Chhatrapati Shivaji Maharaj : सर्व समाजघटकांच्या कल्याणाचा निरंतर विचार करणारा राजा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वातून बुद्धिमत्ता, व्यूहरचना, साहस, मानवतावादी दृष्टिकोन आदी अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj
Chhatrapati Shivaji Maharajsakal
Updated on
Summary

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वातून बुद्धिमत्ता, व्यूहरचना, साहस, मानवतावादी दृष्टिकोन आदी अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय व्यक्तिमत्वातून बुद्धिमत्ता, व्यूहरचना, साहस, मानवतावादी दृष्टिकोन आदी अनेक गुण आजच्या तरुण पिढीला घेण्यासारखे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त इतिहास अभ्यासक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्याशी साधलेला संवाद...

प्रश्न - शिवाजी महाराजांचे शिक्षण कसे झाले? याचे एखाद- दुसरे उदाहरण सांगा?

डॉ. साळुंखे - स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी परमानंद नावाच्या संस्कृत पंडिताला आपले चरित्र लिहिण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार परमानंदाने संस्कृत भाषेमध्ये शिवभारत या नावाने महाराजांचे चरित्र लिहिले आहे. हे चरित्र ऐतिहासिकदृष्ट्या विश्वसनीय आहे, असे अभ्यासक मानतात. या चरित्रात जिजाऊ आणि शहाजी महाराज यांनी शिवरायांच्या लहानपणीच त्यांच्यावर कसे संस्कार केले आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली, हे स्पष्टपणे नोंदवलेले आहे. शिवरायांच्या वयाला सात वर्षे पूर्ण झाल्याबरोबर शहाजी महाराजांनी त्यांना वर्णमाला शिकण्यासाठी शिक्षकांकडे सोपवले.

शिवभारतातच आलेल्या एका उल्लेखानुसार शिवाजी महाराजांना कमीत कमी तीन लिपी येत होत्या. त्यांना बारावे वर्ष लागल्यानंतर शहाजी महाराजांनी त्यांना पुण्याला पाठवताना त्यांच्याबरोबर अनेक शिक्षक दिले होते. शहाजी महाराजांनी शिवरायांना ज्या अनेक विद्या शिकवण्याची व्यवस्था केली होती. त्यांपैकी एक विद्या म्हणजे दुर्गम असलेले किल्ले अधिक दुर्गम बनवणे. शिवाजी महाराजांनी या विद्येचा उपयोग दक्षिण भारतातील मोहिमेच्या वेळी केल्याचे दिसते. त्यांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतल्यानंतर आधीची तटबंदी पाडून अतिशय मजबूत अशी नवी तटबंदी बांधून घेतली. याचा उपयोग पुढे राजाराम महाराजांना झाल्याचे दिसते. शत्रूंनी सात वर्षे वेढा घालूनही ते सुरक्षित राहू शकले. शहाजी महाराजांनी दिलेले शिक्षण आणि शिवाजी महाराजांनी केलेले त्याचे उपयोजन, यांच्यामुळे हे घडू शकले.

प्रश्न - शिवाजी महाराजांचा आरमाराबाबत दृष्टिकोन काय होता?

डॉ. साळुंखे - शिवाजी महाराजांना आदिलशहा, मोगल वगैरेंबरोबर संघर्ष करावा लागत होता, हे विख्यातच आहे; परंतु महाराजांनी समुद्रावरून येणाऱ्या पोर्तुगीज, इंग्रज वगैरे आक्रमकांचा धोकाही ओळखला होता. त्यांनी किल्ल्यांना जितके महत्त्व दिले, तितकेच महत्त्व आरमारालाही दिल्याचे दिसते. समुद्रावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, हे ओळखूनच त्यांनी सिंधुदुर्ग हा समुद्रातील किल्ला निर्माण केला. यामागे त्यांची कल्पकता, दूरदृष्टी, स्थापत्यशास्त्राचे ज्ञान इत्यादी गुण प्रकर्षाने दिसून येतात.

प्रश्न - गुलामगिरीच्या प्रथेवर महाराजांनी कसे नियंत्रण आणले?

डॉ. साळुंखे - भारताच्या पूर्व किनाऱ्यावर डच लोकांनी काही वसाहती उभारल्या होत्या. स्थानिक राज्यकर्त्यांनी त्यांना काही सवलती दिल्या होत्या. शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर गेले असता डच लोकांबरोबर त्यांचा एक करार झालेला आहे. त्यातील एक अट फार महत्त्वाची आहे. हा करार होण्यापूर्वी डच लोकांना भारतीय स्त्री- पुरुषांना गुलाम बनवून त्यांची खरेदी- विक्री करता येत असे.

