सध्याचं युग हे माध्यमांचं युग आहे. त्यात हल्ली समाज माध्यमांमुळे राजकीय, सामाजिक वातावरण कलुषित झालं आहे. मुख्य प्रवाहातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक या पारंपरिक माध्यमांनी अनेकदा असंतुलित झालेलं वातावरण संतुलित करण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला दिसून येतो. किंबहुना त्यामुळेच महाराष्ट्राची ओळख देशभर बुद्धिनिष्ठ समाज म्हणून निर्माण झाली आहे. कोविडनंतरच्या काळाचा विचार करता जगभर बॅक टू बेसिक्स म्हणजे पुन्हा आपल्या मुळांकडे चला, अशी चळवळ जोर धरू पाहतेय. त्यामुळे माध्यमांच्या संदर्भातदेखील पारंपरिक माध्यमांकडे लोकांचा कल जगभर झुकताना दिसतोय, आपला देश आणि अर्थात, आपले महाराष्ट्र राज्य त्याला अपवाद नाही. माध्यम आणि राजकीय पक्ष यांचं अनेकदा विळ्या-भोपळ्याचं, तर काही वेळा सख्य असल्याचं वेळोवेळी समोर येत राहिलंय.
भारतीय जनता पक्ष आणि मीडियाचं तसं जुनं नातं आहे. सुरवातीला प्रमोद महाजन, नंतरच्या काळात अरुण जेटली आणि आता पीयूष गोयल हे मीडिया मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळखले जातात. २०१४ पासून केंद्रात मोदी सरकार सत्तेत आहे. राज्यातही २०१९ पर्यंत भाजप-शिवसेना युती होती. त्यामुळे तेव्हाच्या किंवा आत्ताच्या सरकारचं काही मुद्यांवर समर्थन करणं किंवा प्रसंगी ताशेरे ओढणं हा तसा नित्याचा प्रकार. किंबहुना मोदी सरकारच्या स्थापनेपासून माध्यमेदेखील दोन गटांत विभागली गेल्याचं चित्र सर्वसाधारणपणे दिसून येतं. परिस्थिती आणि वस्तुस्थिती कशीही असली तरीदेखील भारतीय जनता पक्ष ही सततच्या कल्पकतेतून मीडियाला नेहमी खाद्य पुरवत आलेली आहे. माध्यमांच्या संदर्भातील जेवढा बारकाईने अभ्यास आणि कृती भाजपानं केली तेवढे अन्य पक्षाला जमलेले नाही, हे मान्य करावं लागेल. विशेष म्हणजे माध्यमांच्या संदर्भात अग्रक्रमावर असूनही कार्यकर्त्यांसाठी सतत अभ्यासवर्ग, कार्यशाळा, शिबिरं घेण्यात भाजप आघाडीवर आहे. माध्यमांच्या संदर्भात प्रशिक्षित करण्याच्या कार्यक्रमांमधील हे सातत्य शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांसह देशातील अन्य पक्षांना ठेवणं जमलेलं नाही. भाजपकडून हे गुण अन्य पक्षांनी घ्यायला हवेत.
राजकीय पक्षांनी जशी कामं नाही केलीत तरी चालतात, पण किमान लोकांचं म्हणणं नेत्यांनी ऐकून घ्यायला हवं, अशी त्यांची किमान अपेक्षा असते. तसंच राजकीय कार्यकर्त्यांनादेखील पाठीवर केवळ कौतुकाची थाप हवी असते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांना सतत काहीतरी कार्यक्रम देत राहणं गरजेचं असतं. केंद्रात आणि नाशिक महापालिकेत भाजपा सध्या सत्तेत आहे. मात्र, सत्तेत नसतानादेखील अनेक वर्षांपासून मीडियासंदर्भातील, तसेच नेतृत्त्व गुणांसंदर्भातील भाजपचे कार्यक्रम अखंडितपणे सुरूच होते आणि आता सत्तेत असतानाही ते सुरूच आहेत. एखाद्या संघटनेत चैतन्य टिकून राहतं ते अशा कार्यक्रमांमुळेच. केंद्रात किंवा नाशिक महापालिका पातळीवर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आपण विरोधात आहोत, हे आधी समजून घ्यावं लागेल. विरोधात असताना आपण सत्ता काबीज केली आहे, अशा थाटात सध्या नाशिकमध्ये विरोधी पक्ष वावरत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊन प्रशिक्षित करण्याची खरी गरज भाजपावगळता अन्य पक्षांना अधिक आहे.
