Blog : दाभोलकरांनंतर... युएन ते युगांडाकडून दखल, दोन कायदे अन् शाखांचा विस्तार

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या खटल्याचा दहा वर्षानंतर शुक्रवारी निकाल येणार आहे.
Narendra Dabholkar
Narendra DabholkarEsakal
Updated on

- विशाल विमल

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन आता तब्बल पावणे अकरा वर्ष उलटली आहेत. संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकवरून येताना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूलावर डॉक्टरांचा काही धर्मांध प्रवृत्तीच्या लोकांनी खून केला. ही घटना राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्वस्थता निर्माण करणारी होती आणि अजूनही या घटनेची दाहकता संपलेली नाही. सलग चाळीस वर्षे महाराष्ट्राच्या समाजमनाची मशागत करणाऱ्या कार्यकर्त्याची हत्या होते, ही बाब कोणत्याही परिस्थितीत मान्य होण्यासारखी नव्हती आणि नाही. त्यामुळं ही घटना म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनाला बसलेला मुक्का मार होता. यामुळं अनेकांची मनं सुन्न झाली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी मोठा काळ जावा लागला. आमच्यावर डॉक्टरांची वाणी, लेखणी, कार्यपद्धती आणि आठवणींचा प्रभाव असल्यानं डॉक्टर सतत नजरेसमोर उभे असायचे. डॉक्टरांसोबत सलग नऊ वर्ष केलेल्या कामातून त्यांच्याशी वैचारिक आणि भावनिक पातळीवर नाळ जोडली गेली होती. त्यामुळं डॉक्टरांशिवाय जगणं ही कल्पनाही अस्वस्थ करणारी होती आणि आज मागं वळून पाहता सतत असं वाटतं की, जणू काही डॉक्टर हे अद्यापही कार्यकर्तृत्वानं आमच्या सोबतच दीपस्तंभासारखे उभे आहेत.

Narendra Dabholkar
Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा उद्या निकाल; पाच आरोपींवर चालला खटला

आपल्याकडं कुटुंबप्रमुख अथवा नेत्याच्या पश्चात सगळी वाताहात होते असा इतिहास आहे. मात्र, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं असं झालं नाही. पावणे अकरा वर्षात दु:ख, वेदना सहन करत कामाचा वाढ-विस्तार झाला. डॉक्टरांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळं ते असतानाच सन २०१० मध्ये संघटनेच्या प्रमुख कार्याध्यक्षपदाची जबाबदारी अविनाश पाटील यांच्याकडं सोपवली होती. शिस्त आणि विकेन्द्रित, लोकशाही पद्धतीनं संघटनात्मक काम सुरू होतं. संघटनेची धुरा अविनाश पाटील सांभाळत असताना डॉक्टरांचा खून झाला. मात्र, त्यावेळी खचून न जाता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला राग, चीड, आक्रोश आणि नैराश्य हे जाणून घेऊन कार्यकर्त्यांच्या आक्रोशाला, रागाला आक्रमकेकडं जाऊ न देता, त्याला विधायक मार्गानं दिशा देण्याचं काम अविनाश पाटील यांनी केलं. मारेकऱ्यांचा जलद गतीनं शोध घेऊन त्यांच्यावर ठोस कारवाई व्हावी, या मागणीसाठी संघटनेनं अनोख्या पद्धतीनं आंदोलनं, मोर्चे आणि जनजागरण घडून आणलं.

Narendra Dabholkar
Dabholkar Murder Case Timeline: नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा 10 वर्षांनंतर लागणार निकाल? आतापर्यंत काय घडामोडी घडल्या?

