स्टिल्थ (Stealth) आणि डेल्टाक्रॉन (Deltacron) या ओमिक्रॉनच्या (Omicron variant) नव्या व्हेरियंटची चर्चा जगभर नव्याने सुरु झाली आहे. चीनमध्ये या नव्या व्हेरियंटने बाधित झालेले हजारो रुग्ण सध्या सापडत आहेत. या नव्या व्हेरियंटचा आधार घेऊन भारतात चौथी लाट येऊ शकते का, या दृष्टिने शास्त्रज्ञांनी अभ्यास सुरु केला आहे. ओमिक्रॉनच्या तिसऱ्या लाटेचा फटका अपेक्षेनुसार आपल्या देशाला तसेच राज्याला फार बसला नाही. हा संसर्ग रोखला जाण्याचं मूळ कारण अत्यंत वेगानं झालेलं लसीकरण आहे. आयआयटी कानपूरच्या एका अभ्यासानुसार देशात चौथ्या लाटेची शक्यता काही प्रमाणात जाणवेल असं म्हटलंय. सध्या वरिष्ठ नागरिकांना बूस्टर डोसची मात्र अत्यंत वेगाने सुरु असून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींना देखील लसीकरणाचा पहिला डोस सुरु झाला आहे. तसेच १२ ते १४ वयोगटातील मुला-मुलींना देखील लसीकरणाची सुरुवात झाल्याने १२ ते १८ हा वयोगट पुढील तीन महिन्यांत लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार करेल. शून्य ते १२ वयोगटासाठी लसीकरणाची मात्रा केव्हा सुरु करायची, यावर सध्या विचारमंथन सुरु आहे. टप्प्याटप्प्याने या संदर्भातील कार्यवाही देखील होण्याची शक्यता आहे.
जेवढी हानी दुसऱ्या लाटेत डेल्टा आणि डेल्टा प्लसमुळे झाली, तेवढा फटका ओमिक्रॉनचा बसला नाही. यासाठी लसीकरणासोबतच भारतीयांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती हे देखील एक महत्त्वाचे कारण ठरले. पाश्चिमात्य देशांमध्ये नैसर्गिक संसर्गाच्या कोणत्याही शक्यता शिल्लक ठेवल्या जात नाहीत. प्रत्येक आजार आणि संसर्गसाठी तिकडे आधीपासूनच वेगवेगळ्या लसी टोचून घेतल्या जातात. चीनचा विचार करता जगभरात लस येण्यापूर्वीच मे २०२० मध्ये त्यांच्याकडे लस आली होती, लसीकरणाला त्यांनी सुरुवात देखील केलेली होती. कॅन्सीनोबायो (CanSinoBIO), सायनोव्हॅक (Synovac), कोरोनावॅक (Coronavac) या चीनी बनावटीच्या लसी आहेत. यातील कोरोनाव्हॅक ही आपल्या कोवॅक्सीनसारखी (Covaxin) लस आहे. पण कोव्हॅक्सीनची परिणामकारकता कैक पटीने अधिक आहे. कोवॅक्सीनचे एकूण परिणाम चांगले आहेत. इंडोनेशिया, तैवानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना तेव्हा चीनी लसी घ्याव्या लागल्या होत्या. चीली आणि टर्कीमध्ये देखील चीनी बनावटीच्या लसी देण्यात आल्या होत्या.
आता नव्या व्हेरियंटच्या प्रसारासाठी २२ जून २०२२ ची तारीख देण्यात येत आहे. जर नव्या कोरोना व्हेरियंटचा संसर्ग भारतात पसरु लागला तरी देखील घाबरण्यासारखे कोणतेही कारण नाही. तोवर आपल्या बहुसंख्य जनतेचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असतील, तर किमान २५ टक्के लोकांचे बूस्टर डोस देखील पूर्ण होतील. त्यामुळे तिसऱ्या लाटेतील ओमिक्रॉनप्रमाणेच नव्या कोरोना व्हेरियंटचा संसर्ग असेल, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत. अगदी बूस्टर डोस घेऊनही संसर्ग झाल्यास देखील तिसऱ्या लाटेतील अनुभवाप्रमाणेच अजिबात भीती न बाळगता अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा अधिक असेल, असं वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार म्हणत आहेत. विशेष म्हणजे चीनध्ये सध्या रुग्ण वाढत असले तरी देखील त्याला चौथी लाट म्हणायचं का, यावरही तज्ज्ञाचं अद्याप एकमत नाही.
या सगळ्यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापूर्वी अवघड पेपर देवून कोरोनाने आपल्याला फसवून झालेलं आहे. निष्काळजीपणा बाळगून चालणार नाही. नव्या व्हेरियंटच्या चाचणीपासून ते उपचारापर्यंतच्या अनेक गोष्टींची पडताळणी व्हायरोलॉजी शास्त्रज्ञ करत आहे. कोरोनाचे विविध व्हेरियंट्स येणार हे जरी आधीच शास्त्रज्ञांनी सांगून ठेवलेलं असलं तरी देखील कोणते तीव्र, मध्यम कमी अत्यंत कमी घातक असतील, याचा नेमका ठोकताळा अजूनही सेट झालेला नाही. दुसऱ्या लाटेवेळी हा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे. टेस्टमध्ये स्पष्टपणे नवा व्हेरियंट आढळून येत नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. नव्या स्टिल्थ व्हेरियंटमध्ये चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे, सतत थकल्यासारखे वाटणे, ताप-खोकला, हद्याची गती अचानक वाढणे ही प्रमुख लक्षणे आहेत. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार नव्या व्हेरियंटमधील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तो फुफ्फुसांपर्यंत पोहोचत नाही. दुसऱ्या लाटेतील डेल्टापेक्षा आता येऊ घातलेला व्हेरियंट सौम्य स्वरुपाचा असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.