Diwali Festival 2020 एक दिवा शहीद सैनिक, बळीराजा आणि कोविड योद्ध्यांसाठी!

Diwali Festival 2020 एक दिवा शहीद सैनिक, बळीराजा आणि कोविड योद्ध्यांसाठी!

दीपोत्सव साजरा करावा, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी करावी अशी परिस्थिती यंदा नाही. कारण, अर्थातच गेली आठ-नऊ महिने जगभर थैमान घालणारा कोरोना! या महाभयंकर विषाणूच्या प्रभावाने बाधित झाले नाही, असे एकही क्षेत्र जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही. या विषाणूने सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांवर विलक्षण परिणाम केलेला दिसतो. यामुळे आता आपल्याला जगाची विभागणी कोरोनापूर्वीचं जग आणि कोरोनात्तर जग, अशी करावी लागणार आहे. आजच्या घडीला कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी धोका अजून टळलेला नाही. युरोपात आलेली दुसरी लाट हे त्याचं द्योतक!

इतिहासाच्या पानावर डोकावताना असं दिसतं की, कोरोनासारखी हजारो संकटं अंगा-खांद्यांवर झेलून "मानव" नावाची जात ताठ मानेने उभी आहेच. अंतः प्रेरणा, संघर्ष, त्याग, नाविन्याचा शोध ही मानवजातीच्या ठायी असणारे गुण या संकटांवरचा रामबाण उतारा आहेत आणि जगातील सर्वच संस्कृतींनी रुजवलेले सण-उत्सव, सोहळे या संकटांच्या निर्दालनासाठी एखाद्या उत्प्रेरकाप्रमाणे काम करतात. आपल्या संस्कृतीतील "दीपोत्सवाचा" सण तर चैतन्याचा प्रपात असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, परंतु यंदाच्या दीपोत्सवावर कोरोनाची काळीकुट्ट काजळी चढलेली दिसते. वर उल्लेखल्याप्रमाणे ही काजळी आपल्या अंतः प्रेरणेने, आपल्यातील चैतन्याने झटकायला हवी आणि म्हणूनच "एक दीप शहीद कोविड योद्धे, सैनिक आणि बळीराजा या कार्यक्रमाचं सामाजिक अंतर ठेऊन आयोजन करत आहोत. यात सोहळा साजरा करण्याऐवजी कृतज्ञतेची जोड हाच पवित्र उद्वेश. आपल्यासाठी राबणाऱ्या या माणसांसाठी एक दीप प्रज्वलित करणं खरंतर आपलं कर्तव्य ठरतं.
                  
भयंकर, मरणासण्ण, भयानक, विषण्ण, भययुक्त इत्यादी विशेषणं फिकी पडावी, अशी परिस्थिती गेल्या आठ महिन्यात आपण सर्वांनीच अनुभवली. रोज लाखानं वाढणारे कोरोना रुग्ण, हजारात होणारे मृत्यू इत्यादी बातम्यांनी आपण सर्वांनीच आपल्या मानसिक स्थितीचा कडेलोट अनुभवला, परंतु या भयावह परिस्थितीतही जगभरातील संशोधक, डॉक्टर, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलिस इत्यादी योद्ध्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोविड रुग्णांवर उपचार केले. कित्येक बातम्यांमध्ये आपण असंही वाचली की, रुग्णांच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कारालाच नकार दिल्यानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून मृतांवर अंत्यसंस्कार केले. कित्येक परिचारिका, सफाई कर्मचारी, डॉक्टर, पोलिस यांनी आपले जीव गमावले. ही एक प्रकारची शहिदीच! याच कोविड योद्धांसाठी एक दीप...
               
स्वातंत्र्यानंतर पाकिस्तान या पारंपरिक शत्रू राष्ट्राशी दोन हात करताना भारतमातेच्या कित्येक पुत्रांना वीरमरण येत असतं. पाकिस्तानपेक्षाही भयंकर शत्रूंनं यंदा डोकं वर काढलं, तो म्हणजे चीन. चीनच्या हल्ल्यातही यंदा 40 हून अधिक जवानांना वीरमरण आले. या शहीद जवानांसाठीही एक दीप लावणं आवश्यक आहे. आपलं वर्तमान सध्या अनेक कारणांनी अस्वस्थ आहे. त्यातील एक मुख्य कारण म्हणजे, वाढलेलं तापमान! त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असेही  संबोधतो. या वाढलेल्या तापमानामुळे अनियमित पर्जन्य, पूर इत्यादी समस्या उद्भवायला लागल्या आहेत. याचा मोठा फटका बळीराजाला बसतोय. यंदाही अतिपर्जन्यामुळे शेतकऱ्याच्या हाता-तोंडचा घास या मानवनिर्मित संकटाने हिरावून घेतला. कित्येक शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. यातून आपण योग्य धडा शिकायला हवा. एक दीप या बळीराजासाठीही.. आपण प्रज्वलित करून या सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करूया..

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.