Teachers Day : अनेक शिक्षकांना ज्ञानदीप दाखवणाऱ्या गुरु मंगला नारळीकर

गणितज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ दिवंगत डॉ. मंगला नारळीकर यांच्या आठवणी जागवल्या आहेत, मंगल पवार या ग्रामीण भागातील गुणी शिक्षिकेने
Dr mangala naralikar
Dr mangala naralikarE sakal
Updated on

मंगल पवार

जिल्हा परिषद शिक्षिका, कोपरगाव

आपल्या आयुष्यातील शिक्षकांना आठवायचा दिवस म्हणजे शिक्षकदिन. आम्हा शिक्षकांसाठीही हा दिवस तर विशेषच असतो. मला या दिवशी हटकून आठवण येते ती डॉ. मंगलाताई नारळीकर यांची.

अगदी गेल्यावर्षीच्या शिक्षकदिनापर्यंत ताई होत्या. त्यांची भेट नाही तरी फोनवर तरी बोलणं होऊ शकत असे. मात्र नुकतंच जुलै महिन्यात त्यांचं निधन झालं त्यामुळे या शिक्षकदिनाला डॉ. मंगलाताईंशी नव्हे तर त्यांच्याविषयी लिहीण्याची वेळ आली आहे.

Dr mangala naralikar
Teacher Day : शिक्षकदिन उजाडला तरी यंदाच्या जिल्हा पुरस्कारांची घोषणा बाकी; शिक्षकदिनी वितरणाचा मुहूर्त टळणार

पाठ्यपुस्तक लेखनाबरोबर त्यात चित्र कशी असावीत, याविषयीही ताई बोलत असत. मुलांच्या भावविश्वाचा अंदाज घेऊन त्याच्याशी निगडीत चित्र पुस्तकात घातल्यामुळे पुस्तकं मुलांना खूपच आवडली होती.

संख्या, संख्याचिन्हांचे अर्थ - माहितीबंध, माहितीचे व्यवस्थापन यासाठीही चित्रांचा पुस्तकात पुरेपूर वापर करण्याचा त्यांचा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला. विद्यार्थ्यांना गणित केवळ उदाहरणे किंवा विषय म्हणून नव्हे तर आकलनासहित शिकवावं.

त्यामुळे मुलांना फक्त सांख्यिक गणित नव्हे तर त्याच्या अनुषंगाने तार्किक विचार, निर्णयक्षमता, समस्या निराकारण क्षमता या गोष्टी मुलांमध्ये याव्यात, असा मंगलाताईंचा प्रयत्न असायचा.

त्या अतिशय वक्तशीर होत्या. बालभारतीची बैठक जर १० वाजता सुरू होणार असेल तर ताई ९ वाजताच तिथे हजर असायच्या.

त्यांचं वय त्यांच्या कामाच्या आणि वक्तशीरपणाच्या कधीच आड आलं नाही. अगदी ८-८ तास बसून त्या आमच्यासोबत काम करत. बुद्धीमान तर त्या होत्याच पण माणुसकीही त्यांच्या ठायी होती. अडचणीत असलेल्यांना मदतीचा हात त्या कायम देत असत.

माझ्या शाळेतील एक विद्यार्थिनी कर्करोगाशी झुंजत होती. तिच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची होती. मंगलताईंनी तिला आर्थिक मदत तर केलीच पण मुंबईत शस्त्रक्रियेसाठी नेल्यावर जर तिच्या कुटुंबाची राहण्याची सोय होत नसेल तर ती जबाबदारीही घेण्याची तयारी दाखवली.

Dr mangala naralikar
खरा वैज्ञानिक सत्यशोधक असतो गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर; व्हर्च्युअल साजरा झाला विज्ञान दिन

मनाने त्या इतक्या मोठ्या होत्या की त्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत. एकदा इयत्ता पाचवीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण द्यायचे होते. मी कोपरगावहून पहाटेच निघाले, प्रशिक्षण स्थळी ११ वाजता पोहचले. पाहते तर मंगलताईंनी माझ्यासाठी डवा आणलेला. त्या म्हणाल्या, "मंगल तू पटकन जेवून घे. परत कधी वेळ मिळेल ते सांगता येणार नाही.