सध्याची सामाजिक आणि राजकीय स्थिती गुंतागुंतीची बनली आहे. सगळ्याच पक्षांचे सामान्य कार्यकर्ते गोंधळलेल्या स्थितीत आहेत. वेगवेगळ्या विषयांवरील वेगवेगळ्या भूमिकांमुळे नेमकी आपली काय भूमिका असली पाहिजे, हे ठरवेपर्यंत पुढचा विषय समोर आलेला असतो. माध्यमांची गर्दी आणि त्याद्वारे माहितीचा प्रचंड मारा होत आहे. त्यामुळे नेमकेपणाने या माहितीचा उपयोग कसा करता येऊ शकतो, यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. भाजपने हे ओळखलं आहे. कार्यकर्ते प्रशिक्षित असले तरीदेखील माध्यमांची व्यापकताही वाढतेय.
नेमकेपणाने टोकदार भूमिका कशी घेता येऊ शकते, याचे प्रशिक्षण भाजप कार्यकर्त्यांना दिग्गज कार्यकर्त्यांकडून दिलं जात आहे. भाजपकडे प्रशिक्षित मनुष्यबळाची खाण आहे. त्या माध्यमातून अगदी बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांना कसं प्रशिक्षित करता येईल, याचे सूक्ष्म नियोजन भाजप सातत्यानं करत आहे. माध्यमांच्या संदर्भात कार्यशाळांच्या माध्यमातून सतत प्रशिक्षण देण्याची ही गरज क्रमांक एकची पार्टी असूनही त्यांना सर्वाधिक वाटते, यातून त्यांना कुठल्या दिशेला जायचं आहे, याचा अंदाज घेता येऊ शकतो. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या संदर्भात भाजपापासून कोसोदूर आहे. केवळ धांगडधिंगा करुन भाजप सत्तेपासून दूर जाईल, हा या पक्षांचा समज बाल्यावस्थेतील मानावा लागेल. भाजप सतत कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करत राहते, हे कौतुकास्पद असून किंबहुना त्यामुळेच कार्यकर्त्यांचं मोहोळ असलेला हा पक्ष मानला जातो.
राजकारण, समाजकारणाला अनेक कंगोरे आहेत. अनेकदा तीव्र, अतितीव्र प्रसंग समोर येतात. त्यावेळी त्या-त्या समाजांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचून अचूक माहिती देण्याचं कौशल्य राजकीय कार्यकर्त्यांनी आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी लागणारं मनुष्यबळ सततच्या प्रशिक्षणातून तयार होतं. भाजपला याची जाणीव आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सगळ्या माध्यमांचा विचार करता हे जाळं क्लीष्ट, गुंतागुतीचं, व्यापक मात्र अत्यंत परिणामकारक आहे. त्यामुळे या दुधारी शस्त्राचा वापर कशा रीतीने करायचा, यासाठी सतत चिंतन, मननाची गरज असून, त्याला कृतिशीलतेची जोड द्यायला हवी. समाज माध्यमे ही वरवर आणि फुगवटा आलेली माध्यमे आहेत. पारंपरिक माध्यमे लोकांच्या मनाला, भावनांना स्पर्श करणारी आहेत. प्रत्येक माध्यमांचे आपले म्हणून एक बलस्थान, तसेच उणिवाही आहेत. त्यामुळे त्यांचा अचूकपणे उपयोग करण्याचं कौशल्य भाजपप्रमाणे अन्य पक्षांनी अंगी बाणल्यास त्यातून निकोप राजकीय स्पर्धा वाढीस लागण्याची अपेक्षा व्यक्त करणं गैर नक्कीच ठरणार नाही.
ता. क. : भाजपने नाशिकमध्ये अलीकडेच एक माध्यम कार्यशाळा घेतली, या कार्यशाळेला राज्यातील भाजपचे दिग्गज प्रवक्ते, भाजपच्या रचनेतील दीर्घकाळ पूर्णवेळ काम करणारे कार्यकर्ते, रा. स्व. संघाचे प्रचार विभागाची धुरा सांभाळणारे ज्येष्ठ, अनुभवी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. नियमित होणाऱ्या अभ्यास वर्गाचा हा एक भाग होता. नाशिक शहरात भाजपचे दोन लाख ७० हजार सदस्य आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.