राज्य आणि देश पातळीवरील तपास यंत्रणेतील अधिकारी, मान्यवर, लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेटून तपासासाठी दबाव निर्माण करण्याचं काम केलं. तर दुसऱ्या बाजूला संघटनेचे विविध विभागांच्या मार्फत सुरू असणारे काम हे सातत्यानं सुरूच राहिलं, पण नव्यानं अनेक विभाग सुरू करून ते विभाग कार्यरत झाले. अंधश्रद्धा निर्मूलनसाठी जादूटोणाविरोधी कायदा सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली अठरा वर्षे संघटनेनं पाठपुरावा केला. डॉक्टरांची हत्या झाली तरी देखील तो कायदा मंजूर होण्याची शक्यता नव्हती. दबाव निर्माण करून तो कायदा डिसेंबर २०१३ मध्ये मंजूर करून घेण्यात आला. सन २०१७ साली जातपंचायत विरोधी कायदा हा अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनेनं एकहाती राज्य सरकारकडून मंजूर करून घेतला. आज या दोन्ही कायद्यांअंतर्गत शेकडो गुन्हे दाखल झाले असून अनेक भोंदू बाबांची दुकानं बंद झाली आहेत. सन २०१९ मध्ये संघटनेला तीस वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये तीन दिवसीय परिसंवाद आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं. संघटनेच्या शाखांचा विस्तार हा पावणे दोनशेवरून साडेतीनशेपर्यंत झाला. अनेक राज्यांसह देश पातळीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा होण्यासाठी पाठपुरावा आणि प्रबोधन झालं. कर्नाटक राज्यात कायदा मंजूर होऊन लागू झाला आहे. युगांडा देशामध्ये नरबळीचा कायदा करत असताना महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मदत घेतली गेली. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देशांनी भूमिका घ्यावी, यासंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत संयुक्त राष्ट्रांकडं (युएन) पाठपुरावा केल्यानं युएननं देशांना धोरण आखण्यासंबंधी सुचित केलं आहे. हे सगळं घडत असताना वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार-प्रचार, चमत्कारांना आव्हानं, भोंदू बुवा-बाबांचा पर्दाफाश आणि संघटनेचे इतर सर्व सातत्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम सुरू राहिले आहेत.

Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar : नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आरोपीविरुद्ध पुरावे सिद्ध, जास्तीत जास्त शिक्षा द्यावी; कुटुंबीयांची न्यायालयाकडे मागणी

संघटनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे शहरात डॉक्टरांचा खून झाल्यानं मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. अस्वस्थतेला वाट मोकळी करून देण्यासाठी अनेक विधायक उपक्रम राबवले गेले. प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला सलग पाच वर्षे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमून कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. सन २०१८ साली पुण्यात धार्मिक असहिष्णुता आणि दहशतवाद विरोधी परिषद घेतली गेली. सलग दहा वर्षे १९ आणि २० ऑगस्टला पुण्यात डॉक्टरांच्या स्मृतीदिनाचे कार्यक्रम होत आहेत. कोरोना काळात संघटनाअंतर्गत ताणतणाव निर्माण झाले. मात्र, त्यातून देखील पुण्यासह राज्यभरात विस्तारित पद्धतीनं संघटना कार्यरत आहे. सुमारे पावणे चारशे शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू असून पुण्यात आघाडीवर काम सुरू आहे.

Narendra Dabholkar
Dr. Narendra Dabholkar : डॉ. नरेंद्र दाभोलकरांची बारा पुस्तके आता ब्रेल लिपीत

मनात राग असताना, चिड असताना, काही प्रसंगी नैराश्य असताना आणि दुसऱ्या बाजूला धारदार आणि जीवघेणा विरोध आणि संघर्ष असताना देखील आम्ही कार्यरत आहोत. याचं कारण काय? तर कामाची असणारी गोडी, कामावर असणारं अविचल प्रेम, समाज बदलाची आस, संघटनात्मक कामाची असलेली घडी, डॉक्टरांची प्रेरणा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वावर असणारी निष्ठा, अविनाश पाटील यांचं नेतृत्व यातून आम्हाला आजही काम करण्याचं बळ मिळत आहे.

(लेखक, पूर्णवेळ सामाजिक कामात असून महाराष्ट्र अंनिसचे पुणे शहर कार्याध्यक्ष आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.