एवढं प्रेम, एवढी काळजी कोणी करेल का कुणाची?

या प्रशिक्षणात बाकीच्या साऱ्यांनीच व्याख्यानरुपात प्रशिक्षण दिले पण ताई म्हणाल्या मी आणि मंगल दोघी मिळून प्रशिक्षण देऊ. संवादाची भाषा मुले आणि शिक्षक दोघांसाठी प्रभावी ठरेल. मला प्रशिक्षणात मदतनीस म्हणून न वागवता सहकाऱ्याच्या नात्याने ताईंनी वागवलं.

मला पोटाच्या विकारांचा त्रास होता. त्यावेळी त्या कायम माझ्यासाठी ज्वारीची भाकरी आणि मुगाची भाजी घेऊन येत असत. अगदी आईसारखी माया लावत असत.

एकदा अचानक धुकं दाटून पाऊस पडला. वातावरणात अचानक थंडावा आला होता. मला संध्याकाळी ६ वाजता कोपरगावच्या बसने निघायचं होतं. ताईंनी आस्थेनं विचारलं, अगं मंगल शाल वगैरे काही आणलं आहेस की नाही?

मी नाही म्हटल्यावर मंगलताईंनी आपली शाल बॅगेतून काढून मला दिली. ती शाल माझ्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे. सतत मायेची उब देणारी ताईंची आठवण आहे.

ताई बरेचदा वाकून बसत असत. पाठ दुखत असे. ते दुखणं अगदी सहन व्हायचं नाही, त्यांच्याकडून. मी पटकन पाठीला हात लावत आधार दिला की, त्या म्हणत तुझ्या स्पर्शात माझ्या मुलीची आठवण होते बघ.

Dr mangala naralikar
शिक्षकदिनीच शिक्षक आंदोलनावर

ताईंना वाचनाचं अतोनात वेड होतं. अगदी रुग्णशय्येवर पडल्यापडल्यासुद्धा त्यांचं वाचन सुरू असायचं. माझे विविध मासिकांत वगैरे लेख आले असतील की त्या आवर्जून वाचत. एकदा आजारी असतानाही त्यांनी मला आवर्जून मला त्याविषयी कळवलं होतं.

माझ्या विद्यार्थीप्रेमाबद्दल आणि धडपडीबद्दल ताईंना फार अपुलकी होती. त्या कायम म्हणत, ''बालभारतीच्या पुस्तक लिहीण्याच्या कामादरम्यान मला लक्षात आलं की तुझ्या विद्यार्थ्यांवर तू खूप प्रेम करतेस. त्यांच्या हिताची काळजी वाहतेस.

आदर्श शिक्षक होण्यासाठी हे फार आवश्यक आहे.

तुझे विद्यार्थी भराभर आकडेमोड करतात, त्याचं कौतुक आहे. एकच गणित निरनिराळ्या पद्धतींनी सोडवता येतं हा वस्तुपाठ आहे. विद्यार्थ्यांनी शोधलेल्या युक्त्याप्रयुक्तयांचं कौतुक कर आणि त्याची नोंदही कर. त्याचं पुस्तक कर, हा सल्ला ताई कायम देत असत.

डॉ.मंगला नारळीकर ताईंनी आयुष्यात अनेक गोष्टी शिकल्या पण त्याहीपेक्षा त्यांच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी अनेकांना देऊ केलं. कधी प्रत्यक्ष शिकवून तर कधी लिखाणातून. त्यांचं हे मोठेपण आहे.

ताईंविषयी असं लिहायला वाटणं खरंतर नकोसं आहे, कारण त्या नाहीत ही कल्पनाच करू नयेशी वाटते. पण आता हेच वास्तव आहे. मंगलाताईंबरोबर काम करताना त्यांनी दिलेला दृष्टीकोन आणि गणिताचे धडेच आता पुढे मार्गदर्शक ठरणार आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.