कोरोना तू आलास, अन् भवताल अक्षरश: अंतर्बाह्य ढवळून निघालं. माणसांतील गुणावगुण पटापट बाहेर पडले. माणूस माणूसपणच विसरला. अपवाद असतीलही...पण ते अपवादच... तसाही माणूस विकासाच्या मागे लागलाच आहे. भौतिक सुखाची आसच एवढी लागलेली आहे की, निसर्ग राहिला तर आपण राहू अन् विकासही... हे साधं तारतम्यही त्याला राहिलं नाही. मानवी मूल्ये गुंडाळून अगदी काहीही करून झगमगाटात, छानछोकीत राहायचे, असा अनाठायी अट्टहास धरणाऱ्या माणसांना तू एकाच वेळी एकाच जाजमावर आणलंस. श्रीमंत-गरीब, उच्च-नीच, जात-धर्म याचे अवडंबर न माजवता सगळे जणू एकाच छताखालीच...
नातं... कुठलंही असो, जगण्याला बळ देणारं रसायन; पण तुझ्या छत्राखाली आल्यानंतर जणू नात्यांचा विसर पडला. साधी कणकण आली तरी, आपुलकीनं चौकशी करणारे...एखाद्याला खोकला आला तरी पळू लागले, टाळू लागले. अगदी रक्ताची नातीही... काही दवाखान्यांत उपचारासाठी, तर काही जणांचा मृत्यू झाला. मरणदारी अन् तोरणदारी मतभेद संपतात...असं म्हणतात; पण खरं सांगायचं तर इथं मतभेद सुरू झाले. ‘त्यांचा’ मृतदेह ‘आमच्या’ स्मशानभूमीत नको... मृत्यू प्रत्येकाच्या पाळतीवर असताना हा हिशेब डोक्यात येतोच कसा? मृत्यू माणसाचा की, माणुसकीचा असा प्रश्न पडला गड्या. याउलट भरल्या घरात वावरणाऱ्यांनी जेव्हा तुझ्या तडाख्यात सापडून जगाचा निरोप घेतला त्या मृतदेहांना कुणीही वाली नव्हता कागदोपत्री... त्यांचा अंत्यविधी समाजातील चांगुलपणाचं वेड लागलेल्या माणसांनीच केला.
निसर्गाच्या दृष्टीने माणूस निरुपयोगीच आहे, हे माणसानंच सिद्ध केलं. चार-सहा महिन्यांच्या काळात तो काहीही न करता शांत बसला तरी नद्या शुद्ध झाल्या... नद्या शुद्धीकरणासाठी कोट्यवधींचे आराखडे राबवले...मात्र अपेक्षित परिणाम झाला नाही. नुसता मानवी हस्तक्षेप काही काळासाठी थांबला अन् नद्या अवखळपणे खळखळू लागल्या... प्राणी-पक्षी त्यांच्या अंगणात खेळू लागले. याचं अप्रूप चिऊ-काऊच्या नावानं घास खात मोठे झालेल्यांनाच ठाऊक. आणखी काही वर्षांनी काही पक्षी चित्रांतच दाखवावे लागणार, अशी चर्चा असायची; पण तुझ्यामुळं त्यांच्या जंगलातल्या घरात तरी पक्ष्या-प्राण्यांना हायसं वाटलं...त्यांचा वावर वाढला अन् जाणवलाही... मोकळेपणाने वावरणाऱ्या प्राण्यांमुळंच माणसात आल्यासारखं वाटलं बघ माणसांना.
सुंदर निसर्गात बेशिस्तीची दुर्गंधी पसरविणाऱ्या माणसाला तूच स्वच्छता शिकवलीस. कुठंही, काहीही खा.. अन् कसेही वागा...या अनिर्बंध वागण्याला चांगलीच वेसण बसली. घरातील भात-आमटी खाऊनही तब्येती सुधारल्या...नवनवीन पदार्थ करून घरी सहकुटुंब खाणं झालं अन् कुटुंबवात्सल्य नव्यानं अनुभवता आलं. ‘मी’ ‘माझं’च्या आधीन झालेल्या ‘मी’ला ‘आम्ही’ शब्दाचा अर्थ याच काळात कळाला. बेडूक, साप, पाली, झुरळ आणि कायबाय खाणाऱ्यांच्या चीनसारख्या देशातून तू आलास; पण इथं पाकशास्त्र, पाककला आहे. इथं ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणून ग्रहण केलं जातं. ते नुसतंच उदरभरण नव्हे, तर पवित्र यज्ञकर्म आहे, या भावनेनं अन्नग्रहण करावं, असं भारतीय संस्कृती सांगते. आरोग्याला पूरक खाणं काय असतं, याचीही या निमित्तानं नव्यानं उजळणी झाली. संयम, संघर्ष, नाती-गोती, खाणं-पिणं, निसर्ग-नियम, पर्यावरण, स्वच्छता, मातीची ओढ अन् शाश्वत मानवी मूल्यं... या साऱ्यांचं सूक्ष्म अवलोकन तुझ्या निमित्तानं झालं. मरणाचा खेळ खरं जगणं शिकवून गेला...
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.