शास्त्रीय नाव : Megalaima haemacephala (मेगालायमा हिमॅसेफाला)
इंग्रजी नाव : Coppersmith Barbet (कॉपरस्मिथ बार्बेट) किंवा Crimsonbreasted Barbet (क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट)
आज सकाळी जुन्या विहिरीजवळील वाळलेल्या झाडा- झुडपांमधून फेरफटका मारावा म्हणून गेलो होतो. जवळपास पोहचलो सुद्धा होतो. तेवढ्यात एक भारद्वाज पक्ष्याच्या आवाजाशी सार्धम्य असणारा आवाज आला. अलगद पावले टाकत त्या दिशेने नजर वळविली. वठलेले कडुनिंब, वाळलेल्या सिताफळीची झुडपे आणि बोरिचे थोडीफार पाने असलेले काटेरी झाड या पार्श्वभुमीवर भारद्वाज दिसायला हवा होता. पण तो दिसला नाही. आता आवाजही यायचा बंद झाला होता. थोडेसे शोधक नजरेने पाहिले तेव्हा बोरीच्या झुडपावर चिमणीपेक्षा थोडोसा मोठा पण गुबगुबीत असा गडद शेवाळी रंगाचा एक पक्षी दिसला. त्याच्याजवळ त्याच्यासारखाच दुसरा एक पक्षी होता. निरखून पाहिले तेव्हा त्याच्या गळ्याजवळ दोन्ही बाजुला दोन ठसठशीत लाल ठिपके दिसले. डोक्यावरपण तसाच लाल रंग दिसत होता. डोळ्यावरील काळ्या रंगाच्या खालच्या आणि वरच्या बाजुला असणारा पिवळा रंग शोभून दिसत होता. पांढऱ्या पोटावर हिरवट रंगाच्या रेषा होत्या. चोच काळी होती तर पाय लालसर दिसत होते. त्याच्यावरुन नजर हटवायला मन धजावत नव्हते. पण प्रथमच दर्शन दिलेल्या या सुंदर पक्ष्याला मोबाईलमध्ये कैद केले नाही तर सगळेच मुसळ केरात जाईल, असा विचार करुन मोबाईल कॅमेरा ऑन केला. पण थोड्याच वेळात त्याने बोरीच्या झुडपावरुन वठलेल्या झाडावर उडी मारली. त्या झाडाच्या खोडावरील साल वाळून खोडापासून अलग होवू पाहत होती. त्यामुळे निर्माण झालेल्या फटीतील कीटक, मुंग्या त्याने टिपायला चालू केले. यावेळी त्याच्या रंगीबेरंगी शरिराच्या हालचाली टिपताना मजा येत होती. आता मात्र तो उडून माझ्यापासून दोन-अडीचशे फूट अंतरावरील एका मोठ्या झाडावर जावून बसला होता.
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आज मात्र मला माझीच कीव येवू लागली होती. कारण बोरीच्या पिवळसर हिरव्या पानाच्या पार्श्वभुमीवर या नविन पक्ष्याचाही तसाच रंग असल्याने मोबाईल मध्ये तो एवढा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे गेल्या वीस वर्षात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा करताना एखादा चांगला कॅमेरा आपणास खरेदी करावासा वाटू नये, या विचाराने मी विचलित झालो होतो. ज्या विहिरीने काल प्रथमच नाचरा दाखविला त्याच विहिरीजवळील जुनाट वाळलेल्या झाडांनी एक नविन सुंदर पक्षी दाखविला होता. या पक्ष्यासंबंधी जाणून घेण्याची आतुरता मला शांत बसू देत नव्हती. लगेच मी पक्षीतज्ञ डॉ.निनाद शहा, डॉ.अरविंद कुंभार, भरत छेडा, अविष्कार मुंजे आदींना व्हिडिओ पाठविले. लागलीच सर्वांची उत्तरे आली. त्यावरुन हा महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारा 'तांबट' पक्षी असल्याचे माहित झाले. विशेष म्हणजे तांब्याच्या भांड्यावर ठोके मारल्यावर जसा आवाज येतो तसा याचा आवाज असल्याने याला 'तांबट' नाव पडल्याचे डॉ.निनाद शहा आणि भरत छेडा यांनी सांगितले. सुतार या जमातीवरुन सुतारपक्षी पक्षी माहित होता. आता तांबटकरी जमातीवरुन तांबट हा नविन पक्षी आज माहित झाला. भरत छेडा यांनी तर ह्याचा आवाजाची ऑडिओ क्लिपदेखील पाठवून दिली. एवढेच नाही तर भारद्वाज आणि तांबट ह्या दोन्ही पक्ष्यांचे हुबेहूब आवाज ऐकवले. त्यामुळे दोन्हींच्या आवाजातील सार्धम्यासह फरकही लक्षात आला.