महाराजांनी जो करार केला, त्यामध्ये त्यांनी डचांना बजावले, की माझ्या राज्यातील कोणाही स्त्री- पुरुषाची तुम्ही गुलाम म्हणून खरेदी- विक्री करू शकणार नाही. हा करार १६७७ मध्ये झाला. त्यानंतर १४७ वर्षांनंतरचा म्हणजे १८२४ मधील एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. १८२४ मध्ये देखील दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांप्रमाणे माणसांची खरेदी- विक्री करणारा बाजार भरत असे. एकदा एक स्त्री आणि तिची ३ मुले ही वेगवेगळ्या लोकांना विकली गेली. तेव्हा त्या मुलांनी आईच्या पायांना मिठी मारून आक्रोश केला. अशा प्रकारच्या घटना घडण्यापूर्वी १४७ वर्षे महाराजांनी आपल्या राज्यात अशा खरेदी- विक्रीला बंदी घातली होती, यावरून त्यांचे द्रष्टेपण आणि राज्यकारभारातील सहृदयता दिसून येते.

प्रश्न - महाराजांची सर्वसमावेशकता कशी होती?

डॉ. साळुंखे - शिवाजी महाराजांनी गुलामगिरीच्या बाबतीत डचांवर घातलेले बंधन पाहता त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन सहजपणे स्पष्ट होतो. राज्य करताना त्यांचा दृष्टिकोन नेहमीच मानवतावादी राहिलेला आहे. राज्याची अनेक अंगे असतात आणि त्यांचे काम उत्तम रीतीने होण्यासाठी कर्तबगार लोकांची आवश्यकता असते. महाराजांनी वेगवेगळ्या कामगिरीसाठी नियुक्ती करताना सदैव कर्तबगारी हीच कसोटी मानली. त्यामुळे त्यांच्या राज्य यंत्रणेमध्ये विविध जातीधर्मांचे कार्यक्षम आणि निष्ठावंत लोक दिसतात. महाराजांनी कधीच संकुचितपणा वा भेदभाव केल्याचे दिसत नाही. सर्व समाजघटकांच्या कल्याणाचा निरंतर विचार करणारा राजा, ही त्यांची खरी ओळख आहे.

प्रश्न - सध्याच्या तरुण पिढीने महाराजांचे विचार कसे घ्यावेत?

डॉ. साळुंखे - काळ बदलतो, तसे समाजाचे प्रश्न बदलतात. नव्या पिढ्यांच्या आशा- आकांक्षा बदलतात. त्यांना प्राप्त होणारी साधने बदलतात. त्यामुळे नव्या काळात तरुण पिढीने आपल्या काळाला अनुसरून आपला व्यवहार निश्चित केला पाहिजे. आज महाराजांनी वापरलेली किल्ले, घोडे, तलवारी ही साधने युद्धाच्या दृष्टीने जवळपास कालबाह्य झालेली आहेत; परंतु महाराजांची बुद्धिमत्ता, व्यूहरचना, साहस, द्रष्टेपण आणि संपूर्ण रयतेच्या हिताची काळजी यासारखे गुण मात्र आजही पूर्वीइतकेच मोलाचे आणि आवश्यक आहेत. जगात अनेकदा सामर्थ्य आणि सद्‌गुण यांचा एकाच व्यक्तीमध्ये मिलाफ सहसा आढळत नाही. सामर्थ्यशाली माणूस दुर्गुणी आणि अन्यायी होण्याची उदाहरणे अनेक आहेत.

याउलट सद्‌गुणी माणसे दुबळी आणि अन्यायापुढे झुकणारी असल्याचेही खूपदा आढळते. शिवाजी महाराज हे एक असे अपवादात्मक उदाहरण आहे, की सामर्थ्य आणि सद्‌गुण या दोहोंचा मेळ बसल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व इतर अनेकांपेक्षा वेगळे बनले आहे. आजच्या तरुणांनी महाराजांच्या चरित्रातून अशा प्रकारच्या प्रेरणा घ्याव्यात, असे मला वाटते. महाराजांच्या अशा गुणांमुळेच सुमारे १०० वर्षांपूर्वी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेमध्ये महाराजांचा जयजयकार करणारी कविता लिहिली होती. त्या कवितेतील एक ओळ पुढीलप्रमाणे आहे. माराठिर साथे आजि हे बाड़गालि, एक कण्ठे बलो ‘जयतु शिवाजि’!

(हे बंगाली लोकांनो, तुम्ही आज मराठी लोकांबरोबर एका आवाजात जय शिवाजी, असे बोला.)

‘शिवाजी! नावासारखे नाव. फक्त तीन अक्षरे; पण तीन शतके उलटून गेल्यावरही ही तीन अक्षरे कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. आपल्या नसानसांतून रक्ताचा प्रवाह योद्ध्यांच्या चौखूर उधळलेल्या घोड्यांप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झेपावू लागतो.’

- डॉ. आ. ह. साळुंखे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.