Book Reviews: संवेदनशील मनाची ‘साद’

स्त्री शक्तीची पुढील वाटचाल, पाऊस आणि पर्यावरण, पक्षी जाय दिगंतरा... अशा काही वैचारिक लेखांचा या संग्रहात समावेश आहे.
Books
BooksSakal
Updated on

माधुरी देशमुख

सकाळ प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केलेला पुष्पा तारे यांचा साद हा ललित व ललितेतर लेखांचा संग्रह माझ्या हाती आला. १०४ पानांचे हे छोटेसे पुस्तक लगेच वाचावेसे असे वाटले.

पुस्तकाचे मुखपृष्ठ छान आकर्षक आहे. अरुण छटा ल्यालेली प्राची, हिरवळ, वाफाळलेल्या चहाचा कप व जुन्या लाकडी टेबलावरील पुस्तके या सर्वांकडे कुतूहलाने पाहणारी स्त्री. हे सर्व लेखिकेच्या रसिक मनाचे प्रतिबिंबच.

या पुस्तकात बावीस लेख आहेत. बरेचसे ललित, काही वैचारिक; विषयाचे वैविध्य तर किती! यात प्रवासवर्णने आहेत, छंदांविषयी, माणसातील नात्यांविषयी, चित्रपट, जाहिरातींची माध्यमे इत्यादी विविध विषय लेखिकेने साध्या, सरळ ओघवत्या भाषेत हाताळले आहेत.

पहिलाच लेख यांत्रिकीकरणाची ऐशी तैशी हा नर्म विनोदी शैलीत आहे. अमेरिकेतील वीज जाणे आणि त्यामुळे तिथे उडालेली भंबेरी याचे मजेशीर वर्णन या लेखात वाचायला मिळते.

प्रवासवर्णनपर लेखात स्वित्झर्लंड, युरोप, अमेरिकेतील प्रवास आहेत तसेच राजस्थान, केरळ, बनारस इथली वर्णने आहेत. कुठेही पाश्चात्त्य संस्कृतीचे वृथा कौतुक नाही की अनावश्यक टीका नाही. स्वदेशाविषयी न्यूनगंड तर नाहीच नाही.

प्रत्येक ठिकाणी आनंदाचे क्षण टिपून घेणे, अभ्यासू वृत्तीने त्या ठिकाणाचा इतिहास व संस्कृती सजगपणे जाणून घेणे हे लेखिकेचे वैशिष्ट्य दिसते.

तरुण वयात अमेरिकेत वास्तव्य करण्याची व जगभर प्रवास करण्याची मिळालेली संधी, विविध अनुभव टिपणारे संवेदनशील मन यामुळे पुष्पा तारे यांचे व्यक्तिमत्त्व बहुश्रुत आणि विशाल हृदयी झाले आहे.

३० वर्षे बनारस येथे राहिल्यामुळे त्यांचे जीवनानुभव समृद्ध झाले आहेत, हे यातील लेख वाचताना सतत जाणवते.

पुस्तकातील लेख साध्या सोप्या भाषेत आहेत, पण याचा अर्थ लेखिकेला अलंकारिक भाषा वर्ज्य आहे असा नाही.

निसर्ग चित्रण, संगीत याविषयी लिहिताना त्यांची लेखणी, सणासमारंभाला ठेवणीतले कपडे व मोजकेच दागिने घालणाऱ्या शालीन स्त्रीप्रमाणे सुंदर अलंकारांनी सजली आहे.

याचा प्रत्यय त्यातील केल्याने देशाटन, भूलोकीच्या नंदनवनी अशा प्रवासवर्णानांतून व आनंदाचे डोही, फुलांची सोबत यांसारख्या लेखातून येतो.

स्त्री शक्तीची पुढील वाटचाल, पाऊस आणि पर्यावरण, पक्षी जाय दिगंतरा... अशा काही वैचारिक लेखांचा या संग्रहात समावेश आहे.

सखोल अभ्यास करून दिलेली सांख्यिकी आकडेवारी यामध्ये आढळते. पण हे लेख क्लिष्ट, नीरस होणार नाहीत व त्यांच्या लालित्याला बाधा येणार नाही ही किमया लेखिकेने साधली आहे.

Books
Book Review : मनाला भावलेले 'फुकटचे सल्ले'!

इंग्रजी वाचनाची संधी आणि गोडी, तरुण वयात घडलेले अमेरिका, युरोपचे प्रवास यामुळे इंग्रजी साहित्याचे एक मोठे भांडार लेखिकेला गवसले आहे.

त्यांनीही त्याचे सोने करत भरपूर वाचन केले. मिनियापोलीसची अन्नपूर्णा व झुम्पा लाहिरीवरचा लेख हे यामुळेच शक्य झाले.

या संग्रहातील सर्व लेख आटोपशीर आहेत, पण याला झुम्पावरील लेख अपवाद. झुम्पाचे व्यक्तिचित्रण तर त्यात आहेच, पण तिच्या लो लँड (Low Land) या संपूर्ण कादंबरीची थोडक्यात गोष्ट या लेखात आहे.

हा लेख मोठा झाला असला तरी अतिशय रंजक शैलीमुळे पूर्ण वाचल्याशिवाय आपण पुस्तक खाली ठेवू शकत नाही.

लेखिकेने पुस्तके वाचण्याच्या छंदाबरोबरच ठिकठिकाणी भेटलेल्या माणसांना वाचण्याचा छंदही जोपासला असावा.

माणसांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे विश्लेषण काही लेखांमध्ये जाणवते. कुठेही कुणाबद्दल कटुता दिसून येत नाही. सर्वत्र ‘इदं न मम्’ असा भाव!

प्रकाश पानसे यांची नेमक्या शब्दातील प्रस्तावना, लेखिका डॉ. मंदा खांडगे यांच्या हस्ते झालेले प्रकाशन या पुस्तकाच्या जमेच्या बाजू. सकाळ प्रकाशनने वापरलेला सुबक व स्पष्ट फाँट अगदी यथायोग्य.

एकंदरीत या लेखन प्रवासाने लेखिकेला जसा आनंद दिला, तसा तो वाचकांनाही मिळेल याची खात्री वाटते. लेखिकेने ‘साद’ घातली, वाचकांनी प्रतिसाद द्यावा इतकीच अपेक्षा.

------------

Books
Sakal Book Publication : ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ पुस्तकाचे प्रकाशन
Books
Book Review : मनाला भावलेले 'फुकटचे सल्ले'!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.