भरत छेडा यांनी तांबटची अधिक माहिती सांगताना हा पक्षी झाडाच्या वाळलेल्या खोडावर स्वतः होल पाडून आपले घरटे बनवितो. विशेष म्हणजे जमिनिपासून दहा ते बारा फूट उंचीवरील पांगारा, शेवगा, काटेसावर, शिरीष, आंबा, गुलमोहर, चिंच, आदी झाडांच्या वठलेल्या खोडास तो खालील बाजुनेच घरटे बनवितो, असे ते म्हणाले. त्यांची ही माहिती ऐकून मी अंचबित झालो. कारण आजपर्यंत वृक्षांचे महत्व जाणून घेताना कायम जिवंत हिरविगारच झाडे नजरेसमोर असायची. पण वाळलेल्या खोडांवर सुद्धा काही तांबट सारखे पक्षी संसार थाटतात हे कळाले. त्यामुळे कोणतीही वाळलेली झाडेच नव्हे तर एखादे खोडसुद्धा कोणाचातरी संसार फुलवित असते. त्यामुळे आता निरुपयोगी म्हणून अशी झाडे तोडतानाची खोड आपणास मोडावी लागेल, याची आज प्रकर्षाने जाणीव झाली. या विचार तंद्रित असतानाच पुण्यावरुन अविष्कार मुंजे यांचा तांबटची इंत्तिंभूत माहिती पुरविणारा मेसेज मोबाईलवर आला. त्यात त्यांनी सांगतिल्यानुसार भारतीय उपंखंडात तांबटच्या दहा प्रजाती आढळतात. पानझडीची जंगले, खुरटी झुडपे, शेतातील बागबगिचांचा परिसर यामध्ये यांचा अधिवास आढळतो. वड, अंजिर, पिंपळ, पेरु, सिताफळ अशी फळे खायला याला आवडते पण कधीकधी कीटकांवर पण ताव मारतो. फेब्रुवारी ते जून हा तांबटच्या विणिचा काळ आहे. साधारणपणे तीस सेंटीमीटर लांबीच्या घरट्यात मादी एका वेळी तीन ते चार अंडी घालते. पिलांचा सांभाळ नर आणि मादी मिळून करतात. ही सर्व माहिती वाचत असतानाच विहिरीच्या दुसऱ्या बाजुकडील झाडावरुन मला तांबट पक्ष्याच्या आवाज ऐकू येवू लागला. लगेच मी भरत छेडा यांना फोन लावून लाईव्ह आवाज ऐकविला. ते जाम खूश झाले आणि तांबट आवाज काढताना दिशाभूल करण्यासाठी सतत मान दोन्ही बाजुला वळवितो आणि हा माझा परिसर आहे हे इतर पक्ष्यांना बजावत असल्याचे त्यांनी सांगितले. पक्षीतज्ञ डॉ.अरविंद कुंभार यांनी तर तांबट चे मी पाठविलेले व्हिडिओ पाहून "सर, तुमच्या शेताचा परिसर खूप पक्ष्यांनी समृद्ध असल्याचे दिसतेय," असा रिप्लाय दिला तर डॉ.निनाद शहा यांनी
ह्याच्या चोचीच्या खालील बाजूस दाढीसारखे काळे लांब केस असतात. त्यामुळे तांबटला फ्रेंच भाषेत 'बारबेट' म्हणजे दाढीवाला म्हणतात, ही अधिकची माहिती पुरविली. एक मात्र खरे की आज तांबट ने मला झाडे वाळून कितिही जीर्ण झाली तरी ती तोडायची नाहीत असा महत्वपूर्ण धडा शिकविला आणि पक्ष्यांचे छान फोटो टिपता येतील असा एक चांगला कॅमेरा खरेदी करायला प्रवृत्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.