नाती झाली अबोल...

communication gap impact story by praveen kulkarni
communication gap impact story by praveen kulkarni

‘शरीरस्वास्थ्यम्‌ खलु धर्मसाधनम्‌’ असे अनादिकाळापासून म्हटले जाते. चांगल्या शरीरात जसे चांगले मन वास करत असते, तसेच चांगल्या विचारांनी सकारात्मक मानसिकता निर्माण होत असते. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी संवादाच्या माध्यमातून विचारांचे आदान-प्रदान आवश्‍यक आहे.


संवाद म्हणजे मानवी भावभावना, कल्पना, मते यांचे प्रकटीकरण. भावना एखाद्याशी शेअर करणं, व्यक्त होणं हे निरोगी आरोग्याच्या आणि मनाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्‍यक आहे. पण, आज स्पर्धेच्या युगात धावताना सहज संवाद साधणं, हे प्रमाण जाणवण्याइतपत कमी झालंय. संवाद साधने वाढली, पण वन वे, टु वे नाही... आधुनिक साधनांच्या दैनंदिन वापरामुळे मानवाचा बुद्‌ध्यांक नि:संशय वाढला, पण भावनांक मात्र झपाट्याने कमी झाला...हे मान्य करावंच लागेल. मख्ख चेहऱ्यानं हसरे इमोजी वापरून आपण कसनुसं व्यक्त होतोय. इमोजी वापरतो तेही तोलूनमापूनच....त्यातही उत्स्फूर्तता नाही... किती हे कोरडेपण, संवेदनशीलता आटतेय जणू... नात्या-नात्यांतला संवाद कमी झाला अन्‌ माध्यमांशी नको तेवढी ॲटॅचमेंट वाढली. आजोबा-नातू एकत्र फिरतायंत हे चित्र आज किती घरांत दिसतं? पूर्वी, चार आण्याचं टपाल काय यायचं अन्‌ घरासह परिसरातही चर्चा व्हायची...लोक व्यक्त व्हायचे. आज  मनुष्य चंद्रावर पोचला, पण शेजारी कोण राहतोय, हे माहीत नाही.

आधुनिक संशोधनातून दर्जेदार औषधनिर्मिती झाली, अन्‌ आरोग्य मात्र जिथं-तिथं ढासळलेलं पाहायला मिळतंय... माणूस ‘मूक’पणे प्रचंड बोलायला शिकला. मात्र, आपण यंत्राचा अनावश्‍यक वापर करत बोलतोय हे विसरला अन्‌ तोही यंत्रच बनला. यामुळे अस्वस्थता, चिडचिडेपणा, स्वमग्नता, नैराश्‍यता, एकलकोंडेपणा, हतबलता, पराभूत मानसिकतायांनी मानवी मनाचा मोठा कप्पा कधी बळकावला, हे कळालंही नाही. यातूनच स्ट्रेस मॅनेजमेंट ही अलीकडे उदयास आली नवी ज्ञानशाखा. ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करावं, हे तिथं शिकवलं जातं. त्यातही प्रत्येकाचा तणाव वेगळा अन्‌ दुरुस्तीची पद्धतही.

पूर्वी घरं माणसांनी भरलेली असायची. त्यामुळे काही कारणामुळं झालेल्या तणावाचं वाटप आठ-दहा जणांत व्हायचं...मुळात ते संकट वाटायचं नाहीच...घरात जबाबदारी पेलून नेणारी माणसं आहेत, ही भावनाच त्या तणावाचा साफ निचरा करायची. उरलासुरला ‘स्ट्रेस’ म्हणा वा भीती ती जणू विरून जायची. आपोआप व्यवस्थापन व्हायचं. आज व्यस्त दैनंदिनीतून हसण्यासाठीही सवड काढावी लागते. पहाटे हास्य वर्गाला जाऊन तासभर हसून हलकं व्हावं लागतं, ही आधुनिक युगातील अगतिक माणसाची स्थिती आहे. निसर्गनिर्मित संकटात माणसाच्या मदतीला माणूसच येतो, हे कोरोनाच्या जीवघेण्या काळात सर्वांनीच अनुभवले आहे. माणूसपण शाबूत राखूनच नवे तंत्रज्ञान अंगीकारले पाहिजे, एवढी समज आली तरी पुरे...

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.