सामान्य आयुष्य जगण्यासाठी "एहसास'मध्ये सर्वतोपरी प्रयत्न इथे केले जातात. डॉक्‍टर, नर्स, शिक्षिका, मदतनीस, आचारी असे साधारणपणे 20 जण या मुलांची सेवासुश्रुषा करतात. मुलांसाठी खास वेळापत्रक बनवलंय... ज्यात नियमित व्यायाम, योगाभ्यास, ध्यान आदी उपक्रमांच्या माध्यमातून त्यांची शारीरिक, मानसिक जडणघडण करण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वच सण, उत्सव साजरे होतात. खासकरून रक्षाबंधनला इथं अनेक मुली येतात. अनेकजण आपले वाढदिवस "एहसास'मध्ये येऊन साजरे करतात. मुलांना भेटवस्तू देतात. 

आवश्‍‍य वाचा : मन करा रे प्रसन्न...

"एहसास'मध्ये मुलांतील चांगल्या गोष्टी हेरून त्यांचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळेच इथली मुले सामान्य मुलांच्या बरोबर बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी होतात. बक्षिसेही मिळवतात; मग ती चित्रकला स्पर्धा असूद्या नाहीतर डान्स स्पर्धा... ही मुलं आपले अस्तित्व सिद्ध करतात. पण, त्यासाठी "एहसास'ला खुप व्यापक काम करावे लागते. कारण अनाथ मतिमंद मुलांपैकी काही बालके अपंग, अंध किंवा कर्णबधिरही आहेत. त्यामुळे या प्रत्येकासाठी वेगवेगळ्या पद्धतीने काम करावे लागते. अगरबत्ती, पणत्या बनवणे इतकेच काय शेतीदेखील ही मुले उत्तमरित्या करू शकतात. 

"एहसास'ला प्रति महिना कमीतकमी चार लाख रुपये खर्च येतो. महत्त्वाचे म्हणजे कोणतीही शासकीय मदत मिळत नसताना अनेक लोक आणि संस्थांच्या मदतीतून येथील बालकांना आवश्‍यक सुविधा पुरविल्या जातात. वैद्यकीय उपचार, पौष्टिक आहार, समुपदेशन, शारीरिक व मानसिक जडणघडण आदी विविध कारणांसाठी आपणही "एहसास'ला मदत करू शकता. त्यासाठी 9823773901 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.